प्रस्तावना प्रेषित मुहम्मद स (Introduction Of Prophet Muhammad PBUH)

धर्मयुद्धाच्या आरंभासह, प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या विरुद्ध सर्वप्रकारच्या अपप्रचाराला सुरुवात झाली. मैदानावर शस्त्रांची आणि मैदानाच्या बाहेर निराधार पूर्वग्रह दुषित अपप्रचाराची लढाई क्रुसेड समर्थकांकडून लढली गेली. इस्लामबद्दल व्यक्त होणाऱ्या पाश्चात्य विद्वान आणि विचारवंतांवर क्रुसेड विचारांचा प्रभाव होता. या पाश्चात्य विचारवंतांच्या प्रभावातील भारतीय  लेखकांच्या बाबतीत देखील हीच स्थिती आहे. मात्र पाश्चात्यांच्या बाबतीत समाधानकारक बाब म्हणजे आधुनिक युगात धार्मिक सहिष्णुता आणि विचार स्वातंत्र्याच्या प्रभावामुळे, प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या जीवन आणि चरित्राच्या वर्णनासंदर्भात पाश्चात्य लेखकांच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. प्रेषित मुहम्मद [स.] यांच्याविषयी काही पाश्चात्य विद्वानांची मते, याचे समर्थन करतात. मात्र बहुसंख्य भारतीय साहित्यिक आजही २० व्या शतकापूर्वीच्या पाश्चात्यांचाच कित्ता गिरवीत आहेत. महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळात इस्लामबद्दल केले गेलेले लिखाण निव्वळ १८ व्या आणि १९ व्या शतकातील युरोपीय पूर्वग्रह दुषित मानसिकतेची सुधारित आवृत्ती आहे.

प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या बद्दलचे सर्वात मोठे वास्तव शोधण्यासाठी पश्चिमेला अजून एक पाऊल पुढे जावे लागणार आहे आणि ते म्हणजे मुहम्मद मानवजातीसाठी अल्लाहचे खरे आणि अंतिम प्रेषित आहेत. या बाबतीत भारतीय विद्वानांना मात्र दोन पाऊले उचलावी लागणार आहेत. पुरावे, संदर्भ आणि संबंधित माहिती उपलब्ध असतानाही मुहम्मदांचे प्रेषितत्व समजून घेण्याचा प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ प्रयत्न झाला नाही. आश्चर्य म्हणजे, मुहम्मदांच्या सचोटी आणि कर्तृत्वाबद्दल अत्यंत आदराचा आणि कौतुकाचा वर्षाव केला जातो, परंतु ते अल्लाहचे प्रेषित असल्याचा दावा स्पष्टपणे नाकारला जातो. यामुळे सत्यशोधनाची आणि तथाकथित वस्तुनिष्ठतेच्या पुनरावलोकनाची गरज निर्माण होते. मुहम्मद [स.] यांच्या जीवनातील खालील तथ्ये त्यांच्या प्रेषितत्वाच्या संदर्भात निःपक्षपाती, तार्किक आणि वस्तुनिष्ठ आधार उपलब्ध करवून देतात.

वयाच्या चाळीशीपर्यंत मुहम्मद [स.] कधीच एक राजकारणी, उपदेशक अथवा वक्ता म्हणून ओळखले जात नव्हते. ते कधीच राजकारण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, अतिभौतिक, भौतिक प्रश्न, नीतिशास्त्र किंवा कायदा या विषयांवर चर्चा करताना दिसले नाहीत. नि:संशय त्यांच्याकडे एक उत्कृष्ट चारित्र्य, प्रभावशाली शिष्टाचार आणि अत्यंत सुसंस्कृत आचरण होते. तरीही त्यांच्यात गंभीर लक्षवेधक मूलगामी विलक्षण असे काहीही नव्हते, ज्यामुळे लोकांना भविष्यात त्यांच्याकडून काहीतरी महान क्रांतिकारक कार्य होण्याची अपेक्षा व्हावी. परंतु जेव्हा ते हिरा गुहेतून नवसंदेश घेऊन बाहेर पडले, तेव्हा त्यांचा पूर्णतः कायापालट झाला होता. उल्लेखित गुणांची मूर्ती असणारी व्यक्ती अचानक दगलबाज बनणे आणि अल्लाहचा प्रेषित असण्याचा दावा करणे आणि अशाप्रकारे लोकांच्या रोषाला आमंत्रण देणे, शक्य नाही. प्रेषितत्वाचा दावा केल्यावर त्यांच्यावर लादलेले सर्व त्रास त्यांनी कोणत्या कारणासाठी सहन केले? मक्केच्या लोकांनी त्यांना ‘शासक’ म्हणून स्वीकारण्याची आणि धर्मोपदेश सोडण्याच्या अटीवर अरब भूमीवरील सारी संपत्ती त्यांच्या पायात ठेवण्याची तयारी दर्शविली होती. परंतु प्रेषित मुहम्मद [स.] यांनी त्यांचा प्रस्ताव नाकारून आणि सर्वप्रकारचे अपमान, सामाजिक बहिष्कार आणि त्यांच्याच लोकांकडून होणाऱ्या सर्वप्रकारच्या शारीरिक नि मानसिक छळांना तोंड देत एकट्याने धर्माचा प्रचार करणे निवडले. केवळ अल्लाहच्या पाठबळावर अल्लाहचा संदेश प्रसारित करण्याची त्यांची खंबीर इच्छा आणि इस्लाम हाच मानवजातीसाठी एकमेव जीवनपद्धती म्हणून उदयास येईल, या त्यांच्या खोलवर रुजलेल्या विश्वासामुळेच ते त्यांच्या विरोधात होणाऱ्या सर्वप्रकारच्या विरोध आणि षड्यंत्रांना तोंड देत डोंगरासारखे उभे राहिले. शिवाय, जर ते ख्रिश्चन आणि ज्यू धर्माबद्दल शत्रुत्वाची भावना बाळगत असते तर त्यांनी येशू, मोझेस आणि अल्लाहच्या इतर प्रेषितांवर विश्वास का ठेवला असता? त्यांच्यावर विश्वासाला इस्लामचे मूलभूत तत्व – ज्याशिवाय कोणीही मुस्लिम असू शकत नाही – म्हणून का निर्धारित करण्यात आले असते?

अशिक्षित असूनही त्यांनी चाळीस वर्षे अत्यंत सामान्य व शांत जीवन व्यतीत करूनही जेव्हा आपला संदेश सांगायला सुरुवात केली, तेव्हा सारे अरब त्यांच्या अद्भूत संदेशाने आणि वक्तृत्वाने थक्क व आश्चर्यचकित झाले. हा त्यांच्या प्रेषितत्वाचा अकाट्य पुरावा नाही का? ही घटना अतुलनीय अनुपम होती, अतुलनीय होती. सारे अरब कवी, उपदेशक आणि पट्टीच्या वक्त्यांचे सैन्य त्यांच्या वक्तृत्वातुल्य शैली सादर करण्यात अयशस्वी ठरले. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ते कुरआनमध्ये समाविष्ट त्या विज्ञानाशी सुसंगत सत्यांचा उच्चार कसा करू शकतात, ज्याचा त्यावेळी कोणत्याही मानवाला गंध लागला नव्हता?

शेवटचे पण महत्वाचे, सत्ता आणि अधिकार मिळवूनही ते खडतर जीवन का जगले? शेवटच्या क्षणी त्यांनी उच्चारलेल्या शब्दांवर विचार करा, “आम्हा प्रेषितांसाठी वारसपत्र नाही. आपण जे काही मागे सोडतो, ते समाजाच्या कल्याणासाठी आहे.” हे सर्व करून त्यांनी शेवटी काय प्राप्त केले? खरे पाहता, मुहम्मद [स.] या पृथ्वीतलावर मानवी जीवनाच्या सुरुवातीपासून वेगवेगळ्या देशांत आणि काळात पाठवलेल्या प्रेषितांच्या साखळीतील शेवटचा दुवा आहेत. याठिकाणी आपण आधुनिक काळातील पाश्चात्य विद्वानांची प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या संदर्भातील काही मते पाहूयात.

“हेतूची महानता, साधनांची कमतरता आणि आश्चर्यकारक परिणाम मानवी प्रतिभेचे तीन निकष मानले तर आधुनिक इतिहासातील कोणत्याही महान व्यक्तीची मुहम्मदांशी तुलना करण्याचे धाडस कोण करू शकेल? जगातील प्रभावशाली व्यक्तींनी केवळ शस्त्रे, कायदे नि साम्राज्ये निर्माण केली. त्यांनी जे स्थापना केले, ते काहीही असले तरी, स्थापन करणाऱ्यांच्या डोळ्यांसमोर कोसळणाऱ्या भौतिक शक्तींपेक्षा जास्त होते. मात्र त्यांनी केवळ सैन्य, कायदे, साम्राज्ये, जनसमूह आणि राजवंशच नव्हे, तर तत्कालीन संदर्भात तृतीयांश जगाला हलवले; आणि त्याहून अधिक देव, धर्म, कल्पना, श्रद्धा आणि आत्मा यांना हलवले. विजयासाठीचा त्यांची संयम आणि ध्येयाला समर्पित महत्त्वकांक्षा कोणत्याही प्रकारे साम्राज्यासाठी धडपडत नव्हती. त्यांच्या अंतहीन प्रार्थना, ईश्वराबरोबरचे त्यांचे गूढ संभाषण, त्यांचा मृत्यू आणि मृत्यूनंतरचा त्यांचा विजय; हे सर्व खोटेपणाची नव्हे तर दृढ विश्वासाची साक्ष देतात, ज्याने त्यांना दृढता पुनर्संचयित करण्याची शक्ती दिली. त्यांचा हा सिद्धांत दुहेरी होता, ईश्वराचे एकत्व आणि ईश्वराची अभौतिकता; पहिला ईश्वर काय आहे हे सांगणारा, दुसरा ईश्वरा काय नाही हे सांगणारा; एक खोट्या ईश्वराचा पाडाव करतो, तर दुसरा खऱ्या ईश्वराची संकल्पना मांडतो.

मुहम्मद [स.] एक तत्वज्ञ, वक्ता, प्रेषित, विधायक, योद्धा, विचारांचे विजेते, तर्कसंगत सिद्धांत पुनर्संचयित करणारे आणि प्रतिमा नसलेल्या पंथाचे, वीस भौतिक साम्राज्यांचे आणि एका महाकाय आध्यात्मिक साम्राज्याचे संस्थापक आहेत. ज्या मानकांद्वारे मानवी महानता मोजली जाऊ शकते, त्या मानकांच्या आधारे आम्ही विचारू शकतो की त्यांच्याहून श्रेष्ठ दुसरा कोणी आहे का?

Lamartine, Histoire de la Turquie, Paris 1854, Vol II, Pg. 276-77

“हा प्रचार नाही तर त्यांच्या धर्माची शाश्वतता आहे, जी आपल्या आश्चर्यास पात्र आहे. त्यांनी मक्का आणि मदिना येथे कोरलेली तीच शुद्ध आणि परिपूर्ण छाप भारतीय, आफ्रिकन आणि तुर्की धर्मांतरितांनी बारा शतकांनंतरही जतन केली आहे. त्यांनी त्यांच्या श्रद्धेचा व भक्तीचा उद्देश माणसाच्या संवेदना आणि कल्पनाशक्तीच्या पातळीवर आणण्याचे कार्य केले आहे. मी एका ईश्वरावर विश्वास ठेवतो आणि मुहम्मद अल्लाहचे प्रेषित आहेत, हा इस्लामचा साधा नि अविचल सार आहे. खऱ्या ईश्वराच्या वैचारिक प्रतिमेने कोणतीही दृश्य मूर्ती कधी साकारली नाही; प्रेषितांच्या सन्मानाने कधी मानवी सद्गुणांची मर्यादा ओलांडली नाही आणि त्यांच्या प्रभावी नियमांनी त्यांच्या शिष्यांची कृतज्ञता कधीही तर्क आणि धर्माच्या मर्यादेबाहेर गेली नाही.”

एडवर्ड गिब्बन आणि सायमन ओकले, हिस्ट्री ऑफ द सारसेन एम्पायर, लंडन १८७०, पृ. ५४

“ते सीझर आणि पोप होते; मात्र ते पोपच्या अवडंबरापासून मुक्त पोप आणि सीझरच्या राजस थाटापासून मुक्त सीझर होते. स्थिर सैन्यबळ, अंगरक्षक, महाल आणि निश्चित साधन नसताना एखाद्या व्यक्तीला असे म्हणण्याचा अधिकार असेल की, त्याने केवळ ईश्वरी सहाय्याद्वारे राज्य केले आहे, तर तो अधिकार मुहम्मदांकडे होता. कारण त्यांच्याकडे असणारी सारी शक्ती त्याच्यासाठीच्या साधनांशिवाय आणि माध्यमांशिवाय प्राप्त झाली होती.”

बॉसवर्थ स्मिथ, मोहम्मद आणि मोहम्मदवाद, लंडन १८७४, पृ. ९२

“अरेबियातील महान प्रेषितांच्या जीवन आणि चरित्राचा अभ्यास करणाऱ्याला, त्यांच्या जीवनाचा व जीवन संदेशाचा बोध झालेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रेषितांबद्दल आदर न वाटणे, निव्वळ अशक्य आहे. निश्चितच ते ईश्वराच्या सर्वोच्च दूतांपैकी एक होते. आणि जरी मी तुमच्यापैकी अनेकांना परिचित असलेल्या गोष्टी तुम्हाला सांगेन, तरीही मी जेव्हा देखील त्यांचे चरित्र पुन्हा पुन्हा वाचते, तेव्हा मला स्वतःला असे वाटते की, त्या महान प्रेषितांच्या आदरासाठी आणखीन एक कारण मला सापडले आहे.”

अॅनी बेझंट, द लाइफ अँड टीचिंग्स ऑफ मुहम्मद, मद्रास १९३२, पृ. ४

“त्यांच्या संदेशासाठी छळ सहन करण्याची त्यांची तयारी, त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि त्यांच्याकडे नेता म्हणून पाहणाऱ्या अनुयायांचे उच्च नैतिक चरित्र आणि त्यांच्या अंतिम कामगिरीची महानता – हे सर्व त्यांच्या मूलभूत सचोटीचे समर्थन करतात. मुहम्मद यांना ढोंगी मानल्याने अनेक समस्या निर्माण होतात. याशिवाय, इतिहासातील कोणत्याही महामानवाचे मुहम्मद यांच्याइतके कौतुक पश्चिमेत केले जात नाही.”

डब्ल्यू. माँटगोमेरी, मक्का येथील मोहम्मद, ऑक्सफर्ड १९५३, पृ. ५२

“मुहम्मद, इस्लामची स्थापना करणारे प्रेरित मनुष्य, इ.स. ५७० च्या सुमारास मूर्तिपूजा करणाऱ्या अरब जमातीत जन्मले. जन्मतःच अनाथ. ते नेहमी गरीब, गरजू, विधवा, अनाथ, गुलाम आणि दीनदुबळ्यांसाठी विशेष आग्रही होते. वयाच्या विसाव्या वर्षी ते एक यशस्वी व्यापारी होते आणि लवकरच एका श्रीमंत विधवा महिलेच्या उद्योगाचे संचालक झाले. जेव्हा ते पंचवीस वर्षांचे झाले, तेव्हा त्या विधवेने त्यांची योग्यता ओळखून त्यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला. ती महिला पंधरा वर्षांने मोठी असूनही त्यांनी तिच्याशी लग्न केले आणि जोपर्यंत ती जगली, तोपर्यंत ते एकनिष्ठ पती राहिले.

देवदूताने त्यांना ‘वाचा’ अशी आज्ञा दिली. आतापर्यंत आपल्याला माहिती असलेले मुहम्मद वाचू किंवा लिहू शकत नव्हते, परंतु देवदूताने ते प्रेरित शब्द बोलताच मुहम्मद यांनी त्या शब्दांचा उच्चार करणे सुरु केले. असे शब्द जे लवकरच जगाच्या एका मोठ्या भागात क्रांती घडवून आणणार होते. ते म्हणजे, ‘ईश्वर एकमात्र आहे.’

सर्व गोष्टींमध्ये मुहम्मद अत्यंत व्यावहारिक होते. जेव्हा त्यांच्या प्रिय मुलाचे इब्राहीमचे निधन झाले, तेव्हा योगायोगाने ग्रहण झाले आणि ईश्वराच्या शोकाच्या अफवा उठू लागल्या. तेव्हा मुहम्मदांनी जाहीर केले, ‘ग्रहण ही निसर्गाची घटना आहे. अशा गोष्टींचे श्रेय माणसाच्या मृत्यूला किंवा जन्माला देणे मूर्खपणाचे आहे.’

मुहम्मदांच्या निधनाप्रसंगी त्यांना दैवत करण्याचा अयशस्वी प्रयत्न काही जणांकडून झाला. मात्र त्यांच्या प्रशासकीय उत्तराधिकारी होणाऱ्या व्यक्तीने धार्मिक इतिहासातील उत्कृष्ट भाषणाद्वारे हा उन्माद संपवला. त्याने म्हटले, तुमच्यापैकी कोणी मुहम्मदांची भक्ती करणारा असेल तर जाणून घ्या, त्यांचे निधन झाले आहे आणि तुम्ही एकमात्र ईश्वराचे उपासक असाल तर जाणून घ्या की, तो सदैव जिवंत राहणार आहे.”

जेम्स ए. मिचेनर, रीडर्स डायजेस्ट, मे १९५५, पृ. ६८-७० : ‘इस्लाम – गैरसमज असलेला धर्म’

“जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मुहम्मदांची निवड काही वाचकांना आश्चर्यचकित करू शकते आणि काही जणांना प्रश्न पडू शकतो. परंतु, मानव इतिहासातील ते एकमेव व्यक्ती आहेत, जे धार्मिक व धर्मनिरपेक्ष या दोन्ही स्तरांवर अत्यंत यशस्वी ठरले आहेत.”

मायकेल एच. हार्ट, द 100 : ए रँकिंग ऑफ द मोस्ट इंफ्लुएंशियल पर्सन इन हिस्ट्री, न्यूयॉर्क, हार्ट पब्लिशिंग कंपनी, १९७८, पृ. ३३

Leave a Comment