भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लेखाच्या या भागात आपण हेतू आणि उद्देशांच्या दृष्टीने लाभदायक ठरणाऱ्या रोजांच्या तीन स्तरांची चर्चा करणार आहोत.
4] कामेच्छा नियंत्रणाचा स्तर
लैंगिक प्रवृत्ती आणि कामवासना नियंत्रित करण्यासाठी देखील रोजे फायद्याचे आहेत. आधुनिक काळात जेथे प्रसारमाध्यमे निरनिराळ्या उत्पादनांची जाहिरात आणि त्यांच्या विक्रीकरिता स्त्रीदेहाला केवळ भोगवस्तू म्हणून सादर करीत असताना लैंगिक इच्छांवर नियंत्रणासाठी रोजे महत्वाची भूमिका बजावतात. रोजांमध्ये या शक्तिशाली इच्छांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे. रोजे लैंगिक इच्छा नियंत्रित करतात, कारण रोजांचे पालन करणार्या व्यक्तीला लैंगिक उत्तेजना देणारी प्रत्येक गोष्ट टाळावी लागते. अशाप्रकारे स्वतःला नियंत्रित करण्याची जाणीव निर्माण होते. ही जाणीव कामवासना कमी करण्यास मदत करते. एका प्रसंगी तरुणांना उद्देशून प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले,
“तरुणांनो, तुमच्यापैकी जे विवाहास पात्र आहेत, त्यांनी विवाह करावा. कारण ते तुमच्या डोळ्यांना आवर घालते आणि गुप्तांगांचे रक्षण करते. मात्र ज्यांची विवाहाची परिस्थिती नसेल, त्यांनी रोजांचे पालन करावे, कारण ते [वासनेविरुद्ध] ढाल आहेत.” (सहीह बुखारी) [1]
रोजांच्या काळात वैध लैंगिक कृत्यांपासून स्वतःला प्रवृत्त ठेवणाऱ्या व्यक्तीला, सामान्य दिवसांत निषिद्ध लैंगिक कृत्यांपासून स्वतःला दूर ठेवणे काहीच अवघड नाही. अशी व्यक्ती आपल्या लैंगिक भावनांवर नियंत्रण ठेवते. त्याच्या लैंगिकतेला उत्तेजित करू शकणाऱ्या साऱ्या कृत्यांपासून ती स्वतःला दूर ठेवते. अर्थातच या स्तरावर रोजांचे पालन करणाऱ्या व्यक्तीसाठी, त्याचे रोजे या जगात आणि मरणोत्तर जीवनात दोन्ही ठिकाणी लाभदायक ठरतात.
5] भावनांवरील नियंत्रणाचा स्तर
या स्तरावरील रोजांमध्ये मानवी मन आणि आत्म्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या अनेक नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवणे अभिप्रेत असते. उदा. राग सर्वाधिक विध्वंसक भावनांपैकी एक आहे. रोजांमुळे रागावर नियंत्रण प्राप्त करण्यास मदत मिळते. प्रेषित मुहम्मद [स.] आपल्या सहकाऱ्यांना उपदेश करताना म्हणाले,
“जेव्हा तुमच्यापैकी एखादी व्यक्ती रोजाचे पालन करीत असेल, तेव्हा त्याने लज्जास्पद कृत्ये आणि अनावश्यक बोलणे टाळावे, जर एखाद्याने प्रक्षोभक संभाषण सुरू केले किंवा वाद घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला ‘माझा रोजा आहे’ असे सांगावे. (सहीह बुखारी) [2]
अशाप्रकारे, या स्तरावरील रोजांचे पालन करणारी व्यक्ती आपल्या नकारात्मक भावनांवर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. प्रक्षोभक संभाषण आणि वादविवाद टाळते. एखादी व्यक्ती उद्धट भूमिका घेत असली तरी ती स्वतः मात्र उद्धटतेकडे झुकत नाही आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवते. त्याप्रमाणे, अशा व्यक्तीच्या मनातील मत्सराची नकारात्मक भावना कमी होते, कारण रोजांचे पालन करणारी प्रत्येक व्यक्ती रोजांद्वारे स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करीत असते.
6] मानसिक नियंत्रणाचा स्तर
या स्तरावर रोजांचे पालन करणारी व्यक्ती त्याच्या वाईट विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मानसिकदृष्ट्या प्रयत्न करीत असते. उदा. एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वार्थ आदि दुर्गुणांवर मात करणे अभिप्रेत आहे, यासाठी रमजानच्या रोजांद्वारे ती स्वतःला प्रशिक्षित करीत असते. यासंदर्भात आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून प्रेषित मुहम्मद [स.] म्हणतात,
“अल्लाहला अशा व्यक्तीच्या तहानभूकेची अजिबात पर्वा नाही, जी व्यक्ती रोजांचे पालन करीत असतानाही खोटे बोलण्यापासून आणि वाईट कृत्य करण्यापासून परावृत्त राहत नाही.” (सहीह बुखारी) [3]
ऐहिक समाधान आणि तृप्तीच्या या आधुनिक युगात, जेथे जगातील सर्वकाही मानवी गरजा आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरल्या जातात, तेथे त्यांच्याकडे या ऐहिक समाधानास काही काळासाठी टाळण्याची देखील क्षमता असते, हे महत्त्वाचे कौशल्य आहे. तात्कालिक तृप्ती आणि विलंबित तृप्तीमध्ये काही फरक असेल तर तो म्हणजे संयम होय. रोजांदरम्यान, संयम व त्यापासून प्राप्त होणाऱ्या लाभाचा अनुभव इमानधारक घेत असतात.
मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून, जगाच्या काही गोष्टींपासून काहीसे अलिप्त राहणे चांगले आहे. उत्कृष्ट आणि पूर्ण आयुष्याचा आनंद घेण्यात काहीच गैर नाही. एखाद्या व्यक्तीची अशी इच्छा असू शकते आणि असली पाहिजे. तथापि, हे महत्वाचे आहे की लोकांनी स्वतःला भौतिक गोष्टींपासून अलिप्त करण्यास सक्षम असावे, जेणेकरून त्या गोष्टींनी मानवी जीवनाला नियंत्रित करू नये. रोजांमुळे जीवनाला नियंत्रित करणाऱ्या अनेक व्यसनांवर मात करण्याची संधी मिळते. अनेक लोकांसाठी आहार सांत्वन व आनंद प्रदान करतो आणि त्यापासून स्वतःला ठराविक वेळेसाठी का असेना, अलिप्त राहण्याची क्षमता रोजांचे पालन करणार्यांना याची जाणीव करवून देते की, ते जे काही करतात आणि करीत नाहीत, यावर त्यांचेच नियंत्रण असते.
7] आध्यात्मिक लाभप्राप्तीचा स्तर
हा रोजांच्या विविध स्तरांपैकी सर्वात महत्वाचा आणि सर्वोच्च स्तर आहे. या स्तरावरील रोजे अल्लाहप्रति दक्षतेच्या स्तराचे रोजे आहेत. प्रेषित मुहम्मद [स.] यांनी यासाठीच प्रत्येक रोजाच्या प्रातःकाळी रोजांमागच्या हेतू आणि उद्देशाचे स्मरण करणे महत्वाचे ठरवले आहे. ते म्हणाले होते,
“फजर (पहाटे) च्या नमाजपूर्वी ज्याला त्याच्या रोजांच्या हेतू व उद्देशांचे स्मरण होत नाही, अशा व्यक्तीचा रोजा नाही.” (अबू दाऊद) [4]
रोजांच्या हेतू आणि उद्देशाचा नियमित पुनरुच्चार, आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रभावासाठी आवश्यक असलेल्या समर्पणाचा आध्यात्मिक पाया स्थापित करण्यासाठी महत्वाचा आहे. सहेतुक आणि उद्देशपूर्ण रोजे, मानवी अंतःकरणाचे शुद्धीकरण आणि त्याच्या पापाचे प्रायश्चित करण्याचे साधन ठरतात. प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले होते,
“जो कोणी निखालस इमानसह व अल्लाहकडून प्रतिफळ प्राप्त करण्यासाठी रमजानच्या रोजांचे पालन करतो, त्याचे पूर्वपाप माफ केले जातील.” [5] ते असेही म्हणाले होते, “एका रमजानपासून दुसऱ्या रमजानपर्यंतच्या पापांचे प्रायश्चित्त आहे.” [6] निखालस रोजे अल्लाहच्या सान्निध्य प्राप्तीस सहाय्यक ठरतात आणि विशेष प्रतिफळ मिळवून देतात. प्रेषितांनी शुभवार्ता दिली की, स्वर्गाच्या नंदनवनात ‘रय्यान’ नावाचे प्रवेशद्वार आहे, जे केवळ रोजांचे पालन करणार्यांसाठी राखीव आहे. त्यांनी असेही म्हटले की,
“रमजानमध्ये स्वर्गाचे दरवाजे सताड उघडले जातात.” (सहीह बुखारी) [7]
रोजे मुख्यतः व्यक्ती आणि अल्लाह यांच्यादरम्यान असतात, कारण कोणतीही व्यक्ती कोण रोजाचे पालन करीत आहे आणि कोण नाही, याची खात्री करू शकत नाही. रोजांच्या या पैलूकडे लक्ष वेधताना प्रेषितांनी अल्लाहचे म्हणणे उद्धृत केले होते,
“आदमच्या संतानची प्रत्येक कृती त्याच्यासाठीच आहे, मात्र रोजे माझ्यासाठी आहेत आणि मीच त्यांचा पुरेपूर मोबदला देईन.” (सहीह मुस्लिम) [8]
रोजांचे उपरोक्त तिन्ही स्तर शेवटच्या स्तरात एकत्रित होतात. ज्या व्यक्तीचा रोजा या स्तराचा असेल अशी व्यक्ती रोजांमुळे अंतर्बाह्य बदलून जाते. अशा व्यक्तीचे अध्यात्म पुनर्संचयित होते, जे त्याला पुनरुज्जीवित करते आणि त्याचा पुनर्जन्म प्राप्त होतो. त्याच्या व्यक्तिमत्व आणि चारित्र्यात आमूलाग्र बदल घडून येतात.
रमजानच्या महिन्याच्या शेवटी नव्या महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी, नवचंद्र दिसल्यानंतर, ‘ईद-उल-फित्र’ हा विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गरिबांना निर्धारित प्रमाणात धान्य दान केले जाते, आंघोळ करून आणि शक्यतो नवे कपडे परिधान करून, सकाळी सकाळी सामुहिक नमाज अदा केली जाते. त्यानंतर मेजवानी आणि नातेवाईक व मित्रांना भेटी दिल्या जातात.
रमजानव्यतिरिक्त वर्षभरात अन्य दिवसात देखील रोजांचे पालन केले जाते. रमजाननंतरचा महिना शव्वालमध्ये सहा दिवसाचे रोजे, दर आठवड्यात सोमवार व गुरुवारचे रोजे, वर्षाचा पहिला महिना मोहरमच्या नऊ-दहा किंवा दहा-अकरा तारखेचे रोजे, वर्षाचा शेवटचा महिना जिलहज्जच्या दहा तारखेचा अशुराह रोजा – जो ज्यूंसाठी [किप्पूर] देखील रोजाचा दिवस आहे – हे काही महत्वाचे रोजे आहेत. मात्र रोजांसाठी प्रोत्साहन दिले जात असताना, निरंतर रोजा किंवा अन्नपाण्याचा त्याग, ब्रह्मचर्य आणि संन्यास, इस्लामने पूर्णतः निषिद्ध केला आहे. तसेच ईद-उल-फितर आणि ईद-उल-अजहा, या दोन्ही सणांच्या दिवशी, रोजाचे पालन करण्यास सक्त मनाई केली आहे.
संदर्भ:
[1] इमाम बुखारी, सहीह, किताबुस सियाम, १५
[2] इमाम बुखारी, सहीह, किताबुस सियाम, १४
[3] इमाम बुखारी, सहीह, किताबुल अदब, ८७
[4] इमाम नसाई, सुनन, किताबुस सियाम, २४९
[5] इमाम इब्ने माजाह, सुनन, किताबुस सियाम, ४
[6] इमाम मुस्लिम, सहीह, किताबुत तहारत, १९
[7] इमाम बुखारी, सहीह, किताबुस सियाम, ८
[8] इमाम मुस्लिम, सहीह, किताबुल लिबास, १४२