रमजान संपले, आता काय? (Ramadan over, What now?)

इस्लामी कॅलेंडरमधील दोन प्रमुख उत्सवांपैकी एक रमजानची नुकतीच सांगता झाली आहे. महिन्याच्या शेवटी ईद उल फित्र सणाचा दिवस असतो. अरबी भाषेत ईद म्हणजे अशी गोष्ट जी परत येते आणि विशिष्ट कालावधीत तिची पुनरावृत्ती होत असते. नंतर ईद शब्दाचा अर्थ सण असा विकसित झाला. फित्र हा इफ्तारचा मूळ शब्द असून तो रोजांच्या महिन्याचा शेवट दर्शवतो. लोक हा सण साजरा करतात, कारण अल्लाहने त्यांना रोजांचे पालन करण्याची व त्याद्वारे आध्यात्मिक लाभप्राप्ती करण्याची संधी दिली. हा सण साजरा करण्यामागे त्यांचा असीम आनंद आणि अल्लाहप्रति कृतज्ञता यासाठी असते की, अल्लाह त्याच्या असीम दया व कृपेने, त्यांच्या सत्कृत्यांचा स्वीकार करू शकतो आणि त्यांना बक्षीस देऊ शकतो.

रमजानच्या शेवटच्या सायंकाळी आदल्या रात्रीचा चंद्र दिसल्यानंतर, रमजानचा आशीर्वादित महिना संपल्याचे स्पष्ट होते. मुस्लिम लोक पहाटेच्या नमाजसाठी आणि अतिशय खास दिवसाची सुरुवात करण्यासाठी भल्या पहाटे उठतात. आंघोळ करतात आणि ईदच्या नमाजच्या तयारीसाठी नवे कपडे घालतात. ईद साजरी करताना नवीन कपडे घालण्याची मुस्लिमांची परंपरा आहे. ईदचा दिवस अल्लाहच्या कृपाप्रसादांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. ईदच्या दिवशी रोजांचा महिना संपला आहे, या वस्तुस्थितीवर विशेष जोर देण्यासाठी नमाजसाठी निघण्यापूर्वी काही खजूर खाणे ही उपासना आहे आणि त्यामुळे ईदच्या दिवशी उपवास करण्यास मनाई आहे. तो आनंद साजरा करण्याचा आणि अल्लाहचे स्मरण करण्याचा दिवस आहे.

ईदची नमाज मस्जिदऐवजी मोठ्या मोकळ्या मैदानात, ईदगाह येथे अदा केली जाते. परंतु प्रतिकूल हवामान अथवा पुरेशा व्यवस्थेचा अभाव असल्यास वेळप्रसंगी ईदची नमाज मस्जिदमध्ये अदा केली जाऊ जाते. नमाजसाठी ईदगाहकडे जाताना लोक पायी किंवा वाहनाने जातात. बहुतेक लोक पायी चालण्यास प्राधान्य देतात. नमाज अदा करण्यासाठी गालिचे सोबत घेऊन जातात. ते जाताना अल्लाहचा गौरव करतात. गौरव उद्गारातील शब्द आहेत “अल्लाह महान आहे, अल्लाहशिवाय कोणीही पूजनीय नाही; अल्लाह महान आहे, कृतज्ञता त्याच्यासाठीच आहे.” अनेक ठिकाणी लोक नमाजसाठी सहकुटुंब जातात. देशात अशा ईदगाहची संख्या कमी असली तरी निराशाजनक अजिबात नाही.

ईदची नमाज सुरू होताच गर्दीत शांतता पसरते. ही नमाज सामान्य नमाजपेक्षा थोडी वेगळी असते आणि मुस्लिम समाजातील झाडून सगळे या नमाजसाठी उपस्थित असतात. ते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात आणि केवळ रमजानच्या आनंदासाठीच नव्हे तर अल्लाहतर्फे केल्या जाणाऱ्या रोजच्या असंख्य आशीर्वादांसाठी अल्लाहबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. नमाजनंतर इमाम प्रासंगिक प्रवचन करतात. यात रमजान महिन्याचे महत्व, त्याद्वारे अल्लाहने मानवजातीवर केलेला कृपावर्षाव, रमजानच्या संधीचा लाभ घेतलेल्यांना प्राप्त झालेला आनंद यावर भाष्य करतात. मात्र हे प्रचना अत्यंत संक्षिप्त असते. वेळेचे भान राखून लांबचलांब भाषण केले जात नाही. नमाज होताच लोक ‘ईद मुबारक’ म्हणत एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करतात. “अल्लाह तुमच्या आणि आमच्या सत्कृत्यांचा स्वीकार करो,” या शब्दांत एकमेकांसाठी प्रार्थना करतात. लोकांना आलिंगन करतात. लहान मोठ्यांना, गरीब श्रीमंतांना, कनिष्ठ वरिष्ठांना आलिंगन करतात. थेट गळ्याला गळा लाऊन एकमेकांना आपल्या मिठीत घेतात. लहान मुले भेटवस्तू आणि ईद्दीच्या अपेक्षेने आपल्या मोठ्यांच्या अवतीभोवती गलका करतात. मोठे त्या छोट्या लेकारांशी अत्यंत प्रेमाने बोलतात. त्यांना काही न काही देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करतात. ईदगाहबाहेर ईदनिमित्त दान मागणाऱ्या भिकाऱ्यांची मोठी संख्या असते. यातील बहुसंख्य भिकारी व्यवसायिक भिकारी असले तरी ईदच्या दिवशी मनाई करायला नको म्हणून लोक काही न काही दानधर्म करतात.

तसेच ईदच्या दिवशी नमाज सुरू होण्यापूर्वी विशेष दान करावे लागते. त्याला सामान्य भाषेत फित्रा म्हणतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या प्रत्येक प्रौढ मुस्लिम व्यक्तीसाठी गोरगरिबांना दान करणे अनिवार्य आहे, ज्याद्वारे ती गरीब व्यक्ती ईदच्या आनंदात सहभागी होण्यासाठी खाद्यपदार्थ विकत घेऊ शकते. जगभरातून अनेक ठिकाणी काही संस्थांद्वारे गरीबांना पैसेऐवजी प्रत्यक्ष अन्नपदार्थ वितरित केले जातात. हे फित्राच्या पैश्यानेच केले जाते. रमजान हा एक असा काळ असतो, ज्यात मुस्लिम लोक अत्यंत उदारता दाखवतात, रमजानच्या समाप्तीच्या वेळीही ईदच्या माध्यमातून उदारतेच्या भावनेचे प्रदर्शन करतात. यामुळे समाजातील प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला, जरी ती कितीही गरीब असली तरी, ईदचा आनंद लुटण्याची संधी मिळते.

नमाज झाल्यावर सारे लोक आपापल्या घरी परततात. परत जाताना ते वेगळ्या मार्गाचा प्रयोग करतात. ईदगाहला जाताना एका मार्गाने जाणे आणि परतताना दुसऱ्या मार्गाने परतणे, हा प्रेषित मुहम्मद यांनी घालून दिलेला आदर्श आहे. ईदच्या दिवशी सहकुटुंब ईदगाहला जावे लागते. मुस्लिमांची प्रचंड संख्या एका ठराविक काळासाठी रस्त्यावर असते. यामुळे रस्त्यात काही अनपेक्षित घडू नये आणि गर्दीमुळे लोकांना त्रास होऊ नये, तसेच अघटीत काही घडून ईदच्या या एकत्रित येण्याला गालबोट लागू नये म्हणून प्रेषितांनी घालून दिलेला हा आदर्श मुस्लिमांसाठी कालातीत ठरतो आहे. ईद उल फित्र या सणाच्या वेळी, अनेक मुस्लिम देशांमध्ये व्यवसाय आणि कार्यालये एका आठवड्यापर्यंत बंद असू शकतात. मात्र अन्य देशात, विशेषतः मुस्लिम अल्पसंख्यांक असणाऱ्या देशात, केवळ एका दिवसाच्या सुट्टी आणि वेळेच्या मर्यादेमुळे, मुस्लिमांना त्यांचा सणाचा आनंद काही तासांपेक्षा जास्त लुटता येत नाही. मात्र अशा देशांमधून आता मुस्लिमांना दोन दिवसांची सुट्टी देण्याचा विचार मांडला जात आहे.

नाश्ता, दुपार जेवण किंवा रात्रीभोजसाठी मुस्लिम परिवारांतून सहकुटुंब आणि मित्रांचे मेळावे लागतात. एकमेकांना भेटी देण्याचा, कृतज्ञता, प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्याचा हा प्रसंग असतो. हरवलेले बंध सुधारण्याची, दुरुस्त करण्याची आणि नातेसंबंध पुनरुज्जीवित करण्याची ही वेळ असते. यावेळी विशेष खाद्यपदार्थ तयार केले जातात; शेजाऱ्यांना व मित्रांना पाठवले जातात. प्रत्येक देशाची किंवा समाजाची स्वतःची विशेष डिश असते. देशात बहुतकरून शिरखुर्मा आणि बिर्याणी या पदार्थांची चलती असते. याशिवाय कुटुंबातील मोठे लहानांना भेटवस्तू, पैसे आणि मिठाई देतात. भेटवस्तूंचा हा आनंद केवळ लहानग्यांसाठीच नसतो, तर सर्वांसाठी नसतो. देशातील काही मोठ्या शहरांमधून ईदच्या दिवशी सहल किंवा जत्रेला जाण्याची नवी परंपरा विकसित होत आहे. मोठ्या शहरातून नातेवाईक किंवा घनिष्ट मित्रांच्या अभावामुळे हा ट्रेंड विकसित झाला असावा. मात्र ज्यांच्यासाठी शहरात आपले म्हणावे असे कोणीच नाही, अशांसाठी हा ट्रेंडही चांगला आहे.

ईद साजरी करण्यासाठी नातेवाईकांशी संपर्क, पालकांप्रती दयाळूपणा, गरीब आणि व्यथित लोकांबद्दल सहानुभूती आणि शेजाऱ्यांबद्दल सहानुभूती आवश्यक आहे. हा प्रेम आणि शुभेच्छा देण्याचा दिवस आहे. काही मुस्लिम कब्रस्तानांना भेट देण्याची संधी शोधतात. मात्र कब्रस्तानांना भेट देणे हा वार्षिक ईद विधी बनू नये, हे महत्त्वाचे आहे. मृत्यू आणि परलोक यांचे स्मरण नेहमीच महत्त्वाचे आहे. या उत्सवाच्या वेळीही, अल्लाहला समर्पित असलेल्या व्यक्तीला हे समजते की, तो मृत्यूपासून केवळ एका श्वासाच्या अंतरावर आहे. जीवनापेक्षा मृत्यू जास्त हमी आणि खात्रीचा आहे. मुस्लिम व्यक्तीला याची जाणीव असते की, हे जीवन अंतिम निवासस्थान नाही, तर स्वर्ग वा नरक यांच्या मार्गावरील केवळ एक क्षणिक थांबा आहे. रमजान हा चिंतनाचा काळ होता आणि ईद हा उत्सवाचा काळ आहे. तथापि, संपत्ती आणि भौतिकवादाचे प्रदर्शन टाळले पाहिजे.

Leave a Comment