लैलतुल कद्र
ही कद्रची रात्र आहे. कद्र या शब्दाचे भाषांतर वारंवार ‘शक्ती’ म्हणून केले गेले आहे. उत्तम अनुवाद ‘मुल्यांकन’ वा ‘निर्णय’ असू शकतो. कारण अल्लाह म्हणतो की, या रात्रीचे महत्व हजार महिन्यांपेक्षा जास्त आहे. अर्थात कद्रची रात्र त्रेऐंशी वर्षांच्या तुलनेत जास्त महत्वाची आहे. या रात्री अल्लाह त्याचे आदेश पाठवतो. हीच ती रात्र आहे, जेव्हा प्रेषित मुहम्मद [स.] यांच्यावर प्रथमतः कुरआनचे अवतरण सुरु झाले होते. अल्लाह कुरआनमध्ये म्हणतो,
“आम्ही हे [कुरआन] कद्रच्या रात्री अवतरीत केले आहे. तुम्हाला काय माहित कद्रची रात्र म्हणजे काय? कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा उत्तम आहे. ज्यात अल्लाहचे दूत आणि पवित्र आत्मा, अल्लाहच्या परवानगीद्वारे आदेश आणि उपदेशांसह खाली येतात. [त्या रात्री] पहाटेपर्यंत शांतता असते.” [1]
निर्णयाची रात्र ही मानवजातीला अल्लाहकडून मिळालेली देणगी आहे. तथापि, लैलतूल कद्रची रात्र कोणती, हे मात्र स्पष्ट नाही. प्रेषितांच्या सहकाऱ्यांच्या काही प्रसिद्ध अहवालात ती रमजान महिन्याची २७ वी रात्र असल्याचा उल्लेख आहे, परंतु बाकीच्या अनेक हदीस रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसातील विषम तारखांकडे इशारा करतात. प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या प्रमाणित शिकवणींनुसार, अल्लाहची दया आणि कृपा असो त्यांच्यावर, मुस्लिमांना रमजानच्या २१व्या, २३व्या, २५व्या, २७व्या आणि २९व्या रात्री उपासनेत घालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यांनी लैलतूल कद्र शोधण्याची खात्री करण्यासाठी चांगली कामे करावीत. मुस्लिमांपैकी बरेचजण कद्रच्या रात्री नमाज व सत्कर्म करण्यामध्ये रात्रभर जागून काढतात. तथापि, प्रेषित व त्यांचे सहकारी थकलेल्या शरीराला आराम देण्यासाठी रात्रीचा किमान एक तृतीयांश भाग झोपायचे. कारण शरीराला पीडा देऊन उपासना करणे उचित नाही.
भारतीय उपखंडातील काही देशांमध्ये, रमजानचा २७वा दिवस सुट्टीचा दिवस असतो. ज्यामुळे लोकांना रात्रीच्या उपासनेनंतर दिवसभर विश्रांती घेता येते. ही पद्धती चुकीची आहे. यामुळे अंतिम १० रात्रीतील अन्य विषम दिवसांकडे दुर्लक्ष होते. लैलतूल कद्र आणि ईदूल फित्रचा आनंद घेण्यासाठी मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि व्यवसायिक संस्थांमधून २१ रमजानपासून २ शव्वालपर्यंत [१० ते १२ दिवस] सुट्ट्या दिल्या जातात. ज्यामुळे अनेकांना शेवटच्या १०दिवसांत रमजानचा अध्यात्मिक आनंद लुटता येतो.
ऐतिकाफ़ किंवा एकांत
प्रेषित मुहम्मद [स.] यांनी रमजानचे शेवटचे दहा दिवस आणि रात्री मस्जिदीत घालवण्याचा पायंडा पाडला. त्यांनी आपल्या जीवनातून हा आदर्श निर्माण केल्यानंतर, मुस्लिमांनी परिसरातील मस्जिदीत ऐतिकाफ़ करणे, एक उपासना कृती मानली जाते. ऐतिकाफ़ करणारे लोक त्यांचा वेळ विविध प्रकारच्या उपासनांत व्यतीत करतात. जसे अल्लाहचे नामस्मरण आणि अतिरिक्त नमाज, कुरआनचे पठन आणि अभ्यास, प्रेषित मुहम्मद याचे [स.] चरित्र आणि हदीसचा अभ्यास, तसेच उपासना आणि अध्यात्मिक स्थितीची सुधारणा आणि अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांच्या आदेशांचे पालन करणे, याबाबतीत प्रयत्न करणे. ऐतिकाफ़ करणाऱ्या लोकांना आपत्कालीन परिस्थितीशिवाय मस्जिदच्या बाहेर जाण्याची परवानगी नसल्यामुळे ते मस्जिदीतच झोपतात आणि तेथे उपलब्ध असणाऱ्या मर्यादित सुविधांचाच वापर करतात.
ऐतिकाफ़ करणाऱ्या लोकांसाठी अन्न एकतर त्यांच्या कुटुंबाद्वारे किंवा मस्जिद परिसरातील लोकांद्वारे पुरवले जाते. चंद्र दिसण्याच्या घोषणेवर वा रमजान महिन्याच्या शेवटी ऐतिकाफ़ संपतो. व्यस्त लोकांसाठी एक रात्र, एक दिवस अथवा केवळ काही दिवसांसाठी ऐतिकाफ़ करण्याची परवानगी आहे.
सदकातूल फितर
साधारणतः गरीब, गरजू, उपेक्षित आणि पात्र असलेल्यांना दिलेली कोणतीही आर्थिक मदत सदका असते. सदकातूल फित्र, ज्याला केवळ फित्रा असेही म्हणतात, ईदच्या नमाजपूर्वी समाजातील गरिबांना द्यावी लागणारी अनिवार्य अर्थिक मदत आहे. ही मदत पुरवल्यामुळे गरिबांना शक्यतो उत्सवाची तयारी करण्यासाठी पुरेसे आर्थिक सहाय्य मिळते. भारतात मुस्लिम समाजाकडून कोट्यवधींचे सदकतूल फित्र दिले जाते.
ईदूल फित्र
रोजांच्या महिन्याचा शेवटी, रमजाननंतरच्या १०वा महिना शव्वालच्या पहिल्या दिवशी ईदचा आनंद साजरा केला जातो. रमजानच्या २९ तारखेला सूर्यास्तानंतर, लोक पश्चिम क्षितिजावर नवचंद्रकोर शोधतात. चंद्रकोर दिसताच रमजानचा शेवट झाल्याचे घोषित केला जातो. जर चंद्रकोर दिसली नाही तर रमजान महिना एक दिवस वाढवला जातो. ईद दिवशी लोक भल्या पहाटे आंघोळ करतात, न्याहारी करतात, उत्तम कपडे परिधान करतात, सुगंधी लावतात आणि ईदच्या नमाजसाठी घरातून बाहेर पडतात. नमाजसाठी जाताना तकबीरात म्हणत जातात, “अल्लाह महान आहे; त्याच्याशिवाय अन्य कोणी पूजनीय नाही; अल्लाह महान आहे आणि कृतज्ञता अल्लाहसाठीच आहे.” सारे मुस्लिम लोक त्यांच्या घरात, रस्त्यावर आणि ईदच्या नमाजच्या स्थळी तकबीरांचा उच्चार करतात. प्रेषित मुहम्मद [स.] यांनी ईदची नमाज मोकळ्या मैदानात कायम करण्याची परंपरा निर्माण केली. प्रेषितांच्या परंपरेचे अनुसरण करून ईदची नमाज मोकळ्या मैदानात घेतली जाते. उबदार हवामान असलेल्या मुस्लिम देशांमध्ये ईदच्या नमाजसाठी जागा निश्चित असते. तथापि, जेथे ईदच्या नमाजसाठी जागा नसेल तेथे मुस्लिम लोक मैदान किंवा हॉल भाड्याने घेतात.
इमाम निर्धारितवेळी नमाज कायम करतो आणि नंतर प्रवचन देतो. प्रवचनाच्या शेवटी, लोक रमजानच्या यशस्वी पूर्ततेबद्दल एकमेकांना शुभेच्छा देतात, एकमेकांना आलिंगन करतात, अभिनंदन करतात आणि अल्लाहकडे त्यांच्या उपासनांची स्वीकृती मागतात. ईदच्या दिवशी लोक एकमेकांना भेट देतात, छोट्या मुलांना भेटवस्तू देतात. काही देशांमध्ये लोक सहली व इतर मेळाव्यांसाठी जातात. मूलत: ईद हा अल्लाहचे आभार मानण्याचा आणि कुटुंब व मित्रांसोबत आनंद साजरा करण्याचा दिवस आहे.
रमजानमध्ये उमरा
प्रेषित मुहम्मद [स.] यांचे निवेदन आहे की, रमजान महिन्यात उमराह करणे हे हज करण्यासारखे आहे. हज म्हणजे मक्काची तीर्थयात्रा. हज म्हणजे प्रेषित अब्राहम [अलै.], त्याची पत्नी हाजरा आणि त्याचा मोठा मुलगा इस्माईल यांच्या काही परीक्षा आणि संकटांचे स्मरण आहे. हा विधी पूर्ण पाच दिवस चालतो तर उमरा काही तासांत पूर्ण होतो. उमराह हा हजचा छोटासा भाग आहे. उमरा विधी पूर्ण केल्यावर प्राण्याची कुर्बानी दिली जाऊ शकते. उमरा वर्षभरात कधीही केला जाऊ शकतो, परंतु रमजान महिन्यात त्याचे विशेष महत्त्व आहे.
संदर्भ:
[1] कुरआन, सुरह कद्र, ९७, आयत १-५