मुस्लिमांना प्रिय रमजान (Muslims and Their Love For Ramdhan)

इस्लाम चांद्र दिनदर्शिका वापरतो. म्हणजेच, प्रत्येक महिन्याची सुरुवात नवीन चंद्राच्या दर्शनाने होते. चंद्र दिनदर्शिका सौर दिनदर्शिकेपेक्षा सुमारे ११ दिवस लहान असल्याने, इस्लामी महिने दरवर्षी मागे सरकतात. मुस्लिमांसाठी रमजानचे आगमन हा आनंदाचा आणि उत्सवाचा पर्व असतो. मात्र इस्लामच्या तत्त्वांशी अपरिचित लोकांना विचित्र वाटेल, अशा पद्धतीने बरेच लोक हा उत्सव साजरा करतात. रमजानचा महिना हा निव्वळ पार्ट्या आणि राजकारणाचा महिना नसून, उपासनेचा महिना आहे. रमजान महिन्याचे उपवास करणे हा इस्लामच्या स्तंभांपैकी एक आहे.

मुस्लिम एकमात्र अल्लाहबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतात आणि त्याची आज्ञा पाळतात आणि उपासना करतात. कुरआन आणि प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या परंपरेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही अल्लाहची उपासना करतो. रमजान उपासनेचा विशेष महिना आहे. हा महिना रोजा, नमाज आणि कुरआन समजून घेण्यासाठी आणि विशेष अतिरिक्त नमाज अदा करण्याचा महिना आहे. रात्रीच्या वेळी मस्जिद जणू जिवंत होतात, जेव्हा मुस्लिम एकत्र उपवास सोडतात आणि नमाज अदा करतात. मुस्लिम लोक खांद्याला खांदा लावून नमाज अदा करताना आणि अल्लाहची स्तुती करताना कुरआन पठणाचा मधुर ध्वनी संपूर्ण रात्री ऐकू येत असतो.

जगभरातील मुस्लिमांना रमजानचा महिना अत्यंत प्रिय आहे. ते तीव्र उत्साहाने त्याची वाट पाहत असतात. रमजान पूर्वीच्या दिवसांमध्ये आयुष्याचे मुल्यांकन केले जाते आणि एका महिन्याच्या गंभीर उपासना आणि विनवणीसाठी योजना आखल्या जातात. उलटी मोजणी सुरू होते आणि आशीर्वादित महिना येईपर्यंत किती आठवडे राहिले आहेत, याची चर्चा सुरू होते. कारण रमजान मुस्लिमांसाठी त्यांच्या अध्यात्मिक अनुभूतीचा आनंदोत्सव आहे. दिवसाचे रोजे आणि रात्रीची नमाज यामुळे रमजान प्रतिफळ आणि अमर्याद बक्षिसाची संधी देतो. हा महिना आध्यात्मिक चिंतन आणि याचनेचा महिना आहे. या महिन्यात मन-भावना सांसारिक क्रियाकलापांपासून दूर आणि अल्लाहकडे वळली जातात.

रमजान महिन्यात, सर्व शारीरिकदृष्ट्या प्रौढ आणि निरोगी मुस्लिमांसाठी रोजांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वप्रकारचे अन्न आणि खाद्य पदार्थ वर्ज्य करणे हे केवळ बाह्य पैलू आहेत. रोजांचे आध्यात्मिक पैलूही तितकेच किंबहुना त्याहून जास्त महत्वाचे आहेत, ज्यामध्ये गप्पाटप्पा, खोटे बोलणे, निंदा करणे आणि वाईट चारित्र्यांचे सर्व गुण यापासून परावृत्त राहणे समाविष्ट आहे. विचार आणि कृती शुद्ध करण्याचा मार्ग म्हणून सर्व अश्लील दृश्ये आणि संदर्भ टाळले जातात. रोजा भुकेचा अनुभव घेण्याचा आणि रंजल्या-गांजल्यांबद्दल सहानुभूती विकसित करण्याचा आणि अल्लाहच्या कृपांबद्दल कृतज्ञता व प्रशंसा व्यक्त करण्याचा मार्ग आहे. अल्लाहने म्हटले आहे, ‘हे श्रद्धावंतांनो! तुमच्यासाठी रोजांचे पालन करणे विहित करण्यात आले आहे, जसे तुमच्या आधीच्या लोकांसाठी केले गेले होते, जेणेकरून तुम्ही पापभिरू व्हावे.’

प्रेषित मुहम्मद [स.] यांनी आपल्याला आठवण करून दिली की, रोजा म्हणजे फक्त खाण्यापिण्यापासून दूर राहणे नाही तर स्वतःला दुर्गुणांपासून परावृत्त करणे देखील आहे. ते म्हणाले, “अश्लील संभाषण आणि वर्तन न टाळणाऱ्या व्यक्तीच्या अन्नपाणी वर्ज करण्याला अल्लाहकडे कसलीच किंमत नाही.”

रमजान महिन्यात मुस्लिम कुरआनशी संबंध प्रस्थापित करण्याचा किंवा पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करतात. अल्लाहचा संदेश मार्गदर्शक प्रकाश आणि कृपा आहे. जो कोणी त्याचे गंभीरपणे वाचन करतो आणि त्यानुसार जीवन व्यतीत करतो, त्याच्या जीवनात अमुलाग्र बदल घडतात. अल्लाहने रमजानच्या महिन्यात कुरआनचे अवतरण केले. रमजान आणि कुरआन या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. कुरआन सोबत बाळगणे, त्याचे वाचन, स्मरण आणि पठण करणे किंवा त्यावर चिंतन करणे अध्यात्मिकदृष्ट्या उत्साहवर्धक आणि शक्तीचा स्त्रोत आहे. विशेषतः रात्रीचे पठण हिताचे आहे, दिवसाचे व्यत्यय नाहीसे झाले की रात्रीच्या शांततेत अल्लाहशी जवळीक आणखी दृढ होते.

महिन्याच्या शेवटच्या काही विषम संख्या असलेल्या रात्रींपैकी एक लैलतुल कद्र ‘निर्णयाची रात्र’ किंवा ‘नशिबाची रात्र’ आहे. ही पवित्र महिन्यातील सर्वात पवित्र रात्र आहे. ती महान रात्र, ज्या रात्री अल्लाहने पहिल्यांदा प्रेषित मुहम्मद [स.] यांच्याकडे कुरआन अवतरीत करण्यास सुरुवात केली. विशेषत: उत्कट आणि समर्पित नमाजची ही वेळ आहे आणि अशा गोष्टींशी संबंधित बक्षिसे आणि कृपाप्रसाद अमर्याद आहेत. मुस्लिमांना कुरआनात सांगितले आहे की, या एका रात्रीत नमाज अदा करणे हजार महिन्यांच्या नमाजपेक्षा चांगले आहे. मात्र ही रात्र नेमकी कोणत्या तारखेची रात्र आहे, हे कोणालाच माहीत नाही. याद्वारे अल्लाहने मानवाची परीक्षा घेतली आहे.

रमजान सत्कर्म आणि परोपकाराचा महिना आहे. या महिन्यात मुस्लिम लोक उदारपणे दान करण्याचा आणि त्यांची सत्कृत्ये वाढवण्याचा प्रयत्न करतात. धर्मादाय स्मितहास्य करण्याइतके सोपे असू शकते; त्यासाठी भव्य प्रदर्शनांची गरज अजिबात नाही. कसलाही गाजावाजा न करता, शांतपणे दिलेले दान हे प्राप्तकर्त्यासाठी आणि देणार्‍यासाठी चांगले आहे. प्रेषित मुहम्मद, त्यांचे सहकारी आणि समस्त मुस्लिमांकडून दाखवल्या जाणाऱ्या उदारतेबद्दल आपण पुढील लेखांत चर्चा केली आहे.

 

Leave a Comment