मांसाहार आणि मांसाचा व्यापार
प्राणी मानवाची केवळ अन्न गरज नव्हे तर इतर अनेक गरजांची पूर्तता करतात. जसे जिवंत प्राण्यांपासून अनेक लाभ प्राप्त होतात, तसे मृत प्राणीदेखील लाभदायक सिद्ध होतात. मृत जनावरांपासून मनुष्य मासांव्यतिरिक्त कातडे आणि चरबी प्राप्त करतो. बाजारात उपलब्ध Cod Liver Oil माशाच्या चरबीपासून बनते. रेशीम प्राप्त करण्यासाठी रेशमी किड्यांना त्यांच्या Pupa या अवस्थेत गरम पाण्यात उकळून ठार मारले जाते आणि रेशीम प्राप्त केले जाते. अनेकांचा गोड गैरसमज आहे की, पाळीव पशूंची हत्या थांबविली तर आपल्याकडील दूधाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढेल. परंतु यामागे कसलाही आधार नाही. जगात मांस प्राप्तीसाठी पाळीव पशूंची विशेषता गाई-बैलांची सर्वाधिक हत्या दक्षिण अमेरिकेच्या देशांत केली जाते, तरी ते देश जगातील सर्वात मोठे दुध उत्पादक देश आहेत.[1] दुध उत्पादनाच्या घटीमागे पाळीव पशूंची हत्या नव्हे, त्यांच्या पालनपोषणाची योग्य व्यवस्था नसणे, हे मुख्य कारण आहे.
दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या असंख्य वस्तू पशूंच्या विविधांगापासून बनवल्या जातात. कर्नाटक ऍनीमल अँड मिट व्यापारी समन्वय समितीच्या वतीने श्री. राजेंद्र धेंडे यांनी ‘कत्तलखाना – अपप्रचार आणि वास्तव’ या पुस्तकात खालील माहिती प्रकाशित केली होती. ही माहिती अत्यंत महत्वपूर्ण आणि ज्ञानात भर टाकणारी आहे. प्राणांच्या उल्लेखित अंगांपासून मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती केली जाते.
प्राण्यांच्या मेंदुपासून अनेक औषधे आणि एन्टी एजिंग क्रीम्स तयार केले जातात. त्यांच्या रक्तापासून हिमोग्लोबीनची टॉनिक्स, केसांना रंगण्यासाठी वापरली जाणारी डाय, पेनची शाई, फेव्हिकॉल सारखे अधेसिव्हज, जीवनावश्यक मिनरल्स आणि प्रयोग शाळेसाठी लागणारे असंख्य पदार्थांची निर्मिती केली जाते. तर खुरापासून प्लास्टिक, कुत्र्यांचे खाद्यपदार्थ, वनस्पतीसाठीची खते, फोटो फिल्म, शाम्पू, हेअर कंडिशनर, लॅमिनेशन्ससाठी लागणारा कागद, वॉलपेपर आणि प्लायवुड निर्मितीमध्ये खुरांचा वापर केला जातो. त्यांच्या शिंगापासून अत्यंत मौल्यवान प्रकारची कोटची बटणे, आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या जाणाऱ्या अत्यंत महागड्या शो पिसेस बनविले जातात. हाडापासून बोन ऍश, बोन पावडर, साखर शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे पदार्थ, टुथपेस्ट, काच उद्योगातील द्रव्य, रक्त प्रक्रियेसाठी एडीबल आणि नॉन एडीबल जीलेटीन, चारकोल, अत्यंत महागडी बोन चायना कपबशी तयार केले जातात. आतील भागापासुन वाद्यांसाठी धागा, टेनीस रॉकेटचा धागा, विटामीन आणि इतर औषधे, बैलाच्या आतड्यापासून ऑपरेशनसाठी लागणारा धागा तयार केला जातो. केसांचा वापर एअर फिल्टर ब्रश, फेल्ट हॅट, इंशुलेशन्स, टेक्सटाईल उद्योगासाठी केला जातो. तर दुधाचा वापर खाण्यासाठी, दुग्धजन्य उद्योगासाठी, कॉस्मेटिक्स उद्योगासाठी, प्लास्टिक व औषधांसाठी वापरला जातो. शिवाय जिलेटीन, विविध प्रकारची फ्लेवर्स, वॉलपेपर, फेव्हिकॉलसारखे अधेसिव्हस, औषधे, कन्फेक्शनरी, चप्पल, बूट, अत्यंत महाग वस्त्र प्रावरणे, टेक्सटाईल उद्योग आणि शेती उद्योग यामध्ये चामड्याचा वापर केला जातो. मॅन्यूअरचा वापर सेंद्रिय खते, नायट्रोजन, फॉस्परसमध्ये केला जातो. फॅट [चरबी] च्युइंगम, मेणबत्ती, सर्व प्रकारचे आणि आंघोळीचे आणि कपड्याचे साबण, डिओडरंट्स, शेविंग क्रीम्स, परफ्युम, कुत्र्याची बिस्किटे, विविध क्रीम्स आणि लोशन्स, क्रेयॉन्स, रंग, ऑइल, लूब्रिकन्ट्स, बायोडिझेल उद्योगात, सिरॅमिक्स, एक्सप्लोसिव्हस, खडू, शोभेची दारू, इंशुलेशन्स, रबर, टेक्सटाईल्स उद्योगात, औषध निर्मितीमध्ये चरबीचा वापर केला जातो. ८० प्रकारच्या लाईफ सेव्हिंग ड्रग्स जनावरांच्या विविध भागापासून बनवल्या जातात.
दैनंदिन जीवनात लागणाऱ्या या साऱ्या वस्तूंची निर्मिती आणि पुरवठा देशातील मांसाहाराशी निगडीत आहे. मांसाहारींची गरज भागवण्यासाठी कामी येणाऱ्या भोज्य प्राण्यांच्या शरीरातून मांसाशिवाय उरणारे टाकाऊ पदार्थ या वस्तूंच्या निर्मिती प्रक्रियेत वापरले जातात. या माध्यमातून बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. तुम्ही मांसाहारी असो किंवा नाही, प्राण्यांच्या शरीरातील अवयवांपासून बनलेले सारे पदार्थ तुमच्या दिवाणी खोलीपासून बेडरूमपर्यंत तुमच्या सोबत असतात. तुमच्या खिशातील पेनपासून तुमच्या पादत्राणापर्यंत ते तुमच्या जीवनाचा भाग झाले आहेत. मांसाहाराचे बायप्रोडक्ट असणाऱ्या उपरोक्त वस्तूंमुळे मानवी जीवन सोयीचे झाले आहे. मांसाहार बंद केल्यास या वस्तूंच्या उत्पादनावर भयंकर परिमाण होतील. कृत्रिमरित्या तयार केल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थांचा पर्याय उपलब्ध असला तरी तो तुलनात्मकदृष्ट्या अत्यंत खर्चिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे. तेव्हा नाईलाजास्तव का होईना मानवाला प्राण्यांकडेच वळावेच लागेल.
मांस निर्यात आणि परकीय चलन:
देशात आजमितीला लहान मोठे १,६२३ अधिकृत मांस निर्यातक कत्तलखाने अस्तित्वात आहेत.[2] भारत हा जगातील सर्वात मोठा बीफ निर्यात करणारा देश आहे. साल २०१७-१८ च्या आकडेवारीनुसार आपला देश ब्राझीलला मागे टाकत मांस निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत सर्वाधिक मांस निर्यात करत अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारतातून मांस, रक्त, हाडे, चरबी आणि चामडे यांची परदेशात निर्यात होते. २००६-२००८ या तीन वर्षाच्या कालावधीत भारताला ३२,८३९ कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले. मागील काही वर्षांत मांस निर्यात आणि त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात कोट्यावधी रुपयांची वाढ झाली आहे. भारत सरकारने २०१५ मध्ये मांस निर्यातक कत्तलखान्यांना कोट्यावधी रुपयांची सबसिडी दिली. हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या देवनार येथील कत्तलखान्यात दरवर्षी २ लाखांपेक्षा जास्त लहान मोठी जनावरे कापली जातात, तर लाखो टन मांस निर्यात केले जाते.
‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार भारतामध्ये गोमांसाची निर्यात करणारे सर्वात मोठे निर्यातदार हे हिंदूधर्मीय आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा भाग असलेल्या शेती व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात प्राधिकरणाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशातील १० मोठ्या कत्तलखान्यांची माहिती देण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे या कत्तलखान्यांचे मालक मुस्लिम नसून हिंदू आणि अहिंसावादी म्हणविणारे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही माहिती २८ मार्च २०१७ रोजी लोकसत्तामध्ये प्रकाशित करण्यात आली होती.[3]
१] अल कबीर – हा देशातील सर्वात मोठा कत्तलखाना तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात आहे. सतीश सब्बरवाल हे तब्बल ४०० एकरांच्या परिसरात पसरलेल्या या कत्तलखान्याचे मालक आहेत. मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरात अल कबीरचे मुख्यालय असून या कत्तलखान्यातून अनेक आखाती देशांमध्ये गोमांसाची निर्यात केली जाते. दुबई, अबुधाबी, जेद्दा, कुवेत, मदीना, रियाद, खरमिश, सित्रा, मस्कत आणि दोहा या आखाती देशांमध्येही अल कबीरची कार्यालये आहेत. अल कबीरचे मालक सतीश सब्बरवाल यांनी धर्म आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न असल्याचे म्हणाले आहे. या दोन्हींची गल्लत करता कामा नये, असे मत सब्बरवाल यांनी मांडले. अल कबीरने गेल्या आर्थिक वर्षात ६५० कोटींचा व्यवसाय केला होता.
२] अरेबियन एक्स्पोर्टस – अरेबियन एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक सुनील कपूर आहेत. या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. कंपनीकडून गोमांसाबरोबर मेंढ्याचे मांसही निर्यात केले जाते. अरेबियन एक्स्पोर्टसच्या संचालक मंडळात विरनत नागनाथ कुडमुले, विकास मारूती शिंदे आणि अशोक नारंग यांचा समावेश आहे.
३] एमकेआर एक्स्पोर्टस – भारतामधील बीफच्या प्रमुख निर्यातदारांपैकी एक असलेल्या एमकेआर फ्रोजन फूड एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक मदन एबट आहेत. या कंपनीचे मुख्यालय दिल्लीत आहे. या कंपनीचा कत्तलखाना पंजाबच्या मोहालीत असून सनी एबट या एमकेआर एक्स्पोर्टसचे संचालक आहेत.
४] अल नूर एक्स्पोर्टस – सुनील सूद यांच्या मालकीच्या अल नूर एक्स्पोर्टसचे मुख्यालय दिल्लीत आहे. मात्र कत्तलखाना आणि मांस प्रक्रिया केंद्र उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये स्थित आहे. मेरठ आणि मुंबईमध्ये अल नूर एक्स्पोर्टसच्या शाखा आहेत. १९९२ मध्ये स्थापन झालेली अल नूर एक्स्पोर्टस सध्याच्या घडीला ३५ देशांमध्ये मांसाची निर्यात करते.
५] एओवी एक्स्पोर्टस – २००१ साली स्थापन झालेल्या एओवी एक्स्पोर्टसचा कत्तलखाना उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये आहे. याठिकाणी कंपनीचे मांस प्रक्रिया केंद्रही आहे. एओवी एक्स्पोर्टस मुख्यत्तेकरून बीफची निर्यात केली जाते. अभिषेक अरोरा हे एओवी एक्स्पोर्टसचे संचालक आहेत.
६] स्टँटर्ड फ्रोझन फूडस एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड – कमल वर्मा हे स्टँटर्ड फ्रोझन फूडस एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये या कंपनीचा कत्तलखाना आहे.
७] पोन्ने प्रॉडक्टस एक्स्पोर्टस – एस. सस्ति कुमार हे पोन्ने प्रॉडक्टस एक्स्पोर्टस संचालक आहे. ही कंपनी मुख्यत्वेकरून बीफ आणि अंड्यांच्या निर्यातीचा व्यवसाय करते. तामिळनाडूच्या नमक्कालमध्ये कंपनीची शाखा आहे.
८] अल दुआ – उत्तर प्रदेश मुजफ्फरनगर दंगलींचा आरोप असलेले, मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांचे मित्र, संगीत सोम यांची अलिगढ येथे अल दुआ नावाची मांस निर्यातक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना २००५ साली झाली आहे. ही कंपनी प्रामुख्याने अमीराती राष्ट्रांत मांस निर्यात करते.
९] अश्विनी अॅग्रो प्रॉडक्टस – अश्विनी अॅग्रो प्रॉडक्टसचा कत्तलखाना तामिळनाडूच्या गांधीनगर येथे आहे. या कंपनीचे संचालक के. राजेंद्रन यांच्या मते धर्म आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. आपल्याला व्यवसाय करताना स्थानिक अधिकाऱ्यांच्या त्रासाला अनेकदा सामोरे जावे लागल्याचे के. राजेंद्रन यांनी सांगितले.
१०] महाराष्ट्र फुडस प्रोसेसिंग – महाराष्ट्रातील फलटणमध्ये महाराष्ट्र फुड प्रोसेसिंग अँण्ड कोल्ड स्टोरेजचा कत्तलखाना आहे. सनी खट्टर या कंपनीतील भागीदार असून त्यांनीदेखील धर्म आणि व्यवसाय या दोन्ही भिन्न गोष्टी असल्याचे म्हणाले आहे.
मांसाहारींची बाजारपेठ:
देशातील मांसाहारी उद्योग हजारो कोटींची उलाढाल करतो. मांसाहार देशातील सर्व सामान्यांचा आहार तर आहेच, त्याच सोबत तो सुखवस्तू आयुष्य जाणाऱ्यांसाठी चैनीचे एक सिम्बॉल देखील आहे. यातून अनेक परकीय ब्रांड भारतीय बाजारपेठेकडे आकर्षित झाले आणि त्यांनी ही बाजारपेठ काबीज केली.
KFC आणि Pizza Hut च्या देशभरातील हजारहून जास्त शाखा देवयानी इंटरनेशनल या कंपनीतर्फे संचालित केल्या जातात. कंपनीने आजपर्यत मांसाहाराचा हा व्यापार कित्येक पटीने वाढवला आहे. या शाखा कंपनीला दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा नफा कमावून देतात. रविकांत जैपुरीया, वरुण जैपुरीया, विराग जोशी, राज गांधी, मनीष दावर, रवी गुप्ता, रश्मी धारिवाल, गिरीश अहुजा, प्रदीप सरदाना आणि प्रशांत पुरकर कंपनीच्या संचालक मंडळात आहेत. कंपनीच्या संकेत स्थळावर ही सारी माहिती उपलब्ध आहे. तसेच त्यांचा वार्षिक नफा आणि उलाढाल यांचा अहवालही उपलब्ध आहे.[4] McDonalds च्या शाखा Westlife foodworld कंपनीद्वारे संचालित केल्या जातात. अमित जातीया, पी. आर. बनपांडे, अमिषा जैन, स्मिता जातीया, मनीषा चोखानी, अक्षय जातीया आणि तरुण कटारिया कंपनीच्या संचालक मंडळात आहेत. कंपनी देशभरात ३०० शाखा संचालित करीत असून यातून शेकडो टन बीफ दररोज सर्व केले जाते.[5] Dominosच्या शाखा Jubilant Foodworks या कंपनीतर्फे संचालित केल्या जातात. श्याम भारतीया आणि हरी भारतीया यांच्याद्वारे सुरु करण्यात आलेल्या या कंपनीने देशभरात १९०० पेक्षा जास्त शाखा स्थापन केल्या आहेत.[6] या शाखांतून हजारो टन चिकन रोज फस्त केले जाते.
KFC च्या जगभरातील २९,००० आणि McDonalds च्या जगभरातील ३६,००० शाखांमधून दररोज लाखो टन चिकन फस्त केले जाते. United Poltery Concern च्या अहवालानुसार जगभरात वर्षाकाठी अब्जावधी कोंबड्या कापल्या जातात.[7] शिवाय दररोज लाखो प्राण्यांची कत्तल केली जाते.[8] National Geographic संस्थेच्या एका अहवालानुसार २०११ मध्ये जगात १३ लाख टन मांस फस्त केले गेले. २००१-२०११ या कालावधीत जगभरात बीफ खाणाऱ्यांच्या संख्येत १४ टक्क्यांची वाढ झाली. चिकन खाणाऱ्यांची संख्या ४५ टक्क्यांनी वाढली आहे. सागरी प्राणी खाणाऱ्यांची संख्या ३२ टक्क्यांनी वाढली आहे. तर इतर मांस खाणाऱ्यांची संख्या २१ टक्क्यांनी वाढली आहे. एकीकडे गोवंश बंदी कायद्यामुळे भारतात मागील दहा वर्षात बीफ खाणाऱ्यांची संख्या २३ टक्क्यांनी घटली आहे. तर दुसरीकडे चिकन खाणाऱ्यांची संख्या १३२ टक्क्यांनी वाढली आहे. सागरी प्राणी खाणाऱ्यांच्या संख्येत ४१ टक्क्यांची वाढ झाली आहे. इतर मांस खाणाऱ्यांची संख्या २० टक्क्यांनी वाढली आहे.[9]
भारतात दक्षिणेकडची केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाना, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्ये मांसाहार बहुल राज्ये आहेत. या राज्यांतील मांसाहारी जनतेचे प्रमाण ८१ ते ९७% इतके जास्त आहे. गोवाची ८९% जनता मांसाहारी आहे. National Family Health Survey, 2015-16 सालच्या रिपोर्टनुसार देशातील ८० टक्के पुरुष आणि ७०% महिला मांसाहारी आहेत.[10] कथित शाकाहारी गुजरात राज्यातील ४०% जनता मांसाहारी आहे.[11] जगभरातील शाकाहारींपैकी ८४% शाकाहारी पुन्हा मांसाहाराकडे वळतात, असे Cut चे म्हणणे आहे.[12] म्हणून केवळ मुस्लिम समाजालाच मांसाहारी समजणे चुकीचे आहे.
मांसोद्योग शेतकऱ्यांसाठी हितकारक:
वातावरणातील आकस्मिक बदल, पाऊस आणि बाजारभावाची अनिश्चितता, खतांच्या भरमसाठ किंमती, पिकांवर पडणारे रोग, सरकारची उदासीनता याप्रकारच्या अनेक समस्यांमुळे लाखो शेतकरी जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन आणि पशुपालन अशा व्यवसायाकडे वळतात. अनेक शेतकरी केवळ कुर्बानीसाठी वजनात जास्त भरणाऱ्या वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या पालन करून फक्त कुर्बानीच्या दिवसांत वर्षभराचे उत्पन्न कमावतात. अशा जोडधंद्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचा पर्यायी मार्ग मिळाल्याने ते आत्महत्येपासून परावृत्त झाले आहेत. थोडक्यात मांस उद्योग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
एक उदाहरण घेऊयात. महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी. त्यापैकी १ कोटी ३० लाख मुस्लिम. आपण १ कोटीच गृहीत धरू. पाच सदस्यीय कुटुंब गृहीत धरले तरी किमान २० लाख मुस्लिम कुटुंब महाराष्ट्रात राहतात. त्यापैकी केवळ १०% कुटुंबीयांची आर्थिक क्षमता कुर्बानी करण्यासारखी असल्याचे गृहीत धरले तरी किमान २ लाख मुस्लिम कुटुंब कुर्बानी करतात. महाराष्ट्रातील एकाही अभ्यासकाला, समाज संस्थेला, सामाजिक संघटनेला २ लाख लोक कुर्बानी का करतात, हे जाणून घेण्याची गरज वाटत नाही. एखादा समाज कुर्बानी का करतो, त्यामागचे कारण काय आहे? तत्वज्ञान काय आहे? इतिहास काय आहे? भूमिका काय आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता नाही, जिज्ञासा नाही की आतुरता नाही. मात्र तुम्ही कुर्बानी करणे बंद करा, म्हणून दूषणे द्यायला सारे मोकळे आहेत.
आता कुर्बानी मागची आर्थिक उलाढाल समजून घ्या. मुस्लिमांनी कुर्बानीसाठी आणलेले ही २ लाख बोकड आले कोठून? अर्थातच शेतीसोबत जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून, धनगरांकडून आणि भटक्या विमुक्त जाती जमातींकडून. मुस्लिमांनी हे बोकड लुटले, जिंकले की लुबाडून आणले? नव्हे त्यांनी खरेदी केले. या खरेदीचा पैसा कोणाच्या खिशात जातो? सोनाराच्या, मारवाडीच्या, बामनाच्या, मदरशाच्या की मस्जिदीच्या? नव्हे तो पैसा वर्षाकाठी काहीतरी हातात यावे, म्हणून पायपीट करून गुरे राखणाऱ्याच्या खिशात जातो. किती जातो? प्रत्येक बोकडाचे किमान १० हजार जरी गृहीत धरले तरी किमान २०० कोटी रुपये त्यांच्या खिशात गेले. ज्यांच्या खिशात गेले, त्यांचा धर्म काय? हिंदू. कोणते हिंदू? मागास, भटके, विमुक्त दारिद्री रेषेखालील हिंदू.
मुस्लिम समाज त्यांच्या दोनपैकी एकाही सणात घर, गाडी, दागदागिने अथवा इलेक्ट्रॉनिक सारख्या महागड्या वस्तूवर खर्च करीत नाही. समस्त भारतीय सणांत पैसे खालून वरच्या बाजूला प्रवाहित होतो. लोक बंगले घेतात, घरे घेतात, गाड्या घेतात, दागदागिने घेतात, इलेक्ट्रॉनिक्स घेतात. पैसा खालून वरच्या दिशेने प्रवाहित होतो. मात्र मुस्लिमांचे दोन्ही सण पैशाच्या प्रवाहाची दिशा बदलतात. या सणांच्या वेळी पैसा वरून खाली प्रवाहित होऊ लागतो. समाजातील गरीब, उपेक्षित, वंचित आणि नाही रे वर्गाच्या हातात पैसा जाऊ लागतो. भांडवली वर्गाचे मुस्लिमांच्या सणांशी असलेले शत्रुत्व या धर्तीवर समजून घ्यायला हवे.
[1] http://www.fao.org/dairy-production-products/production/en/
[2] https://www.indiatoday.in/mail-today/story/there-are-more-slaughterhouses-than-milk-units-in-india-305244-2016-01-24
[3] https://www.loksatta.com/desh-videsh/slaughterhouse-in-up-yogi-adityanath-10-major-meat-slaughterhouses-of-india-owned-by-hindu-1441480/
[4] https://dil-rjcorp.com/
[5] https://www.westlife.co.in/board-of-directors.php
[6] https://www.jubilantfoodworks.com/about-us/company-profile
[7] http://www.upc-online.org/chickens/chickensbro.html
[8] https://www.animalequality.net/food
[9] https://www.nationalgeographic.com/what-the-world-eats/
[10] https://www.thequint.com/news/india/many-indians-are-non-vegetarian-most-meat-eaters-in-kerala
[11] https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Veg-Gujarat-has-40-non-vegetarians/articleshow/52681704.cms
[12] https://www.thecut.com/2014/12/84-percent-of-vegetarians-go-back-to-eating-meat.html