रमजानचे दिवस आणि रात्र – भाग १ (Days and Nights of Ramadan)

रमजान हा महिना मुस्लिमांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण या महिन्यात जगभरातील मुस्लिम विविध उपासना करतात, ज्यापैकी सर्वात महत्त्वाची उपासना रोजा आहे. रोजा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. सुदृढ सशक्त तरुण, युवक आणि प्रौढांसाठी रोजे अनिवार्य आहेत. रमजान महिना या अनुषंगाने देखील महत्वाचा आहे की, याच महिन्यात प्रेषित मुहम्मद [स.] यांच्यावर अल्लाहकडून मार्गदर्शन ग्रंथ कुरआनच्या अवतरणाला सुरुवात झाली. म्हणून या महिन्याला ‘कुरआनचा महिना’ देखील म्हटले जाते. या महिन्यात लोक आणि समाज जीवनात लक्षणीय बदल घडून येत असतात. हा लेख या महत्वाच्या महिन्याच्या संदर्भात मुस्लिमांच्या दिवस-रात्रींचे वर्णन करण्यासाठी आहे.

पहाटेचे जेवण

“[रमजानमध्ये रोजांचे पालन करताना] पहाटेचे जेवण घ्या, कारण त्यात कृपा आहे.” [1]

जरी बंधनकारक नसले तरी, रमजानमध्ये मुस्लिम कुटुंब पहाटे लवकर उठतात आणि प्रेषितांच्या या शिकवणीच्या अंमलबजावणीसाठी अल्पोपहार घेतात. सहसा, मुस्लिमांचा दिवस पहाटेच्या नमाजने सुरू होतो, जेव्हा आकाशात प्रकाशाच्या पहिल्या खुणा दिसू लागतात. तसेच हीच ती वेळ आहे, जेव्हा एखादी व्यक्ती अन्नपाणी टाळून रोजाची सुरू करते. प्रेषित मुहम्मद [स.] यांनी मुस्लिमांना त्या वेळेपूर्वी उठण्यास आणि अल्पोपहार करण्यास प्रोत्साहित केले आहे.

यावरून हे स्पष्ट होते की, रोजा म्हणजे एखाद्याने दिवसभर तहानभूक लागू नये म्हणून तो पहाटेच अन्नपाण्यावर तुटून पडणे नव्हे. वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे की, केवळ अल्लाहच्या संतुष्टीसाठी आपली जीवनशैली बदलणे म्हणजे रोजा. सहसा वर्षभर पहाटेची नमाज चुकवणारी व्यक्ती रमजानच्या महिन्यात आवर्जून पहाटे उठते, अल्पोपहार [सहेरी] करते आणि नमाजसाठीच्या अजानची आवाज कानावर पडल्या बरोबर मस्जिदकडे धाव घेते. अशाप्रकारे अशा व्यक्तीला प्रातःकाळी उठण्याची सवय लागते. त्याला उर्वरित वर्षासाठी पहाटेची नमाज कायम करण्याचे प्रशिक्षण मिळते.

स्वैच्छिक नमाजपैकी अल्लाहला सर्वात प्रिय म्हणजे ‘कियाम-उल-लैल’ अथवा रात्रीच्या अंतिम प्रहरीची नमाज. ही नमाज पहाटेच्या फजर नमाजपूर्वी एकांतात अदा केली जाते. ही नमाज अल्लाहला अत्यंत प्रिय आहे. लोक त्यांच्या अंथरुणाला खिळलेले असताना अल्लाहचे प्रामाणिक सच्चे भक्त रात्रीच्या अंतिम प्रहरी एकांतात नमाज अदा करतात. अल्लाहने कुरआनमध्ये या नमाजचे वर्णन असे केले आहे,

“ते त्यांच्या अंथरुणातून बाहेर पडतात आणि भीती व उत्कट आशेने त्यांच्या प्रभूचा धावा करतात…” [2]

तसेच ही नमाज इमानधारकांना सहेरीसाठी भल्या पहाटे उठण्यासाठी देखील प्रोत्साहित करते, जे इतरांसाठी सामान्यतः कठीण जाते. सहेरी भल्या पहाटे केली जाते आणि मुअज्जिन अर्थात अजान देणाऱ्या व्यक्तीच्या अजानचा आवाज ऐकू येईपर्यंत लोक जेवत असतात. जेव्हा स्थानिक मस्जिदीतून अजान दिली जाते, तेव्हा त्याचा अर्थ सहेरीची वेळ संपली आणि प्रकाशाच्या पहिल्या खुणा स्पष्ट दिसू लागल्या आहेत, असा होतो. अजान होताच सहेरी थांबववून लोक दिवसातून पाच वेळा अनिवार्य असलेल्या नमाजसाठी स्थानिक मस्जिदकडे धाव घेतात. मस्जिदमध्ये सामूहिक नमाज कायम करणे मुस्लिमांसाठी अनिवार्य कर्तव्य आहे.

कुरआनचा महिना

पहाटेच्या नमाजला हजर राहिल्यावर, बरेच लोक काही काळ मस्जिदीत बसून राहतात आणि कुरआनचे किंवा कुरआनातील काही भागाचे वाचन करतात. इस्लामने त्याच्या अनुयायांसाठी कुरआनचे वाचन आणि त्यानुसार आचरण अनिवार्य केले आहे. जगातील अन्यकाही धर्मांप्रमाणे आपल्याच अनुयायांवर धर्मग्रंथ वाचण्यास वा समजून घेण्यास इस्लामने बंदी घातली नाही. याउलट त्यांनी धर्मग्रंथ वाचवा, त्याची पारायणे करावीत, तो समजून घ्यावा आणि त्यानुसार आचरण करावे, यासाठी व्यवस्था करून ठेवली आहे.

“इमानधारक फक्त तेच आहेत, ज्यांचे अंतःकरण अल्लाहचा उल्लेख येताच उत्तरदायित्वाच्या जाणीवेने थरथरतात आणि जेव्हा त्यांच्यासमोर अल्लाहच्या संदेशाचे वाचन केले जाते, तेव्हा त्यांचा अल्लाहवरील इमान आणखी दृढ होतो.” [3]

प्रेषितांनी कायम केलेल्या आदर्शानुसार सामान्य मुस्लिम देखील ज्या महिन्यात कुरआन अवतरीत करण्यात आले, त्या महिन्यात त्याचे संपूर्ण पठण करण्यास अधिक उत्साही असतात. मागील काही दशकांपूर्वी कुरआनचा अर्थ समजून न घेता केवळ मूळ अरबी वाचण्याची प्रथा उपखंडात प्रचलित होती. परंतु मागील ३ दशकांत ही प्रथा मागे पडून कुरआनचा अर्थ समजून घेण्याची परंपरा रूढ होत आहे. याच कारणामुळे मागील ३ दशकात कुरआनचे अनेक अनुवाद प्रकाशित झाले आहेत आणि अजूनही होत आहेत.

“रमजानच्या प्रत्येक रात्री अल्लाहचे दूत जिब्रईल त्यांच्याकडे येत आणि ते एकमेकांना कुरआन वाचून दाखवत असत.” [4]

मुस्लिम जगतात रमजानमध्ये बरेचदा, तुम्हाला दिवसाच्या कोणत्याही भागात क्वचितच एखादी मस्जिद रिकामी दिसेल. कुरआनचे पठन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी मुस्लिम लोक या महिन्यात विशेष वेळ काढून प्रयत्न करतात.

दिवसाचे उपवास

बहुतेक मुस्लिम देशांमध्ये, रमजानच्या अध्यात्मिक लाभप्राप्तीसाठी कर्मचारी आणि नोकरांना त्यांच्या कार्यभारातून काही सवलत दिली जाते. त्यांच्यावरील कामाचा भार कमी केला जातो. तसेच शाळकरी मुलांना रात्रीच्या उपासनेसाठी आणि सकाळी सहेरीसाठी आणि नियमित नमाजची शिस्त लावण्यासाठी शाळेचे वेळापत्रक बदलले जाते. कार्यालयीन वेळ काही तास पुढे ढकलली जाते आणि कालावधीही कमी केला जातो. बहुतेक व्यवसाय संध्याकाळपूर्वीच बंद होतात. मात्र काही दुकाने रात्रभर सुरू असतात.

पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत दिवसभर अगदी तीव्र उष्णता असली तरी अन्नपाणी आणि जीवनसाथीशी लैंगिक संबंध टाळून मुस्लिमांमध्ये अल्लाहच्या आज्ञा पालनाची भावना निर्माण केली जाते. कारण ते या कालावधीत सामान्यपणे पूर्णतः परवानगीकृत असलेल्या गोष्टीपासून परावृत्त राहतात. यामुळे मुस्लिमांमध्ये एक प्रकारची विवेकबुद्धी निर्माण होते, जी त्यांना नेहमी अशी अनुज्ञेय कृत्ये सोडण्यास प्रवृत्त करते. पाण्याच्या अभावामुळे घसा कोरडा पडला तरी दिवसभर डोळ्यांसमोर येणारे सर्व अन्नपदार्थ वर्ज्य करून, ईशभिरुत्व प्राप्त करतात आणि हाच रमजान महिन्याच्या रोजांचा उद्देश आहे. याबाबत अल्लाह कुरआनमध्ये म्हणतो,

“इमानधारकांनो, तुमच्यासाठी रोजे विहित करण्यात आले आहेत, जसे तुमच्या पूर्वीच्या लोकांसाठी विहित करण्यात आले होते, जेणेकरून तुम्ही ईश्वराभिमुख व्हावे.” [5]

रोजा व्यक्तिगत उपासना आहे, जी रोजांचे पालन करणारी व्यक्ती अल्लाहला अर्पण करते. एखादी व्यक्ती कुणालाही कळू न देता एकांतात खाऊपिऊ शकते… मात्र ती असे करीत नाही. कारण कोणीही पाहत नसला तरी अल्लाह पाहतो आहे, याची जाणीव रोजांनी त्याच्या मनात पूर्वीच निर्माण केलेली असते. याच कारणास्तव, आपण पाहतो की वाममार्गी लागलेले मुस्लिम या आशीर्वादित महिन्यात, त्याच्या पवित्रतेमुळे, त्यांचा जीवनमार्ग बदलतात आणि त्यांच्यापैकी काही संपूर्ण आयुष्यासाठी अल्लाहच्या मार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करण्याचा संकल्प करतात.

प्रेषितांनी मुस्लिमांना काही पापांबद्दल चेतावणी दिली, ज्यामध्ये ते सहज पडू शकतात आणि अशाप्रकारे रोजांचे हेतू उद्देश नष्ट करू शकतात. प्रेषित मुहम्मद [स.] म्हणतात,

“जो कोणी खोटे बोलणे आणि त्याप्रमाणे वागणे थांबवत नाही, त्याने आपले खाणेपिणे सोडण्याची अल्लाहला काहीच गरज नाही.” [6]

उद्धटपणे वागणाऱ्या आणि चिथावणी देणाऱ्यासही त्यांनी इशारा दिला. त्यांनी मुस्लिमांना उद्देशून म्हटले की, रोजांच्या कालावधीत तुम्हाला भडकावणाऱ्याला आणि उत्तेजित करणाऱ्याला केवळ इतके सांगत चला की,

“मी रोजांचे पालन करतो आहे, खरंच मी रोजांचे पालन करतो आहे.” [7]

इफ्तार किंवा नाश्ता

जसजसा दिवस मावळायला लागतो, लोक सूर्यास्ताची वाट पाहत आपल्या घरी परततात. या वेळी घरातील स्त्रिया या सहसा नाश्ता आणि रात्रीचे जेवण तयार करण्यात व्यस्त असतात, तर पुरुष सहसा त्यांच्या कामावरून परततात आणि एकतर कुरआन पाठ करण्यासाठी वेळ काढतात किंवा नाश्ता तयार करण्यात मदत करतात. सूर्यास्ताच्या आधी, कुटुंबातील सर्व सदस्य मुअज्जिनच्या प्रतीक्षेत जेवणाच्या टेबलावर जमतात, या वेळेचा सदुपयोग करताना अल्लाहकडे दयेची आणि मार्गदर्शनाची याचना करतात.

प्रेषितांच्या काही सहकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे “रमजान महिन्याच्या रोजांचे पालन करणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी एक विशेष दुआ असते, ज्याची स्वीकृती त्यांनी रोजा सोडताना केली जाते.” एकदा अजानची हाक ऐकू आली की, लोक प्रेषितांचे अनुकरण करताना खजूर खाऊन, पाणी पिऊन रोजा सोडण्याची घाई करतात आणि प्रेषितांनी शिकवलेल्या कृतज्ञतेच्या पुढील शब्दांचा पुनरुच्चार करतात.

“तहान शमली, घसा ओलसर झाला आणि आतड्या भरून निघाल्या आहेत. अल्लाहने इच्छिले तर बक्षीसही निश्चितच दिले जाईल.”[8]

नंतर विविध खाद्यपदार्थ आणि पेय असलेले हलके जेवण केले जाते. बर्‍याच वेळा, एकतर एकमेकांना इफ्तारसाठी आमंत्रित केले जाते, नाहीतर खाद्यपदार्थांचे ताट शेजाऱ्यांकडे पाठवले जातात. किमान रमजानमध्ये तरी समाजातील गरिबांना पोटभर जेवण मिळावे म्हणून मुस्लिम समाजातील अनेक दानशूर लोक मस्जिदमध्ये इफ्तार आणि जेवणाची व्यवस्था करतात. मुस्लिम अल्पसंख्याक देशांमध्ये अन्यधर्मीय समाज बांधवांशी असणारे संबंध दृढ करण्यासाठी मस्जिदमध्ये इफ्तारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्रात इफ्तारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे श्रेय जमाते इस्लामी हिंदला जाते. त्यांनीच ही संकल्पना महाराष्ट्रात सर्वार्थाने रूढ केली.

प्रेषित मुहम्मद [स.] यांनी या आशीर्वादित महिन्यात इतरांना खायला देण्यास प्रोत्साहित केले. आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले,

“जो कोणी रोजांचे पालन करणाऱ्या एखाद्या गरजूच्या रोजा सोडण्याची व्यवस्था करेल, त्याला त्याच्या बरोबरीचे प्रतिफळ दिले जातील.” [9]

रमजानमध्ये अन्नाशी निगडीत महिन्याभराच्या गरजांच्या पूर्ततेसाठी सेवाभावी संस्थांकडून महिन्याच्या सुरुवातीला गरजवंत कुटुंबांना रेशनचे वाटप केले जाते. मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर आणि नागपूर सारख्या शहरातून रमजानच्या महिन्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे राशन मोफत वितरीत केले जाते. एखाद दुसरा अपवाद वगळता प्रत्येक मुस्लिम सढळहस्ते दान करतो. आपण इतरांच्याही जेवणाची व्यवस्था केली, हे माहित झाल्यावर रोजा सोडताना मिळणारा आनंद अतुल्य आणि अवर्णनीय असतो. गर्भश्रीमंत लोकांच्या ताटातले पदार्थही देऊ शकणार नाहीत, अशी चव शिळी भाकरी देऊन जाते. प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले होते,

“रोजांचे पालन करणार्‍या व्यक्तीला आनंदाचे दोन अतुलनीय क्षण अनुभवायला मिळतील. एक – जेव्हा तो रोजा सोडतो आणि दुसरा – जेव्हा तो त्याच्या पालनकर्त्याला भेटतो.” [10]

इफ्तारची वेळ मोठ्या जेवणाची वेळ नसते, कारण सूर्यास्त मगरीबच्या विहित नमाजची वेळ असते. इफ्तार होताच लोक मगरीबच्या नमाजला उपस्थित राहण्याची तयारी करतात. सहसा इफ्तार मस्जिद किंवा मस्जिद जवळच्या परिसरात केला जात असल्याने मस्जिदला बहुतेक चालतच जावे लागते. काही ठिकाणी मस्जिद दूर असते. संध्याकाळच्या नमाजला उपस्थित राहिल्यानंतर, काही मुस्लिम रात्रीचे जेवण करतात, तर काहीजण रात्रीची नमाज संपेपर्यंत जेवण्यास उशीर करतात. रात्रीच्या ईशाच्या नमाजनंतर रमजान निमित्त विकसित झालेल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेऊन लोक आपापल्या घरांकडे अथवा मस्जिदकडे परततात.


संदर्भ:

[1] बुखारी, सहीह, किताबुस सियाम, ३२

[2] कुरआन, सुरह सज्दा, सुरह ३२, आयत १६

[3] कुरआन, सुरह अन्फाल, सुरह ८, आयत २

[4] बुखारी, सहीह, किताबुस सियाम, १२

[5] कुरआन, सुरह बकरा, सुरह २, आयत १८३

[6] बुखारी, सहीह, किताबुल अदब, ८७

[7] अबू दाउद, सुनन, किताबुस सियाम, ५१

[8] अबू दाउद, सुनन, किताबुस सियाम, ४५

[9] तिर्मिजी, जामेअ, किताबुस सौम, १२६

[10] मुस्लिम, सहीह, किताबुस सियाम, २१४

Leave a Comment