मांसाहारावरील आक्षेपांची उत्तरे ( Answers to the Objections to Non-Vegetariasm)

या प्रकरणात मांसाहारावरील आक्षेपांची चर्चा करूयात. मांसाहाराबद्दल चर्चा करताना मांसाहारावर घेतले जाणारे आक्षेप काय आणि कोणत्या प्रकारचे आहेत, हे जाणून घेणे जास्त फायद्याचे ठरेल. शाकाहारींतर्फे मांसाहारासंदर्भात घेतला जाणारा एक आक्षेप असा आहे की, मांसाहार विकृती आहे, हिंस्र स्वभाव आहे. मात्र मानवी इतिहासाचा अगदी सामन्यातला सामान्य विद्यार्थीदेखील हे सांगू शकतो की हा आक्षेप अतिशय हास्यास्पद आहे. मानवजातीचा इतिहास आम्हाला पुराव्यासह सांगतो की, माणूस मूलतः मांसाहारी होता आणि आजही आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत मानव स्थिर झाला नव्हता, शेतीची संकल्पना विकसित झाली नव्हती, तोपर्यंत तो मांसाहारावर अवलंबून होता. त्याचे मुख्य अन्न शिकार करून प्राप्त केलेले मांसच होते. आगीचा शोध लागल्यानंतर तो मांस शिजवून खाऊ लागला.

मांसाहार नैसर्गिक आहार नाही, या आक्षेपालाही काही आधार नाही. मानवाचा आहार भौगोलिक परिस्थितीवर, हवामान आणि उत्पादनावर अवलंबून असतो. जगात बहुसंख्यांकांच्या आयुष्याची मदार मांसाहारावर अवलंबून आहे. जगात असे अनेक देश आहेत, जेथे शेती केली जाऊ शकत नाही. तेथे गवताची मोठमोठी मैदाने आहेत. अनेक देश वाळवंटी प्रदेशात मोडतात. अशा भूभागात शेळ्या, मेंढ्या, उंट आणि अन्य जनावरे मांसासाठी पाळली जातात. तसेच यासारख्या अनेक भागातून जगभरात मांस पुरविले जाते. दक्षिण अमेरिकेतील देश जगातील सर्वात मोठे मांस निर्यातक देश आहे. यानंतर संयुक्त राष्ट्र अमेरिकेचा क्रम येतो. आपल्या देशातील गोवंश हत्याबंदीने देशाला जागतिक मांस निर्यातकांमध्ये पहिला क्रमांक पटकावून दिला आहे. आपल्या देशाच्या मांस निर्यातीच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल २७ हजार कोटींची आहे.[1] देशांतर्गत गोवंश हत्याबंदीने मांसाच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणली आहे. मागील तीन वर्षात आपला भारत देश जगातील सर्वात मोठा मांस निर्यातक ठरला आहे. आपण ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेतील महाकाय निर्यातकांना केव्हाच मागे सोडले आहे. २०१४-२०१७ दरम्यान आपल्या देशातून ९४ लाख ८५ हजार मेट्रिक टन मांसाची निर्यात झाली आहे. म्हणजे वर्षाला सरासरी ३० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त मांस निर्यात करण्यात आले आहे. युरोपातील डेन्मार्क, हॉलंड आणि बेल्जियम मोठे मांस निर्यातक देश आहेत. या राष्ट्रांचे अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणावर मांस निर्यातीवर आधारित आहेत. इटली, जर्मनी, अमेरिका, स्पेन, फ्रांस, हॉलंड आणि बेल्जियम ही जगातील सर्वात जास्त मांसाहार करणारी राष्ट्रे आहेत.

मासे खाणे देखील मांसाहारच आहे. जगातील जवळपास सर्वच राष्ट्रांत मासे खाल्ले जातात. अनेक राष्ट्रांत मासे मुख्य आहार आहे. कारण या राष्ट्रात समुद्र, कालवे, नदी, तलाव मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच या राष्ट्रांत शेतीचे प्रमाण कमी आहे, म्हणून येथील प्रमुख खाद्य मासेच आहेत. मांसाप्रमाणे जगभरात मासेही निर्यात केले जातात. संयुक्त राष्ट्र अमेरिका, ब्रिटन, नार्वे, जर्मनी, कॅनडा आणि जपान जगातील सर्वात मोठे मासे निर्यातक राष्ट्र आहेत. जपानमध्ये जितके मासे सापडतात, तितके मासे क्वचितच जगातील अन्य एखाद्या राष्ट्रात सापडत असतील. चीन-जपानमध्ये प्राचीन काळापासून मासे पकडले जातात. मासे हेच त्यांचे मुख्य अन्न आहे. आपल्याकडे समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचे मुख्य अन्न मासे आणि भात आहे. बंगाली, कोकणी आणि कोळी लोकांचे मुख्य अन्य मासे हेच आहे.

ग्रीनलंड व उत्तर अमेरिकेच्या बर्फाळ प्रदेशात वसणाऱ्या एस्किमो लोकांचा अन्नाचा प्रश्न माशांनीच सोडविला आहे. एस्किमोंच्या प्रदेशात बागा नाहीत, शेती नाही, जनावरे नाहीत. या लोकांच्या जीवनाची सारी मदार सील, व्हेल आणि डालरस या सारख्या माशांवरच आहे. हे मासे त्यांच्या केवळ अन्नाची नव्हे तर कपडे, टोपी, तंबू आणि जीवनाच्या दुसऱ्या बऱ्याच गरजांची पूर्तता करतात. एका व्हेल माशापासून टनाने चरबी प्राप्त होते. एस्किमो या चरबीचे तेल वापरतात. यावरून हे सिद्ध होते की, मांसाहार पूर्णतः नैसर्गिक आहार आहे. मानवाने अजिबात प्रतिकूल परिस्थितीत मांसाहाराला निवडलेले नाही.

काहींचा युक्तिवाद आहे की, मानवी शरीराची रचना मांसाहारास पूरक नाही. माध्यमिक शिक्षण घेत असताना आमचे विज्ञान विषयाचे गुरुजी नेहमी म्हणायचे की, “मानवी शरीराची रचना मांसाहारास पूरक नाही. मांसाहाराचे सेवन केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतात. मांसाहार करणाऱ्यांचे आतडे सडतात, जठर नासते. म्हणून मांसाहारी लोक सतत रोगी असतात.” विद्यार्थी दशेत असंख्य कोवळ्या मनांवर असले कुसंस्कार होत असतात! वास्तविकतः असले विचार विज्ञाननिष्ठ भूमिकेतून नव्हे तर द्वेष भावनेतून मांडलेले जातात. मुस्लिम समाजासंदर्भात अशाप्रकारचे अनेक द्वेषवर्धक प्रबोधन समाजात अनेक ठिकाणी चालत असते. नकळत सर्वसामान्यांचे मन मुस्लिम समाजाविरोधात वळविले जाते.

वरील आक्षेपाला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सजीवांच्या शरीररचनेवर चिंतन केल्यास हे दिसून येते की, शाकाहारी प्राण्यांच्या शरीररचनेत आणि मांसाहारी प्राण्यांच्या शरीररचनेत मुलभूत फरक आहेत. शाकाहारी प्राण्यांचे [Herbivorous] उदाहरण घ्या. शाकाहारी प्राण्यांचे दात पसरट व सपाट [flat set of teeth] असतात. जेणेकरून भाजीपाला खाताना ते आपल्या पसरट आणि सपाट दातांचा वापर करून चावू शकतात. याउलट मांसाहारी [Carnivorous] प्राण्यांचे सुळे धारदार [Canine set of teeth] असतात. जेणेकरून मांस खाताना त्यांना लचके तोडून खाता यावे. आता मानवी शरीराची रचना पहा. त्याच्या दातांच्या रचनेला पहा. मानवाला दोन्ही प्रकारचे दात देण्यात आले आहेत. त्यांना सपाट आणि पसरट दात आणि दाढांच्या व्यतिरिक्त धारदार सुळेही आहेत. आपल्या धारदार सुळ्यांचा वापर करून आपण अन्नाचे तुकडे तोडतो तर सपाट व पसरट दातांचा वापर करून आपण अन्न चावून खातो.

शाकाहारी प्राण्यांची पचन व्यवस्था पहा. ते केवळ शाकाहार पचवू शकतात. तर मांसाहारी प्राणी केवळ मांस पचवू शकतात. शाकाहारी प्राणी मांसाहार पचवू शकत नाहीत तर मांसाहारी प्राणी शाकाहार पचवू शकत नाहीत. दक्षिण अमेरिकेतील देशांत एक विलक्षण प्रयोग करण्यात आला. तेथे गायींना मांस शिजवून देण्यात आले. जबरदस्तीने खाऊ घालण्यात आले. मांस खाल्ल्याने गायींना विचित्र रोग झाला आणि या गाई पटापट मरू लागल्या. या रोगाला Mad Cow Disease नाव देण्यात आले.[2] आता मानवाची पचन व्यवस्था पहा. तो शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ पचवू शकतो. याचा मानवी शरीरावर कसलाही विपरीत परिणाम होत नाही.

शाकाहारी प्राण्यांचा जबडा अन्न चावताना Horizantally हलतो. तर मांसाहारी प्राण्यांचा जबडा केवळ Vertically हलू शकतो. परंतु मानवी जबडा Horizantally व Vertically दोन्हीप्रकारे हलू शकतो. आपल्या जबड्याची रचना शाकाहार व मांसाहार दोन्हीसाठी पूरक आहे. तसेच शाकाहारी प्राण्यांच्या तोंडात स्त्रवणारी लाळ Alkaline स्वरूपाची असते. तर मांसाहारी प्राण्यांच्या तोंडात स्त्रवणारी लाळ Acidic स्वरूपाची असते. मानवाच्या तोंडात येणारी लाळ दोन्ही स्वरूपाची असते. मानवी लाळग्रंथीमधून ज्या Enzymes स्त्रवतात, त्या Acidic आणि Alkaline दोन्ही स्वरूपाच्या असतात. यावरून हे स्पष्ट होते की, मानवी शरीराची रचना मांसाहारास पूरक आहे. मानव शाकाहारी किंवा मांसाहारी नसून मिश्रहारी [Omnivorous] आहे.

आधुनिक काळात असा प्रचार केला जात आहे की, शाकाहार तुलनेने जास्त लाभदायक आहे. मात्र हा निव्वळ भ्रम आहे. यासाठी कसलाच वैज्ञानिक आधार नाही. निव्वळ वैयक्तिक निरीक्षणांच्या आधारे असले निष्कर्ष काढले जातात. शाकाहार हा मांसाहारापेक्षा जास्त लाभदायक आहे, असे मानले तरी मांसाहार निषिद्ध मानला जाऊ शकत नाही. उदा. जर सफरचंद आंब्यापेक्षा जास्त लाभदायक आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केले गेले तरी याचा अर्थ असा होत नाही की, आंबा खाऊच नये. किंवा सफरचंद जास्त लाभदायक सिद्ध झाल्याने आंबा आपोआप हानिकारक सिद्ध होतो असेही नाही. आंबा जर खाण्यातून वर्ज्य करायचा असेल तर त्याचे हानिकारक असणे सप्रमाण सिद्ध करून दाखवावे लागेल. तसेच मांसाहार निषिद्ध करायचा असल्यास त्यासाठी वैज्ञानिक आधार उपलब्ध करून द्यावा लागेल. तो मानवासाठी हानिकारक आहे, घातक आहे, हे सिद्ध करावा लागेल. त्याशिवाय शाकाहाराचे कितीही लाभ वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केले तरी मांसाहार निषिद्ध मानता येत नाही.

काही लोकांचा युक्तिवाद आहे की, मांसाहारामुळे अनेक रोग वाढतात. मात्र हा आक्षेप उथळ मानसिकतेची देणगी आहे. मांसाहारामुळे आजार होतात, असे म्हणणे चिंतनाच्या अभावाचा पुरावा आहे. खाद्य पदार्थांच्या कमी किंवा अतिरेकी वापराने ‘आजाराच्या’ शक्यता निर्माण होत असतात. खाद्य जर संतुलित असेल तर कोणताच रोग होत नाही. उदा. तेलाच्या अतिरेकी वापराने कोलेस्टेरोल वाढतो. ज्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका निर्माण होतो. आयोडीन नसलेल्या मिठाचा वापर केल्याने Thyroid होतो तर मिठाचा अतिरेकी वापर केल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होतो. मात्र याचा अर्थ असा नाही की, शाकाहाराने आजार वाढतात. याचा अर्थ केवळ इतका आहे की, आहार संतुलित नसेल तर आजाराच्या शक्यता निर्माण होतात. मग आहार शाकाहार असो की मांसाहार. हे देखील लक्षात ठेवायला हवे की, जगातील सर्वाधिक मृत्यू दारू आणि तंबाखूच्या सेवनामुळे होतात. दारू व तंबाखू दोन्ही वनस्पतीपासून प्राप्त केले जातात. तसेच अनेक रोगांचा संसर्ग पाण्यातून होतो. पावसाळ्यात अनेक बालके यासम रोगांमुळे दगावतात. परंतु यामुळे पाणी मानवासाठी अपायकारक आहे, असा चुकीचा अर्थ अजिबात काढला जाऊ शकत नाही.

काहींचे म्हणणे आहे की, भूतदया नसेल तर मानवी स्वभाव हिंसक बनतो. मात्र जीवहत्येशिवाय या जगात जिवंत राहणे अशक्य आहे. जीवहत्या समजून घेताना चूक यामुळे होते, कारण केवळ मनुष्य आणि प्राण्यांनाच जीव असतो, असा गैरसमज आहे. वास्तविकतः प्रत्येक सजीव जीवधारी असतो. वृक्ष, वनस्पती, रोपटे सारे सजीव असतात आणि त्यांना संवेदनाही असतात. काही वनस्पती फार संवेदनक्षील असतात. त्यांच्या संवेदना उघड स्वरुपात अनुभवल्या जाऊ शकतात. लाजवंतीसारख्या वनस्पती याचे उत्तम उदाहरण आहेत. म्हणून प्राणीहत्या जीवहत्या आहे असा दावा करणाऱ्यांनी वनस्पती हत्यादेखील करू नये. कारण वनस्पतीदेखील सजीव असतात.

या आक्षेपाचा दुसरा भाग असा आहे की, प्राणीहत्येमुळे मानवी स्वभाव हिंसक बनतो. म्हणजे मांसाहाराच्या सेवनाने व्यक्ती हिंसक होत जाते. हा आक्षेपही अत्यंत निराधार आहे. शांतीच्या नोबेल पारितोषिकाचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके अपवाद वगळता अन्वर सादात, यासेर अराफात, मदर टेरेसा व नेल्सन मंडेलासारखे सारे विजेते मांसाहारी आहेत. याउलट लाखो ज्यूंचा नरसंहार करणारा हिटलर मात्र शाकाहारी होता. मानवाच्या विकृत स्वभावाशी त्याच्या शाकाहारी किंवा मांसाहारी असण्याचा, तसेच त्याच्या धर्माचा काहीच संबंध नाही. हिंसक स्वभाव हा सामाजिक परिस्थिती आणि जडणघडणाशी संबंधित असतो, आहाराशी नाही.

एक आक्षेप असा आहे की, मांसाहारामुळे मानवी स्वभावावर विपरीत परिणाम होतो. आपण केवळ वादासाठी मान्य करूयात की, मांसाहारामुळे व्यक्ती हिंसक बनते. परंतु कोणत्या मांसाहारामुळे व्यक्ती हिंसक बनते? तर याचे उत्तर आहे की, हिंसक प्राण्याचे मांस भक्षण केल्याने व्यक्ती हिंसक बनू शकते. हिंसक नसलेल्या प्राण्यांचे मांसभक्षण केल्याने व्यक्ती हिंसक बनत नाही. इस्लाममध्ये केवळ शाकाहारी चतुष्पाद प्राण्यांचे मांसभक्षण करण्याची अनुमती देण्यात आली आहे. प्राणी शाकाहारी असावा आणि चतुष्पाद असावा. या दोन अटींची पूर्तता होत नसेल तर तो प्राणी खाण्यायोग्य प्राण्यांच्या श्रेणीत येतच नाही. प्रेषित मुहम्मद [स.] यांनी आपल्या अनुयायांना याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले. मांसाहारासाठी कोणते प्राणी वैध आणि कोणते प्राणी अवैध आहेत, याच्या अटी त्यांनी निर्धारित केल्या. त्या अटींनुसार निषिद्ध प्राणी हे आहेत.

कुरआनच्या सुरह मायदा, आयत ३ प्रमाणे आणि प्रेषितांचे सोबती तसेच चुलत बंधू आदरणीय इब्ने अब्बास यांच्या कथनानुसार इस्लाममध्ये अभोज्य असलेले प्राणी पुढीलप्रमाणे आहेत; लचके तोडून खाणारे प्राणी निषिद्ध आहेत.[3] निशाचर प्राणी निषिद्ध आहेत.[4] सरपटणारे प्राणी निषिद्ध आहेत.[5] पंज्याने पकडून खाणारे पक्षी निषिद्ध आहेत.[6] मांसाहारी प्राणी निषिद्ध आहेत. मलमूत्र आणि विष्ठा खाणारे प्राणी निषिद्ध आहेत.[7] जबीहाशिवाय आकस्मिक वा अपघाती मृत्यू झाला असे मृत प्राणी निषिद्ध आहेत.[8] अंधश्रद्धेपोटी नवस मानून बळी दिलेले प्राणी निषिद्ध आहेत.[9]

उल्लेखित नियमांना कोंबडी आणि जलचर प्राणी अपवाद आहेत. जलचर प्राण्यांसाठी फक्त एक अट आहे की, प्राणी जलचर असावा. उभयचर प्राण्यांना वरील नियम लागू होतील. यावरून हे स्पष्ट होते की, भूचर आणि उभयचर प्राण्यांपैकी केवळ शाकाहारी प्राण्यांच्याच सेवनाची परवानगी देण्यात आली आहे. इस्लामने मांसाहार करण्याची परवानगी वरील अटींची पूर्तता होत असेल तरच दिली आहे, अन्यथा नाही हे स्पष्ट आहे.

सारांश:

मांसाहार हा हिंस्र स्वभाव आहे की मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे? आक्षेपांचे वैज्ञानिक आणि ऐतिहासिक विश्लेषण मांसाहाराच्या नैसर्गिकतेचा पुरावा देते. मानवी इतिहास दर्शवतो की, शेती विकसित होण्यापूर्वी माणूस शिकारी होता आणि मांसाहारावर अवलंबून होता. मानवी शरीररचना मिश्रहारी [omnivorous] आहे; सपाट दात शाकाहार चावण्यासाठी, तर धारदार सुळे मांस तोडण्यासाठी आहेत. लाळग्रंथी अमायलेससारखे एन्झाइम्स स्त्रवतात, जे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचे पचन सुलभ करतात. APEDA 2023 नुसार, देशाने २०२०-२२ मध्ये ५०,००० कोटींचे मांस निर्यात केले, जे मांसाहाराच्या जागतिक स्वीकृतीला दर्शवते. मांसाहारामुळे रोग होण्याचा आक्षेप उथळ आहे; संतुलित आहार [शाकाहार वा मांसाहार] रोग टाळतो.

संदर्भ:

[1] https://www.amarujala.com/india-news/concern-over-mob-lynching-supreme-court-says-make-strict-laws. ही माहिती जुनी आहे. APEDA २०२२-२३ च्या अद्यावत माहितीनुसार ही उलाढाल ५० हजार कोटींच्या पुढे गेली आहे.

[2] https://www.independent.co.uk/life-style/the-birth-of-bse-1344995.htm

[3] इमाम शौकानी, फिकहूल हदीस, भाग २, पृष्ठ ४११

[4] इमाम इब्ने माजाह, सुनन, हदीस ३२३२-३२३४

[5] इमाम मुस्लिम, सहीह, हदीस ४७५२

[6] इमाम बुखारी, सहीह, हदीस ५५३०

[7] इमाम तीर्मिजी, सुनन, हदीस ३०३

[8] कुरआन, सुरह मायदा, आयत ३

[9] कुरआन, सुरह मायदा, आयत ३

Leave a Comment