“मी प्रेषितांकडे पाहिले आणि चंद्राकडे पाहिले, प्रेषितांनी लाल आच्छादन घेतले होते आणि ते मला चंद्रापेक्षा जास्त सुंदर दिसत होते.” [अल-तिर्मिजी]
जाबीर इब्न समुराने अशाप्रकारे इस्लाम धर्माच्या प्रेषितांचे, आस्तिकांची प्रेरणा, जगासाठी कृपा म्हणून अल्लाहतर्फे निवडण्यात आलेल्या अंतिम प्रेषितांचे, मुहम्मद [स.] यांचे या शब्दांत वर्णन केले आहे.
त्यांचा चेहरा गोलाकार, शुभ्र, तेजस्वी आणि आनंददायी होता. त्यांचे केस त्यांच्या कानापर्यंत येत होते. त्यांची दाढी दाट आणि काळी होती. ते प्रसन्न झाले की, त्यांचा चेहरा उजळायचा. त्याचे हसणे केवळ स्मितहास्य होते. त्यांचे डोळे काळेभोर आणि पापण्या लांब होत्या. त्यांच्या लांब भुवया वळलेल्या होत्या. मदीनाचे प्रमुख रब्बी अब्दुल्लाह सलाम यांची नजर त्यांच्या चेहऱ्यावर पडताच त्यांनी जाहीर केले की, असा चेहरा खोटारड्याचा चेहरा असूच शकत नाही.
ते मध्यम उंचीचे होते, उंच वा ठेंगणे नव्हते. ते हलकेसे पुढे वाकून चालायचे. पायात चामड्याची चप्पल घालायचे. त्यांची विजार घोट्याच्या वर राहत असे. त्यांच्या पाठीवर, डाव्या खांद्यावर ‘प्रेषितत्वाची मोहर’ होती. ते दुरूनही निघून गेल्यावर लोक त्यांना त्यांच्या सुगंधाने ओळखायचे. त्यांच्या शरीरावर घामाचे थेंब मोत्यासारखे सुंदर भासायचे. त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांच्यावर इतके प्रेम होते की, ते त्यांच्या घामाला अत्तरात मिसळून अंगावर लावायचे.
ते सामान्यतः शांत राहायचे. गंभीर मुद्रा धारण करायचे. त्यांची धीरगंभीर मुद्रा त्यांना पाहणाऱ्यांच्या दृष्टीत आणखीन प्रतिष्ठित बनवत असे. जेव्हा ते बोलत, तेव्हा त्यांच्या वाणीपेक्षा मधुर काही नसे. त्यांच्या तोंडून सत्याशिवाय अन्य काही बाहेर पडत नसे. ते वेगाने बोलत नसत; उलट त्यांच्या वक्तृत्वात विशिष्ट प्रकारचा संथपणा असे, जेणेकरून ऐकणाऱ्याने त्यांचे शब्द अलगद टिपत जावे. श्रोत्याला त्यांच्या प्रवचनातील शब्द मोजून पाहायचे असल्यास तो सहज मोजू शकत असे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या तोंडून कधीही अश्लील वा असभ्य शब्द ऐकले नाहीत. त्यांनी लोकांना श्राप दिला नाही की त्यांना शिवीगाळ केली नाही.
त्यांच्या ठिकाणी सर्वात घृणास्पद वर्तणूक खोटे बोलणे होती. श्रोत्यांना नीट समजावे यासाठी ते कधी-कधी दोन-तीनदा सांगायचे. प्रवचन लहान द्यायचे. प्रवचन देताना त्याचे डोळे भावना प्रकट करायचे, त्यांच्या आवाजाचा स्तर बदलायचा आणि प्रवचनाच्या माध्यमातून ते आपल्या भावना व्यक्त करायचे.
कोणत्याही उधळपट्टी वा अवडंबराशिवाय ते अत्यंत साधे जीवन जगले. त्यांनी ऐहिक जीवन मागे सोडले आणि त्यापासून दूर गेले. त्यांनी ऐहिक जीवनाला एकप्रकारे तुरुंग मानले. त्यांची इच्छा असती तर त्यांना हवे ते मिळू शकले असते. कारण त्याच्या प्राप्तीचे सारे मार्ग त्यांच्यासाठी सताड उघडे होते. परंतु त्यांनी ते मार्ग स्पष्ट नाकारले. त्यांनी ऐहिक जीवनाला मरणोत्तर जीवनावर प्राधान्य दिले नाही. त्यांनी पटवून दिले की, जीवन केवळ एक प्रवास मार्ग आहे, कायमचे निवासस्थान नाही. येथे क्षणभर विश्रांती घ्यायची आहे, अनंत काळासाठी येथे राहायचे नाही. त्यांनी या जगाची सत्यता ओळखली होती.
प्रेषितांच्या पत्नी, इमानधारकांच्या माता आयशा म्हणतात, “महिना महिना प्रेषितांच्या घराची चूल पेटत नसे. केवळ दोन गोष्टींवर आम्हा कुटुंबियांचा उदरनिर्वाह होत असे – खजूर आणि पाणी. आमच्या शेजारी असणारे मदीनाचे रहिवासी कधी-कधी आमच्यासाठी त्यांच्या मेंढ्यांचे दूध पाठवायचे, ज्यातून प्रेषित स्वतःही प्यायचे आणि कुटुंबियांनाही द्यायचे.” [सहीह बुखारी, सहीह मुस्लिम] त्या म्हणतात, मदिना येथे आल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत, १० वर्षात एकदाही सलग तीन दिवसांसाठी प्रेषितांच्या कुटुंबियांनी गव्हाची भाकरी खाल्ली नाही.
अशा परिस्थितीतही ते मध्यरात्री प्रार्थनेत आपल्या प्रभूची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभे राहायचे. पायात गोळे येईपर्यंत अल्लाहप्रति कृतज्ञता व्यक्त करायचे. जेव्हा त्यांच्या पत्नी त्यांना उपासनेचे कारण विचारीत, तेव्हा ते एकच उत्तर द्यायचे, “मी अल्लाहप्रति कृतज्ञ असू नये का?” [सहीह बुखारी, सहीह मुस्लिम] प्रेषितांचे सहकारी उमर म्हणतात, कधी कधी तर प्रेषितांकडे भूक भागवण्यासाठी निकृष्ट दर्जाची एकही खजूर नसे.
दुसरे सहकारी अब्दुल्ला मसूद म्हणतात, एकदा ते प्रेषितांच्या भेटीसाठी गेले असता त्यांनी प्रेषितांच्या शरीरावर खजुराच्या झाडाच्या सालीपासून बनवलेल्या चटईच्या खुणा पाहिल्या. प्रेषित या चटईचा प्रयोग झोपण्यासाठी करीत असत. अब्दुल्लाह यांनी यासंदर्भात प्रेषितांकडे तक्रार केली. “माझे जन्मदाते तुमच्यावर कुर्बान आहेत. तुमच्यासाठी आम्हाला काही आरामदायक का तयार करू देत नाही, ज्याद्वारे तुमच्या शरीरावर असे व्रण उमटणार नाहीत.” प्रेषितांनी उत्तर दिले, “मला या जगाशी काही देणेघेणे नाही. मी या जगात अशा स्वार सारखा आहे, जो झाडाच्या सावलीत थोडा वेळ थांबतो आणि विश्रांती घेतल्यानंतर, झाडाला मागे टाकून पुन्हा प्रवास सुरू करतो.” [तिर्मिजी]
इतिहासातील अनेक पराक्रमी विश्वविजेते रक्ताचे पाट वाहण्यासाठी आणि मानवी कवटीची मिरास उभी करण्यासाठी ओळखले जातात. प्रेषित मुहम्मद [स.] ओळखले जातात त्यांच्या क्षमेसाठी. ज्याने त्यांच्यावर अन्याय केला, त्याचा त्यांनी कधीच सूड घेतला नाही की युद्धात लढल्याशिवाय त्यांनी कधीही कोणावरही हात उगारला नाही. त्यांनी कधी स्त्रीवर किंवा गुलामांवर बळाचा प्रयोग केला नाही. ज्यादिवशी ते आठ वर्षांच्या वनवासानंतर विजयी म्हणून मक्केत दाखल झाले, त्या दिवशी त्यांच्या क्षमाभावाने इतिहास रचला.
ज्यांनी त्यांचा छळ केला, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खडबडीत डोंगरात तीन वर्षे वनवासात जाण्यास भाग पाडले, ज्यांनी त्यांच्यावर वेडे, कवी किंवा भूतग्रस्त असल्याचा खोटा आरोप केला, त्या सर्वांना त्यांनी माफ केले. त्यांनी रात्रंदिवस त्यांच्या छळाचा कट रचणाऱ्या अत्यंत वाईट शत्रू अबू सुफियानला माफ केले. मुस्लिमांच्या मृतदेहाची, अगदी प्रेषितांच्या प्रिय काकांच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या आणि त्यांचे यकृत कच्चे खाणाऱ्या हिंदाला माफ केले. प्रेषितांच्या माफीमुळे दोघांनीही इस्लामचा स्वीकार केला आणि त्यांचे सच्चे अनुयायी झाले. एवढ्या उच्च दर्जाच्या चारित्र्याचा व्यक्ती अल्लाहच्या प्रेषितांशिवाय या जगाने दुसरा पाहिला नाही.
युद्धकलेत तरबेज असलेल्या वहशी गुलामाने हिंदच्या आदेशावर प्रेषितांच्या काकांची निर्घृण हत्या केली. हिंदने बदल्यात त्याला गुलामीतून मुक्त केले. मुक्तीनंतर तो मक्केत राहत होता, मात्र प्रेषितांनी मक्केवर विजय संपादन केल्यानंतर तो ताईफकडे पळून गेला. अखेरीस ताईफ शहर मुस्लिमांना मिळाले. प्रेषितांतर्फे जाहीर माफीची बातमी मिळताच वहशी मोठ्या धैर्याने प्रेषितांकडे आला आणि आपल्या जघन्य अपराधांबद्दल माफी मागितली. प्रेषितांनी क्षणाचाही विचार न करता त्याला माफ केले. परिणामी त्यानेही इस्लामचा स्वीकार करून प्रेषितांचे अनुयायी होणे पसंत केले.
त्यांची माफी मोजक्या लोकांपर्यंत मर्यादित नव्हती. त्यांनी हाबार अस्वदलाही माफ केले. प्रेषितांची गरोदर मुलगी जैनब मक्केहून मदिनेकडे जात असताना मक्केच्या लोकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. हाबार देखील त्या लोकांपैकी होता. हाबारने जैनब यांना उंटावरून खाली पाडले. परिणामी तिने आपले बाळ गमावले, त्यांना गंभीर शारीरिक दुखापत झाली. या गुन्ह्याच्या शिक्षेच्या भीतीमुळे तो पर्शियाकडे पळाला. मात्र काही दिवसांनी त्याने प्रेषितांसमक्ष हजर होऊन आपला अपराध कबूल केला आणि इमानची साक्ष दिली. परिणामी प्रेषितांनी त्यालाही माफ केले.
प्रेषितांकडे केवळ एका इशाऱ्यावर प्राण देणाऱ्या लाखो अनुयायांची फौज होती. तरी ते मानव इतिहासातील सर्वात विनम्र व्यक्ती होते. ते जमिनीवर बसत, जमिनीवर जेवत आणि जमिनीवरच झोपत. प्रेषितांना सहकाऱ्यांत मिसळून बसने आवडे. उंच ठिकाणी बसणे त्यांना पसंत नव्हते. लोकांनी त्यांच्या आदरार्थ उठून उभे राहणे त्यांना आवडत नसे. त्यांच्या अशा नम्र स्वभावामुळे अनोळखी व्यक्तीला प्रेषितांना ओळखणे अवघड जाई. प्रेषितांचे सेवक अनस सांगतात की, त्यांच्या नऊ वर्षांच्या सेवेत प्रेषित कधीच त्यांच्यावर रागावले नाहीत की उंच आवाजात बोलले नाहीत. त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेषितांचे वर्णन विनम्रता वर्णिली आहे की, रस्त्याने चालणारी मुलं देखील प्रेषितांचे बोट धरून चालू लागायची. ते आजारी लोकांना भेटी देत, अंत्ययात्रेत सहभागी होत आणि दुर्बलांकडे जात. दुर्बलांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असत. विधवा आणि गरीबांच्या उद्धारासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय ते त्यांची सोबत सोडत नसत. ते अगदी गुलामांच्या आमंत्रणाला देखील प्रतिसाद देत असत.
ते आपल्या पत्नींसाठी सर्वोत्तम पती होते. प्रेषितांच्या पत्नी, माता आयशा [र.] यांनी प्रेषितांच्या नम्रतेचे वर्णन केले आहे. “ते घरात असताना आपल्या घरच्यांची सेवा आणि मदत करण्यात व्यस्त असत आणि जेव्हा प्रार्थनेची वेळ होईल, तेव्हा शुचिर्भूत होऊन प्रार्थनेसाठी जात. ते स्वतःच्या चपली आणि कपडे स्वतःच शिवत. त्यांच्या राहणीमान आणि सवयीनुसार – जसे मेंढ्याचे स्वतः दुध घालणे आणि स्वतःची कामे स्वतः करणे – ते एक सामान्य माणूस होते.” [सहीह बुखारी]
ते मानवतेसाठी सर्वोत्तम मार्गदर्शक होते. त्यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वामुळेच त्यांना त्यांच्या हयातीत लाखो अनुयायी लाभले. त्यांच्या हयातीत त्यांच्या संदेशावर आधारित समाज उदयास आला. त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची सोबत लाभलेला कोणताही अनुयायी त्यांच्या संदेशापासून मागे फिरला नाही. निश्चितच ते अल्लाहचे महान प्रेषित होते, ज्यांच्यावर जगभरातील मुस्लिम आपल्या प्राणाहून जास्त प्रेम करतात आणि स्वतः अल्लाहने या संदर्भात म्हटले आहे, “निश्चितच अल्लाहच्या प्रेषितांच्या जीवनामध्ये तुमच्यासाठी सर्वोत्तम आदर्श आहे…” [कुरआन ३३:२१]