रोजा कशासाठी भाग – १ (Fasting – Roza For Whom?)

आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या सभोवताली अनेकांना विविध प्रकारचे उपवास करताना पाहिले असेल. तळलेले किंवा शिजवलेले पदार्थ न खाण्याचे उपवास, केवळ फळाहाराचे उपवास, केवळ उकळलेले पदार्थ खाण्याचे उपवास, नानाविध प्रकारच्या रोगांनी ग्रस्त असलेल्या लोकांचे शुगर फ्री अथवा डाएट उपवास वगैरे. या उपवासांना विविध प्रकारच्या नावांनी संबोधले जाते. यापैकी काही उपवास धार्मिक आहेत तर काही आरोग्यविषयक गरजेतून निर्माण झाले आहेत. मात्र या सर्व उपवासांहून अगदी भिन्न प्रकारचे उपवास देखील समाजात प्रचलित आहेत. आणि हे उपवास समाजातील जवळपास सर्वच स्त्रि-पुरुषांकडून, लहान-मोठ्यांकडून, गरीब-श्रीमंतांकडून अखिलार्थ संपूर्ण समाजाकडून पाळले जातात. हे उपवास एखाद्या दिनविशेषच्या मुहूर्तावर अथवा मोजक्या काही दिवसांसाठी नव्हे तर पूर्ण महिनाभर पाळले जातात. रोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अन्नपाण्याशिवाय एका महिन्याभरच्या उपवासांचे काटेकोरपणे पालन करण्याची परंपरा म्हणजेच आपल्या सर्वांच्या ओळखीची रमजानच्या रोजांची परंपरा.

उपवास सर्व धर्मांमध्ये विहित करण्यात आले आहेत

मराठी विश्वकोशात देण्यात आलेल्या व्याख्येनुसार, ‘उपवास म्हणजे विशिष्ट कालमर्यादेत मुख्यतः आहार वर्ज्य करण्याचे व्रत होय.’ ही संकल्पना जगातील बहुतेक प्रमुख धर्मांमध्ये आढळून येते. उदा, हिंदू धर्मात याला संस्कृतमध्ये उपवास म्हणतात. धार्मिक हिंदूबांधव त्यांच्या कुळ वा वंशदैवतांची भक्ती म्हणून किंवा त्यांच्या तपश्चर्येचा भाग म्हणून विशेष प्रसंगी उपवास करतात. बहुतेक धार्मिक हिंदूबांधव नियमितपणे वा धार्मिक सणांसारख्या विशेष प्रसंगी उपवास करतात. अशा दिवशी ते अजिबात खात नाहीत, एकदाच खातात किंवा फळे वा साधा आहार घेतात. ज्यू लोक किप्पूर दिवशी म्हणजे पश्चातापाच्या १० दिवसांपैकी शेवटच्या दिवशी, तिश्रीच्या १० तारखेला उपवास करतात. त्या दिवशी खाणेपिणे, घरगुती कामकाज आणि शारीरिक संबंध या सारख्या अनेक बाबीपासून परावृत्त राहतात. तसेही शब्बाथच्या दिवशी श्रमबंदी लागू असतेच. जुना करारात, प्रेषित मोशे [शांती असो] यांनी उपवास पाळल्याचा उल्लेख आहे.

‘तो तेथे ४० दिवस आणि ४० रात्रींसाठी होता आणि त्याने भाकरी खाल्ली नाही की पाणीही पिले नाही.’ (निर्गम ३४:२८) [1]

ख्रिश्चनांमधील कॅथोलिकांसाठी, लेंट हा उपवासाचा निर्धारित काळ आहे, जो येशूंच्या ४० दिवसांच्या उपवासाच्या अनुकरणार्थ पाळला जातो. ४थ्या शतकात पवित्र आठवड्यापूर्वी किंवा इस्टरच्या सहा आठवडे पूर्वीपासून उपवास पाळले जात असत. सातव्या शतकात बहुतांश ठिकाणी ४० दिवसांच्या उपवासांची प्रथा रूढ झाली. प्रेषित येशूने [शांती असो] देखील मोशेप्रमाणे उपवास केल्याची नोंद नवा करारात आहे.

“आणि त्याने ४० दिवस आणि ४० रात्री उपवास केला आणि नंतर त्याला भूक लागली.” (मत्तय ४:२ आणि लूक ४:२) [2]

भारतीय मुस्लिम समाजासंदर्भात उपवासांना रोजे म्हटले जाते. मुस्लिमांसाठी रोजे अनिवार्य आहेत. यासंदर्भात अल्लाहने कुरआनात म्हटले आहे, “इमानधारकांनो! तुमच्यासाठी रोजे विहित करण्यात आले आहेत, जसे तुमच्या पूर्वीच्या लोकांवर विहित करण्यात आले होते, जेणेकरून तुम्ही अल्लाहप्रती जागरूक रहावे.” (कुरआन २:१८३) [3]

रोजे सर्वोत्तम धार्मिक कृत्यांपैकी आहेत

वरील आयातीतील उल्लेखाप्रमाणे, जरी बहुतेक धर्मांमध्ये, उपवास हे आपल्या किंवा इतरांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी असतात, परंतु इस्लाममध्ये ते मुख्यतः अल्लाहच्या सान्निध्य प्राप्तीकरिता आहेत. अल्लाहप्रति जागरूक असणे धार्मिकतेची पूर्वअट असल्याने इस्लाममध्ये रोजांवर असामान्य भर देण्यात आला आहे. म्हणूनच आश्चर्य नसावे की, जेव्हा प्रेषित मुहम्मद [शांती असो] यांना विचारण्यात आले,

“सर्वोत्तम कृती कोणती आहे?” तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “रोजांचे पालन करणे, कारण त्यासमान काहीच नाही.” (नसाई) [4]

मानवी चारित्र्याच्या अनेक पैलूंप्रमाणे रोजांचे देखील विविध स्तर आहेत. ईश्वरी हेतूच्या पूर्ततेसाठी मानवी अस्तित्वाच्या सर्व पैलूंना सामील करून रोजांचे पालन न्याय्य पद्धतीने करणे महत्वाचे आहे. मात्र रोजांच्या हेतू व उद्देशांपासून अनभिज्ञ असणाऱ्या लोकांकडून रोजांचे ज्याप्रकारे पालन केले जाते, त्या आधारे रोजांचे काही प्रमुख स्तर निर्धारित करता येतात. ते स्तर खालीलप्रमाणे आहेत.

1] निव्वळ विधीपूर्ततेचा स्तर

रोजांच्या या स्तरावर रोजांचे पालन करण्यासाठी काही मूलभूत अटींची पूर्तता महत्वाची असते. म्हणजे दरवर्षी रमजान महिन्याच्या २९ किंवा ३० दिवस पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्नपाणी वर्ज्य करणे आणि पत्नीशी लैंगिक संबंध टाळणे होय. निव्वळ या अटींच्या पूर्ततेद्वारे रोजांचे पालन करणारी व्यक्ती रोजांच्या उद्देशांचा विशेष विचार न करता केवळ अन्नपाणी आणि वैध लैंगिक संबंध टाळत असते. अर्थातच असा रोजा दृश्य स्वरुपात इस्लामिकदृष्ट्या रोजा गृहीत धरला जात असला तरी, उद्देशपूर्ती होत नसेल तर आणि त्याचा उपवास करणार्‍या व्यक्तीवर कसलाच परिणाम होत नसेल तर तो पूर्णतः निरर्थक ठरतो. रोजांचा हेतू आणि उद्देश समजून न घेता केवळ दृश्य अटींचे पालन करण्यासाठी रोजांचे नियम पाळले जात असतील तर असा रोजा आध्यात्मिक दृष्ट्या लाभदायक ठरत नाही. त्याप्रकारे असा रोजा त्या व्यक्तीसाठी पापाचे प्रायश्चित करण्याचे साधनही ठरणार नाही की, त्याद्वारे त्याला अल्लाहचे सान्निध्यही प्राप्त होणार नाही. या स्तराचा रोजा अत्यंत उथळ स्वरूपाचा असतो.

2] शारीरिक लाभप्राप्तीचा स्तर

एखाद्या व्यक्तीचा रोजांमागचा उद्देश केवळ ‘शारीरिक लाभप्राप्ती’ देखील असू शकतो. या स्तरावर रोजा पाळणाऱ्या व्यक्तीने प्रेषितांच्या रोजांच्या पद्धतीचे अनुकरण केल्यास त्याला इच्छित असलेली शारीरिक लाभप्राप्ती होऊ शकते. जसे प्रेषित मुहम्मद [स.] पहाटे किमान अल्पोपहार करायचे व सूर्यास्ताच्या वेळी उपवास सोडण्यासाठी संतुलित जेवण [इफ्तार] करायचे. पोटभरून जेवण करणे ते नेहमीच टाळत असत. अशाप्रकारचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला शारीरिक लाभप्राप्त होतात. प्रेषितांचे या संदर्भात म्हणणे होते की,

“मनुष्याला भरावे लागणारे सर्वात वाईट कोठार म्हणजे त्यांचे पोट. व्यक्तीची पाठ सरळ ठेवण्यासाठी अन्नाचे काही तुकडे पुरेसे आहेत. तथापि, जर त्याची इच्छा जास्तीचीच असेल, तर त्याने [जेवनावेळी] केवळ एक तृतीयांश पोट [अन्नाने] भरावे, एक तृतीयांश पाण्याने भरावे आणि श्वासाठी एक तृतीयांश रिकामे सोडून द्यावे.” (इब्न माजाह) [5]

प्रेषित सूर्यास्ताच्या नमाजपूर्वी काही ताज्या किंवा वाळलेल्या खजूर आणि एक ग्लास पाण्याने आपला रोजा सोडत असत. रोजांचा हा स्तर व्यक्तीला शारीरिक लाभ तर देतोच, सोबतच उपासमारीची वेदना अनुभवण्याची संधी देतो आणि जगाच्या इतर भागात अन्नपाण्याविना मरणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती निर्माण करतो. असे असूनही, या स्तरावर रोजांचे पालन करणारी व्यक्ती रोजांच्या अध्यात्मिक लाभला मुकते.

3] वैद्यकीय लाभप्राप्तीचा स्तर

न्यूरोट्रांसमीटर म्हणजे मेंदूतील अशी रसायने, जी संदेश पाठवण्याचे व भावना उत्पन्न करण्याचे कार्य करतात, ती रोजांमुळे प्रभावित होतात. उपवासामुळे एन्डॉर्फिन – आरोग्य आणि आनंदाच्या भावनांशी संबंधित असणाऱ्या न्यूरोट्रांसमीटर प्रणालीला अधिक एन्डॉर्फिन तयार करण्यासाठी उत्तेजन करते. येथे रोजांचा लाभ हा कसल्याही शारीरिक श्रमाशिवाय व्यायामाच्या परिणामासारखाच असतो. वैद्यकीय तज्ञांनी नमूद केले आहे की, रोजांमुळे आरोग्य अनेक प्रकारे सुधारते. उदा, रोजांवेळी शरीर संचयित कोलेस्टेरॉल वापरते, जे बहुतेक वेळा रक्तवाहिनीमध्ये तसेच शरीराच्या इतर भागात साचलेले असते. अशाप्रकारे, रोजांमुळे शरीर सदृढ राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. अर्थातच हे शारीरिक आणि आरोग्य विषयक लाभ प्राप्त होत असले तरी या उद्देशांना डोळ्यांसमोर ठेऊन रोजांचे पालन करणाऱ्या व्यक्तीला रोजांचा वास्तविक लाभ प्राप्त होत नसतो. या संदर्भात प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले होते,

“रोजांचे पालन करूनही अनेकांना तहानभूकेशिवाय काहीच मिळणार नाही.” (इब्न माजा) [6]

दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराचे रोजे पहिल्या स्तराच्या रोजांपेक्षा चांगले वाटत असले तरी हेतू आणि उद्देशांच्या दृष्टीने त्यांच्यात कसलाच फरक आढळत नाही. म्हणून या तिन्ही स्तराचे रोजे मानवासाठी विशेष लाभदायक सिद्ध होत नाहीत. निव्वळ एक प्रथा-परंपरा म्हणून, शारीरिक किंवा वैद्यकीय लाभप्राप्तीसाठी रोजांचे पालन केल्याने रोजांचा हेतू आणि उद्देश प्राप्त होत नाही. म्हणून या तिन्ही स्तरावरील रोजे हेतू आणि उद्देशपूर्तीच्या दृष्टीने निरर्थक ठरतात.

या लेखाच्या दुसऱ्या भागात आपण रोजांच्या हेतू आणि उद्देशपूर्तीच्या दृष्टीने लाभदायक ठरणाऱ्या तीन स्तरांबद्दल जाणून घेणार आहोत.


संदर्भ:

[1] जुना करार, निर्गम, ३४:२८

[2] नवा करार, मत्तय ४:२ आणि लूक ४:२

[3] कुरआन, सुरह बकरा, आयत १८३

[4] इमाम नसाई, सुनन, किताबुस सियाम, १३३

[5] इमाम इब्ने माजाह, सुनन, किताबूत तआम, ९९

[6] इमाम इब्ने माजाह, सुनन, किताबूत सियाम, ५३

Leave a Comment