एकेश्वरवाद (तौहीद) (Monotheism (Tawhid))

इस्लाम हा जगातील प्रमुख धर्मांपैकी अतिशय महत्त्वाचा धर्म आहे.इस्लाम बद्दल त्याच्या श्रद्धेबद्दल अनेकांना औत्सुक्य असतं परंतु फार थोड्या लोकांना त्याच्याविषयी माहिती असते मग ते मुस्लिम असतील किंवा मुस्लिमेत्तर त्यासाठी हा लेखन प्रपंच.
इस्लाम धर्माचे तीन मुळ आधारस्तंभ अ‍ाहेत.

१)तौहीद
(एकेश्वरवाद)
२) रिसालत (प्रेषितवाद) आणि
३)आखेरत (परलोकवाद).

एकेश्वरवाद म्हणजे अल्लाह शिवाय कुणीही पुजेच्या,भक्तीच्या, अराधनेच्या लायक नाही तोच या सृष्टिचा एकटा स्वामी आणि मालक आहे.सृष्टितील अतिसुक्ष्म कणापासून ते महाकाय सूर्यापर्यंत आणि प्रत्येक ग्रह तार्‍यांवर त्याचेच नियंत्रण आहे.
आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की,सूर्यमालेमध्ये विविध ग्रह सूर्या भोवती अंडाकृती कक्षेमध्ये भ्रमण करीत असतात.दुसरं एक उदाहरण चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.चंद्र पृथ्वभोवती वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करतो.प्रेषित मुहम्मद(स.)यांनी एका हदिस वचनात हे सांगितले की “चांद देखो रोजा रखो और चांद देखो इफ्तार करो” म्हणजेच रोजाच्या महिन्याला रमजानला सुरवात करा आणि एका महिन्यानंतर चंद्र दर्शनानंतर ईदचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज व्हा.सांगायचे तात्पर्य इतकेच की ग्रहांचे सूर्याभोवती आणि उपग्रहांचे ग्रहांभोवती भ्रमणाचा जो कालावधी आहे तो किती अचूक आहे आणि या संपूर्ण नियोजनामागे एकच दिव्यशक्ती आहे त्याला ईश्वर अल्लाह असे म्हणतात.
ईश्वर अल्लाह सोबत त्याच्या गुणधर्म व वैशिष्ट्यांसोबत दुसर्‍या कुणाची सरमिसळ करण्याला म्हणजे शिर्क करणे हे इस्लाम मध्ये निषिद्ध आहे.
इस्लाम धर्मियांची अशी श्रद्धा आहे की ईश्वर अल्लाहच कुणाला मुले किंवा मुली,कुणाला दोन्ही किंवा कुणाला काहिच देत नाही.सर्व गरजा तोच पुर्ण करणारा आहे त्यामुळे त्यालाच मागणं हे आवश्यक आहे.
इस्लामच्या शिकवणूकीनूसार आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी कुठल्याही साधु,संत,महात्मे,पिर,
फकीर,बाबा यांच्य‌ा समोर हात पसरविण्याला महापाप असं मानलं जातं.
आपल्याला आजार,आरोग्य,अपत्ये इ.सर्वकाही तोच अल्लाह देतो.आपल्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत सगळ्या गरजा पुर्ण करणारी शक्ती म्हणजे अल्लाह आहे.
ऊन,वारा,पाऊस हे सगळं तोच अल्लाह देतो जो एकटाच जगाचा स्वामी आणि मालक आहे.मानवाने स्वत:च्या शरीरावरच जर नजर टाकली तर त्याच्या असंख्य कृपाप्रसादांचा बोध होतो.
आईच्या उदरातील लहानशा गर्भाशयात मनुष्य कशाप्रकारे तयार होत असतो याचा जर आपण विचार केला तर असे लक्षात येते की तेथे मानवाचे काहीच कौशल्य नाही.दोन सूक्ष्म हार्मोन्स जेव्हा एकमेकांशी मिळतात तेव्हा बाळ आकाराला येत असते.आईच्या रक्तापासूनच बाळाला उदरामध्ये अन्न पोहोचणे सुरू होते.लोह गंधक फॉस्फरस इत्यादी सर्व पदार्थ एका विशिष्ट वजनात आणि विशिष्ट प्रमाणात मिळून तिथे गाठ बनते मग त्या गाठीत जिथे डोळे असले पाहिजे तेथे डोळे लागतात,जेथे कान असले पाहिजेत तेथे कान तयार होतात,जिथे मेंदू असला पाहिजे तेथे मेंदू तयार होतो,जिथे हृदय असले पाहिजे तेथे हृदय तयार होते. हाडे, मांस आपल्या जागी लागतात. सांगायचं तात्पर्य एकच की प्रत्येक अवयव आपल्या जागी जाऊन बसतो मग त्यात जीव ओतला जातो.
दृश्यशक्ती,श्रवण शक्ती वास आणि आस्वाद घेण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती विचार करण्याची शक्ती आणि अशा अनेक अमर्यादशक्ती त्यात भरल्या जातात तेव्हा बाळ परिपूर्ण होते. तेव्हा उदरामध्ये नऊ महिने पर्यंत जे घडते त्या पोटाचा लहानसा कारखाना नेटाने बाळास जन्म देतो. हा असा चमत्कार आहे ज्याला पाहून मानवी बुध्दी थक्क होते.
या चमत्काराच्या दर्शनानंतरही जो कोणी असे म्हणतो हे कार्य सृष्टीच्या निर्माणकर्त्या अल्लाह शिवाय घडत आहे तर त्या व्यक्तीच्या बुध्दीची कीव येते.
कोरोना काळामध्ये माणसं ऑक्सिजन शिवाय किड्या मुंग्यांप्रमाणे तडफडून मरत होती पण सृष्टिचा निर्माणकर्ता आम्हाला दररोज किती ऑक्सिजन न मागता देतो याचा आपण विचार जरुर करायला हवा.
जेंव्हा बी जमीनीत पेरण्यात येते आणि काही कालावधी नंतर जमीनीतून कणिस उगवते तेंव्हा एकाग्रचित्ताने विचार करणार्‍या व्यक्तीच्या तोंडून उत्सफुर्तपणे हे शब्द पडतात की महान आहे तो ईश्वर अल्लाह ज्याचे संपूर्ण सृष्टिवर नियंत्रण आहे.
वर उल्लेख केलेल्या अनेक उदारणांवरून आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की जगात कुठलेही कार्य मग ते लहान असो किंवा मोठे त्यासाठी जोपर्यंत एकच शक्ती जबाबदार असते तोपर्यंत ते कार्य व्यवस्थित आणि नियमितपणे पार पडू शकते. एका राज्याचे दोन शासक असल्याचे आपल्या ऐकिवात नाही आणि तसे घडल्यास त्या ठिकाणी अव्यवस्था माजत असते,भांडण तंटे होतात. बारा भाईंचा कारभार चव्हाट्यावर आल्याशिवाय राहत नाही. व्यवस्थितपणा नियमितपणा जगात जेथे आपण पाहतो त्या ठिकाणी एकच शक्ती कार्यरत असते आणि ती असल्याशिवाय व्यवस्थितपणाची आपण कल्पनाच करू शकत नाही.
पैगंबर मुहम्मद (स.) जेंव्हा त्याकाळी मक्केत इस्लामचा संदेश लोकांना सांगायचे तेंव्हा लोकं त्यांना अनेक प्रश्न विचारचे की कोण आहे अल्लाह ? काय वैशिष्ट्य आहे त्याचे? तेंव्हा अल्लाहने पैगंबर‍ांवर कुराणाचे एक प्रकरण अध्याय क्रमांक ११४ सुरह इख्लास अवतरीत केले ज्याचा अर्थ असा होतो १) हे पैगंबर (स.) तुम्ही त्यांना सांगा १)”अल्लाह एकच आहे”.२) तो आत्मनिर्भर (व स्वयंपूर्ण) आहे.३) त्याने कोणाला जन्म दिलेला नाही आणि तोही कोणापासून जन्माला आलेला नाही.४) त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही.
आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली तरी जगाच्या स्वामी ईश्वर अल्लाहची महीमा लिहणं संपणार नाही.
माझ्या सारख्या सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तिने त्याची महती सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न केला आहे. मी सृष्टिच्या निर्माणकर्त्या ईश्वर अल्लाहस प्रार्थना करतो की आमच्या चुकांना माफ कर

Leave a Comment