रमजान आणि रोजे भाग १ (Ramzan and Fasting)

चांद्र कॅलेंडरचा नववा महिना रमजान हा २९ किंवा ३० दिवसांचा असू शकतो. इस्लामी कॅलेंडरचा महिना सूर्यास्तानंतर लगेचच पश्चिम क्षितिजावर नवीन चंद्रकोर दिसण्यापासून सुरू होतो. आठवा महिना शाबानच्या शेवटच्या आठवड्यात २९ व्या दिवशी मुस्लिम नवीन चंद्रासाठी पश्चिम क्षितिजाकडे पाहतात. नवीन चंद्र दिसल्यास, सूर्यास्तासह रमजान सुरू होतो, मात्र रोजे पुढील पहाटेपासून सुरू होतात. जर या २९ व्या रात्री नवीन चंद्र दिसला नाही, तर मुस्लिम शाबानचे ३० दिवस पूर्ण करतात आणि दुसऱ्या दिवशी रमजान सुरू होतो.

रमजान आणि रोजांचे महत्त्व

अल्लाह कुरआनमध्ये म्हणतो, “इमानधारकांनो! तुमच्यासाठी रोजे अनिवार्य करण्यात आले आहेत, जसे तुमच्या पूर्वीच्या लोकांसाठी अनिवार्य करण्यात आले होते, जेणेकरुन तुम्ही पापभिरू व्हावे.”[1] “रमजान तो महिना आहे, ज्यामध्ये कुरआन अवतरित केला गेला, जो मार्गदर्शन आहे समस्त मानवजातीसाठी; ज्यात मार्गदर्शनाचे स्पष्ट प्रमाण आणि सत्य–असत्यादरम्यान फरक करणारे निकष आहेत. तेव्हा तुमच्यापैकी ज्याला हा महिना प्राप्त होईल, त्याने रोजांचे पालन करावे. परंतु जो कोणी आजारी असेल वा प्रवासात असेल, त्याने इतरवेळी रोजे पूर्ण करावेत. अल्लाह तुमची सुविधा इच्छितो, तुम्हाला कष्ट देऊ इच्छित नाही. तुम्ही निर्धारित संख्या पूर्ण करावी आणि अल्लाहने तुम्हाला जे मार्गदर्शन दिले आहे, त्याबद्दल अल्लाहच्या महानतेचे वर्णन करावे आणि त्याच्याशी कृतज्ञता बाळगावी.”[2]

त्यानुसार रमजान महिन्याला कुरआन अवतरणाचा महिना म्हटले जाते. त्यामुळे मुस्लिम समाजात या महिन्यात वारंवार कुरआनचे पठण करतात.

सौम अर्थात रोजा

रोजा पहाटेपासून सुरू होतो आणि सूर्यास्तानंतर संपतो. रोजासाठी मुस्लिम लोक प्रातःकाळी उठतात, सहर (पहाटेचे जेवण) करतात आणि दिवसभराच्या रोजाची तयारी म्हणून पुरेशा प्रमाणात पेय पितात. यानंतर पहाटे खाणेपिणे थांबवतात. दिवसा खाण्यापिण्याला किंवा लैंगिक क्रियाकलापांना परवानगी नाही. याशिवाय, मुस्लिमांनी इस्लामच्या नैतिक संहितेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, कारण नैतिक संहितेचे पालन करतानाचे अपयश रोजांच्या आवश्यकतांचे उल्लंघन करू शकते. रमजान महिन्यात रोजांचे पालन करणे, ही उपासना तारुण्य प्राप्त केलेल्या सर्व मुस्लिमांसाठी अनिवार्य आहे. ज्या स्त्रियांची मासिक पाळी सुरू झाली आहे, ज्या बाळंतपणापासून पूर्णपणे बरे झाल्या नाहीत, त्यांनी त्यांच्या दिलेल्या स्थितीतून पूर्णपणे बाहेर येईपर्यंत रोजे पुढे ढकलले तरी हरकत नाही. याशिवाय, जे आजारी आहेत किंवा प्रवासात आहेत, त्यांनी देखील त्यांचे रोजे पुढे ढकलण्यास हरकत नाही. अल्लाहतर्फे तशी परवानगी देण्यात आली आहे.

लोक रोजांचे पालन करतात, कारण अल्लाहने त्यांना त्याचा आदेश दिला आहे. तथापि, ते रोजांतून मिळणाऱ्या लाभाचा देखील विचार करतात. ज्यात तहानभूक आणि लैंगिक इच्छांवर नियंत्रण विकसित करणे, चांगली नैतिक व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करणे आणि निर्मात्यासमोर समर्पणाची सीमा गाठणे, या गोष्टी अंतर्भूत आहेत. मात्र हे सर्व करीत असताना मुस्लिम लोक त्यांचे व्यवसाय व्यवहार नेहमीप्रमाणे करीत असतात. अध्यात्मासाठी सामाजिक अलिप्तता इस्लामला मान्य नाही.

सूर्यास्तानंतर साधारणपणे खजूर खाऊन, पाणी किंवा रस पिऊन रोजा सोडला जातो. तथापि, रोजा सोडण्यासाठी कोणतेही वैध अन्न किंवा पेय वापरले जाऊ शकते. यानंतर मगरीब नमाज (सूर्यास्ताच्या नमाजनंतर) किंवा त्यानंतर पूर्ण जेवण केले जाते. थोड्या विश्रांतीनंतर, मुस्लिम ईशाची नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जातात आणि रात्रीची विशेष नमाज देखील अदा करतात, ज्याला तरावीह म्हणतात.

तरावीह

ही सामूहिक नमाज असून ती रात्रीच्या ईशाच्या नमाजनंतर अदा केली जाते. पारंपरिकपणे, कुरआनचा हाफिज – म्हणजे अशी व्यक्ती ज्याने पूर्ण कुरआन मुखोद्गत केले आहे – नमाजचे नेतृत्व करतो. रमजानच्या प्रत्येक रात्री तो, योग्य क्रमाने लहान लहान भागांमध्ये कुरआन पठण करतो आणि रमजानचा महिना संपण्यापूर्वी संपूर्ण कुरआनचे पठण पूर्ण करतो. तरावीह नमाजमध्ये नियमित उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला महिन्याच्या अखेरीपर्यंत संपूर्ण कुरआनचे पठण ऐकण्याची संधी मिळते. कुरआनचा हाफिज उपलब्ध नसेल, तर मुस्लिमांनी त्यांच्यातील सर्वात जास्त कुरआन जाणणाऱ्या व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार नमाज अदा करण्यासाठी पुढे करावे. अनेक मुस्लिम विद्वान उद्धृत करतात की, रमजान असो वा नसो, प्रेषित मुहम्मद [स.] – अल्लाहची दया आणि कृपा असो त्यांच्यावर – नेहमी रात्री एकट्याने प्रार्थना करीत असत आणि हीच त्यांची नियमित सवय होती. त्याच्या महान सहकाऱ्यांपैकी अनेकांनी याची साक्ष दिली आहे.

रमजान औदार्याचा महिना

रमजानचा महिना सत्कर्मे करणाऱ्यांसाठी अनेक कृपा घेऊन येतो. या महिन्यात लोक सत्कृत्ये करण्यासाठी वर्षातील इतर वेळेपेक्षा अधिक उदार, अधिक सौहार्दपूर्ण, मैत्रीपूर्ण आणि तत्पर असतात. गरीब आणि गरजूंना समाजातील समृध्द लोकांकडून अन्न, वस्त्र आणि पैसा मिळतो. अनेक लोक आपल्या मोहल्ल्याच्या मशिदीत उपवास आणि जेवणासाठी जातात. आजूबाजूचे लोक मशिदीत फळे, खाद्यपदार्थ आणि पेये पाठवतात. महिन्याच्या प्रत्येक संध्याकाळी सभोवतालचे वातावरण एखाद्या मैत्रीपूर्ण रात्रीभोजसारखे असते. रमजानमध्ये मुस्लिम समाजातील दानकर्ते देणगीसाठी गरजू लोकांमध्ये वेढलेले दिसतात. जकात – संपत्ती शुद्ध करणाऱ्या दान व देणग्या वर्षाच्या या वेळी दिल्या जातात. कारण अनेकांना अल्लाहकडून अमर्याद बक्षिसे मिळण्याची इच्छा असते.

[1] कुरआन, सुरह बकरा, आयत क्र. १८३

[2] कुरआन, सुरह बकरा, आयत क्र. १८५

Leave a Comment