ते प्रेषित मुहम्मद [स.] होते, अल्लाहची दया आणि कृपा असो त्यांच्यावर, ज्यांनी आम्हाला असत्याच्या गर्तेतून बाहेर काढून सर्वोच्च सत्याच्या नभोमंडळाची सैर करवली. त्यांनीच आम्हाला अंधाराच्या खाईतून प्रकाशाच्या पर्वताकडे नेले. आम्हाला आमच्याच हातांनी घडवलेल्या मूर्त्या आणि आम्हीच घोषित केलेल्या देवीदेवतांबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी आम्हाला मुर्तीपुजेच्या अंधश्रद्धेतून बाहेर काढून एकेश्वरवादाच्या श्रद्धेची देणगी दिली.
रमजान महिन्याच्या एका निर्णायक रात्री, प्रेषित मुहम्मद यांच्यावर कुरआनचे अवतरण सुरु झाले. हिरा गुहेत त्यांना कुरआनच्या पहिल्या आयती प्राप्त झाल्या.[1] मदिनेला स्थलांतर केल्यानंतर प्रेषितांनी रमजान महिन्याच्या दिवसा रोजे आणि रात्री नमाज कायम करण्याची शिकवण दिली. रमजानच्या प्रत्येक दिवसाला रोजाद्वारे सहनशीलतेचा दिवस आणि प्रत्येक रात्रीला नमाजद्वारे कृतज्ञतेची रात्र घोषित केले.
अनपेक्षित परिवर्तन
अरबस्तानातील त्या स्वतंत्र जमातींना प्रेषितांनी कसे सुधारले आणि परिष्कृत केले आणि त्यांना धर्मनिष्ठ, शिस्तप्रिय व पापभिरू तपस्वी बनवले, जे दिवसातून पाच वेळा मस्जिदमध्ये अल्लाहकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी नमाज कायम करीत होते, हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. विचार करून पहा, हेच लोक जे एकेकाळी ‘दारू आणि बाई’ च्या उपभोगात रममाण होते, तेच आता रमजानचा संपूर्ण महिना उपवास आणि नमाजमध्ये व्यतीत करू लागले होते.
आपल्या अनुयायांच्या अंतःकरणात, प्रेषितांनी अल्लाहबद्दल प्रेम, भय आणि मानवतेसाठी प्रेम निर्माण केले. त्यांचे उदाहरण प्रेरणादायी आणि अप्रतिम होते; आणि त्यातील प्रत्येकजण त्यांचा सर्वात जवळचा अनुयायी होण्यासाठी उत्सुक झाला होता. त्यांच्यासाठी अल्लाहचे प्रेषित सर्वात प्रामाणिक व सौहार्दपूर्ण नेते होते. त्यांचे जीवन त्यांच्यासमोर उघड्या पुस्तकासारखे होते. ते ज्या गोष्टीचा इतरांना उपदेश करीत होते, त्या गोष्टींना ते प्रेषितांच्या जीवनात अगदी जवळून सराव करताना पाहत होते.
आत्माला शरीरावर राज्य करू द्या
प्रेषितांनी आपल्या सहकाऱ्यांना पटवून दिले की, हे जग मरणोत्तर जीवनाच्या तुलनेत आणि शरीर आत्म्यापेक्षा कसे कमी महत्त्वाचे आहे. उपवासामध्ये, प्रेषितांनी त्यांना शारीरिक मागण्यांकडे दुर्लक्ष कसे करावे शिकवले, जेणेकरून आत्मा शरीरावर राज्य करेल. अन्न, पेय आणि लैंगिक संबंधांचा त्याग करणे ही पुढच्या टप्प्याची केवळ एक प्रस्तावना होती. स्वार्थ, वासना, कामुकता आणि लोभ यावर विजय मिळवणे म्हणजे एखाद्याला उत्कट स्वभावातील स्वच्छंदीपणापासून मुक्त करणे होय. प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले होते, बलवान व्यक्ती तो नसतो, जो कुस्तीत दुसऱ्याला खाली पाडू शकतो. बलवान तो आहे, जो रागात असताना स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो.[2]
तसेच रोजाचा एखाद्याच्या वागण्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल प्रेषित म्हणाले, “उपवास हे एक ढाल आहे, म्हणून उपवास करणाऱ्याने अश्लील बोलणे आणि अज्ञानी वर्तन टाळले पाहिजे. जर कोणी त्याला शिवीगाळ करत असेल किंवा त्याच्याशी भांडू लागला तर त्याने उत्तर द्यावे, मी उपवास करीत आहे. मी उपवास करीत आहे.”[3] प्रेषितांनुसार रोजांचा गाभा हा केवळ आत्मभोग सोडण्याची इच्छा विकसित करणे हा नसून, स्वतःच्या भावनांवर नियंत्रणाची गरज भासणे आणि स्वभावात उदारता निर्माण होणे, हा आहे. अल्लाहच्या प्रेषितांपेक्षा दयाळू व उदार कोणीही नव्हते; रमजानमध्ये त्यांची उदारता तर शिगेला पोहोचलेली असायची.[4]प्रेषित मुहम्मद [स.] यांनी लोकांशी उत्कृष्ट आचरण करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. ते म्हणाले, “लोकांसाठी गोष्टी सोप्या करा आणि कठीण करू नका, त्यांना आनंदित करा आणि दूर करू नका.”[5]
जो प्रामाणिकपणे उपवास करतो, त्याचे हृदय अल्लाहच्या अगणित कृपेच्या भव्यतेच्या चिंतनासाठी उघडलेले असते. म्हणून प्रेषितांनी आपल्या अनुयायांना स्वार्थ टाळण्यास सांगितले. दोन लोकांचे अन्न तिघांसाठी पुरेसे आहे आणि तीन लोकांचे अन्न चौघांसाठी पुरेसे आहे. [6]
कष्टात सौम्यता
अल्लाह परम दयाळू आहे आणि त्याने त्याच्या निर्मितीवर त्याची दया व्यक्त केली आहे. प्रेषित म्हणाले, “पृथ्वीवर असलेल्यांवर दया करा म्हणजे जो स्वर्गात आहे, तो तुमच्यावर दया करेल.[7]
तसेच अल्लाहचे प्रेषित म्हणाले, “तो इमानधारक नाही, ज्याचा शेजारी भुकेला असताना तो स्वतः मात्र पोटभर खातो.[8] म्हणून हे आश्चर्यकारक नव्हते की प्रेषितांच्या साथीदारांनी त्यांच्यावर मनापासून प्रेम केले, कारण ते सर्वात दयाळू होते, त्यांनी केवळ मानवांवरच नव्हे तर जगातील प्राण्यांवरही दया केली. प्रेषित मुहम्मद [स.] यांच्यापेक्षा कोणताही नेता त्याच्या अनुयायांसाठी अधिक विचारशील आणि आग्रही असू शकत नाही. त्यांनी कोणत्याही मुस्लिम व्यक्तीवर त्याच्या सहनशक्तीपेक्षा जास्त ओझे लादले नाही. कारण त्यांना लोकांच्या सहनशक्तीची स्पष्ट जाणीव होती. रोजांबाबत त्यांच्या अनुयायांच्या विचारातून हे स्पष्ट होते की, त्यांनी मुस्लिमांना सहर अर्थात पहाटेच्या नमाजपूर्वीच्या अल्पोपहारास थोडा उशीर करण्याची आणि इफ्तारला कसलाही विलंब न करण्याची शिकवण दिली. तसेच रमजानमध्ये प्रवासादरम्यान त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजांचे पालन करायचे की नाही, हे निवडण्याचे स्वातंत्र्य दिले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एखाद्या व्यक्तीने उपवास सोडण्याची किमान मर्यादा म्हणून प्रेषितांनी प्रवासाचे विशिष्ट अंतर निर्दिष्ट केले नाही. त्यांच्या साथीदारांनी कधीकधी घर सोडल्यानंतर लगेच उपवास सोडला, कारण हे स्वतः पैगंबरांनी जपलेले उदाहरण होते. त्याचप्रमाणे उष्णतेच्या किंवा तहानेच्या वेळी डोक्यावर पाणी वाहून डोके थंड करण्याची परवानगी होती आणि पैगंबरांनी स्वतः तसे केले होते. रमजानच्या काळात बायकांशी संगनमत करण्याच्या बाबतीत त्यांचे उदाहरण वेगळे नव्हते; त्यांनी केवळ अशाच कृत्यांना परवानगी नाकारली, ज्यामुळे उपवासाला अपाय होईल.
तरावीहच्या नमाजबद्दल असे नोंदवले गेले आहे की, प्रेषितांनी सामुहिक नमाज कायम करण्यास सुरुवात केली, मात्र नंतर त्यांनी सामुहिक नमाज सुरू ठेवल्यास अशी नमाज कायम करणे बंधनकारक होईल, या भीतीने थांबवली. अशाप्रकारे त्यांनी त्यांच्या उदाहरणाद्वारे हे दाखवून दिले की, तरावीह नमाज सामुहिकरित्या जास्त उत्तम प्रकारे कायम करता येते, मात्र त्यांनी त्यांच्या दयावृत्तीमुळे याबाबत सौम्यता दाखवली.
ऐतिकाफ़: आत्मा ताजेतवाना
मुस्लिमांसाठी रमजानचा सर्वोच्च बिंदू शेवटच्या दहा रात्रींमध्ये लैलतुल कद्र शोधणे हा आहे. या काळात प्रेषितांनी ऐतिकाफ़वर विशेष जोर दिला. ऐतिकाफ़ एक उपासना कृती आणि आध्यात्मिक स्थिती आहे, ज्यात एक मुस्लिम व्यक्ती स्वत:ला मस्जिदमध्ये मर्यादित करून ठेवते आणि अल्लाहच्या उपासना आणि स्मरणात वेळ व्यतीत करते. आजच्या आधुनिक काळात, जेव्हा लोक तात्कालिक सुखांमध्ये रममाण होतात, तेव्हा त्यांनी जगाचे वास्तविक आकलन करवून घेण्यासाठी वेळोवेळी प्रार्थनागृहाच्या एकांतात जाणे गरजेचे आहे; जे त्यांच्या आध्यात्मिक कायाकल्पासाठी आणि त्यांच्या निर्मात्याकडे परत येण्यासाठी आवश्यक आहे.
अशाप्रकारे प्रिय प्रेषितांनी आपल्याला शिकवले आहे की, रमजानचा महिना आपल्या अविचारी आकांक्षांना शिस्त लावण्यासाठी, आत्मतृप्तीसाठी, इच्छांचा त्याग करण्यासाठी आणि संकटांना तोंड देत सहनशीलतेचा सराव करण्यासाठीचा प्रशिक्षण महिना आहे. प्रेषितांनी आम्हाला सांगितले की, रमजानच्या काळात विशेषत: आपल्या सभोवतालच्या वंचित, गरजू आणि गरजवंतांना पाठिंबा देणे आणि त्यांना उन्नत करणे, हे आपले कर्तव्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रमजान हा सर्वशक्तिमान अल्लाहच्या कृपावर्षावांचा, दयेची याचना करण्याचा, पश्चात्ताप व्यक्त करून पालनकर्त्याकडे परत येण्याचा आणि प्रामाणिकपणे त्याची क्षमा मागण्याचा महिना आहे.
संदर्भ:
[1] बुखारी, सहीह, किताबुल वही, ३
[2] मुस्लिम, सहीह, किताबुल बिर्र, १४०
[3] अबू दाऊद, सुनन, किताबुस सौम, ५१
[4] बुखारी, सहीह, किताबुल वही, ६
[5] बुखारी, सहीह, किताबुल अदब, १५२
[6] मालिक, मुअत्ता, १६९३
[7] अबू दाउद, सुनन, किताबुल अदब, १६९
[8] बुखारी, अल अदब अल मुफरद