कुर्बानीची पार्श्वभूमी (Background of Qurbani)

कुर्बानीची चर्चा करण्यापूर्वी प्रथम आपण तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊयात. कुर्बानी प्रेषित इब्राहीम [अलै.][1] यांच्या काळापासून अखंडित चालू असलेली परंपरा आहे. प्रेषित मुहम्मद [स.] कुर्बानीचे जनक नाहीत, तर वाहक आहेत. त्यांनी कुर्बानीला अनिष्ट रूढीपासून मुक्त करून तिच्या मूळ स्वरुपात पुनरुज्जीवित केले आहे. कुर्बानीचा इतिहास प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या काळापासूनचा आहे. या प्रकरणात आपण तो इतिहास संक्षिप्तपणे पाहणार आहोत.

प्रेषित इब्राहीम [अलै.] यांचा जन्म इराकच्या ‘ऊर’ शहरात झाला. ज्या काळात त्यांचा जन्म झाला, तो काळ मानव इतिहासात ‘अंधकार युग’ म्हणून नोंदविला गेला आहे. अशा अंधकार युगात त्यांनी प्रकाशज्योत प्रज्ज्वलित केली. त्यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे मानवी इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. तत्कालीन समाजात सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांची उपासना केली जायची. शासक देवतांचे पुत्र मानले जायचे. देवपुत्र मानल्याने त्यांचा वंश कायमस्वरूपी शासक पदाचा हक्कदार ठरायचा. शासक आपल्या मर्जीचे मालक असायचे. जनता शासकांची पूजा करायची. त्यांच्या प्रत्येक शब्दाला जीवन उद्देश मानायची. त्यासाठी मरायची आणि मारायची. तत्कालीन पुरोहित, देवता व शासकांच्या दरम्यान मध्यस्थ होते. ते देवतांचे आदेश शासकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असत. तत्कालीन समाजाला अंधश्रद्धेत गुरफटून ठेवण्यात पुरोहित वर्गाचा सिंहाचा वाटा होता. शासकांना देवपुत्र ठरविणारे हेच पुरोहित होते. अशाकाळात पुरोहितांच्या कुटुंबात प्रेषित इब्राहीम [अलै.] यांचा जन्म झाला. प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्यासमोर पुरोहितपदाची गादी तयार होती. त्यांना त्या गादीवर सहजपणे विराजमान होता आले असते. राज्यातील सर्वोच्च धार्मिक व्यक्ती बनण्याचा मान त्यांना मिळाला असता. परंतु ते इतरांसारखे नव्हते. त्यांनी कोणत्याही गोष्टीला बुद्धी व विवेकाच्या कसोटीवर घासल्याशिवाय मानण्यास नकार दिला. पिढ्यानपिढ्या चालत आलेले पुरोहिताचे पद त्यांनी नाकारले. विवेकबुद्धीला अनुसरून सभोवतालच्या परिस्थितीवर चिंतन केले. समाजाच्या अनेकेश्वरवादी अंधश्रद्धा नाकारल्या. समाजाने निर्माण केलेल्या देवता त्यांनी नाकारल्या. निसर्ग पुजणाऱ्या समाजात, निसर्गपूजनाला नाकारणारे ते पहिले होते. अशा परिस्थितीत त्यांना अल्लाहतर्फे मार्गदर्शन प्राप्त झाले. या संदर्भात पवित्र कुरआनात त्यांचा उल्लेख आलेला आहे तो असा,

हे प्रेषित [मुहम्मद], इब्राहीम यांचा उल्लेख करा. निश्चितच ते एक सत्यवादी आणि संदेष्टा होते. ते आपल्या वडिलांना म्हणाले, बाबा! का बरे तुम्ही अशांची भक्ती करता, जे न ऐकतात न पाहतात, न कोणत्याही प्रकारे तुमच्या कामी येऊ शकतात. बाबा! माझ्याकडे ते ज्ञान पोहोचले आहे, जे तुमच्याकडे नाही. माझे अनुसरण करा, मी तुम्हाला सन्मार्ग दाखवू शकतो.[2]

आपल्या भावी पुरोहितपदाच्या गादीला लाथाडून त्यांनी घोषणा केली, मी त्या देवतांना मानीत नाही, ज्यांचे पुत्र असण्याचा दावा हे शासक करीत आहेत. त्यांनी तत्कालीन समाजाच्या सूर्य, चंद्र आणि नक्षत्र या सारख्या असंख्य देवतांना मानण्यास नकार दिला आणि विवेकवादी एकेश्वरत्वाची कास धरली. याचा पवित्र कुरआनात आलेला उल्लेख असा आहे,

[आठवा तो प्रसंग] जेव्हा इब्राहीम [अलै.] आपल्या पिता आजरला म्हणाले, “काय तुम्ही [दगडांच्या] मूर्तींना ईश्वर बनविले आहे. मी तुम्हालातुमच्या समाजाला उघड मार्गभ्रष्ट झाल्याचे पाहात आहे.’’ अशाप्रकारे आम्ही इब्राहीमना [अलै.] आकाश आणि जमिनीचे राज्य दाखवीत होतो, जेणेकरून त्यांनी दृढ विश्वास बाळगणाऱ्यांपैकी व्हावे. [मग काय] जेव्हा रात्र गडद झाली, तेव्हा त्यांना एक तारा दिसला. म्हणाले, हा आहे माझा प्रभू.” परंतु जेव्हा तो मावळला, तेव्हा [इब्राहीम] म्हणाले, अस्त पावणारे मला आवडत नाहीत. मग जेव्हा चकाकणारा चंद्र पाहिला, तेव्हा म्हणाले, हा आहे माझा प्रभू. मग जेव्हा तोदेखील मावळला, तेव्हा [इब्राहीम] म्हणू लागले, माझ्या पालनकर्त्याने माझे मार्गदर्शन केले नसते, तर मीदेखील मार्गभ्रष्ट लोकांत सामील झालो असतो. मग जेव्हा त्यांनी सूर्याला दैदीप्यमान पाहिले, तेव्हा म्हणाले, हा आहे माझा प्रभू, हा सर्वश्रेष्ठ आहे. परंतु जेव्हा तोही मावळला तेव्हा [इब्राहीम] म्हणाले, हे माझ्या समाजबांधवांनो! ज्यांना तुम्ही ईश्वराचा भागीदार ठरविता, मी त्या सर्वांपासून विरक्त आहे. मी तर एकाग्रचित्त होऊन आपले मुख त्या अस्तित्वाकडे केले आहे, ज्याने जमीन आकाशांना निर्माण केले आहे आणि मी कदापि अनेकेश्वरवाद्यांपैकी नाही.’’[3]

त्यांचे देवतांना नाकारणे केवळ अध्यात्मिक नव्हते तर शासकांच्या देवत्वाला उघड विरोध होता. देवता नाकारणे म्हणजे शासकांना देवपुत्र मानण्यास नकार देणे. तत्कालीन शासकांना शासक बनण्याचा अधिकार मुळात यामुळेच मिळत होता की, समाज त्यांना देवपुत्र मानीत असे आणि शासकांचे निर्णय देवाज्ञा म्हणून मान्य केले जात असत. यामुळे शासनाला अनिर्बंध अधिकार प्राप्त झाले होते आणि जनता कायम शोषित राहिली होती. अशा परिस्थितीत पिढ्यानपिढ्या मालकी हक्काची पुरोहितपदाची गादी लाथाडून त्यांनी विवेकाचा आवाज बुलंद केला. आपल्या जीवाची पर्वा न करता ऐहिक जगातील सर्वोच्च शक्तीच्या विरोधात जाण्याची तयारी दर्शविली.

त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागले. केवळ शासक नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, राज्याचा प्रत्येक नागरिक त्यांचा शत्रू झाला. त्यांच्या रक्ताचे घोट पिण्यासाठी त्यांच्यामागे लागला. समाजाची प्रत्येक व्यक्ती त्यांच्या विरोधात उभी ठाकली. राज्यात एकही व्यक्ती त्यांच्या समर्थनार्थ पुढे आली नाही. तरीही त्यांनी त्यांचे कार्य चालू ठेवले. एके दिवशी शहरातील सारे लोक उपासना स्थळापासून दूर गेले असताना त्यांनी उपासनागृहातील मुर्त्या आडव्या पाडल्या. परंतु हातात हातोडा किंवा कुऱ्हाडी असणारी सर्वात मोठी मूर्ती होती तशीच ठेवली. जेव्हा लोक प्रार्थना स्थळाकडे परत आले, तेव्हा त्यांनी पाहिले की देवतांच्या मुर्त्या तोंडावर पालथ्या पडलेल्या आहेत. लोक चर्चा करू लागले की, हे कसे घडले असेल? अनेकांनी प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्यावर संशय व्यक्त केला. म्हणाले, “तोच एकेश्वरत्वाची चर्चा करतो. तोच आमच्या मूर्तीपूजेला अंधश्रद्धा म्हणतो. तोच एकटा आहे, जो आपल्यासारखा मूर्तिपूजक नाही. निसर्गपूजक नाही.” सर्वांची खात्री पटली की, हे काम प्रेषित इब्राहीम [अलै.] यांनीच केले आहे. तेव्हा प्रेषित इब्राहीम [अलै.] यांनी उत्तर दिले, “हातात हातोडा असलेल्या मोठ्या देवतेला विचारुन पहा, कदाचित ती उत्तर देऊ शकेल की, हे कसे घडले आहे.” त्यांना केवळ हे दाखवून द्यायचे होते की, या मुर्त्या वास्तविक ईश्वर नाहीत. त्या काहीच करू शकत नाहीत. या घटनेने क्रोधीत होऊन त्यांच्या वडिलांनी त्यांच्याशी जो व्यवहार केला, त्याचा पवित्र कुरआनात आलेला उल्लेख असा आहे,

इब्राहीम तू माझ्या देवतांपासून फिरलास काय? तू जर परावृत्त झाला नाहीस तर मी तुला दगडांनी ठेचून काढीन. जा, माझ्या मार्गात आडवा येऊ नकोस.[4]

जनता प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्यावर प्रचंड भडकली. शासकाच्या दरबारात गेली. घडलेली घटना सांगितली आणि शासकाकडे दाद मागितली. शासक त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी संधी शोधत होता. प्रेषित इब्राहीम [अलै.] राजपुरोहित कुटुंबाचे पुत्र असल्याने तो सरळ कारवाई करू शकत नव्हता. चालून आलेली संधी न दडवता त्याने प्रेषित इब्राहीम [अलै.] यांना हजर करण्याचे आदेश दिले. त्यांच्यावर धर्मद्रोहाचा खटला भरण्यात आला. देवतांची विटंबना केल्याचे सिद्ध झाले. शासकाच्या दरबारात त्यांचा शासकाशी झालेला संवाद कुरआनने खालील शब्दांत दिला आहे,

तुम्हाला त्या व्यक्तीची हकीगत माहित नाही काय, ज्याला अल्लाहने राज्य प्रदान केले असताना, त्याने इब्राहीम यांच्याशी पालनकर्त्यासंदर्भात वाद घातला? जेव्हा इब्राहीम म्हणाले, “तो आहे माझा पालनकर्ता, ज्याच्या अखत्यारीत जीवन आणि मृत्यू आहे.” तो उत्तरला, “जीवन आणि मृत्यू तर माझ्या हातात आहे.” तेव्हा इब्राहीम म्हणाले, “[असे असेल तर मग] अल्लाह सूर्याला पूर्वेकडून आणतो, तू पश्चिमेकडून आणून दाखव.” यावर तो [सत्य] नाकारणारा निरुत्तर झाला. अल्लाह [अशा] अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवीत नसतो.[5]

त्यांना धर्मद्रोहाच्या आरोपाखाली जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. समाजाने शिक्षेचे जाहीर समर्थन केले. प्रेषित इब्राहीम [अलै.] यांनी ती शिक्षा आनंदाने स्वीकारली. शासकीय दंडस्थळावर मोठा अग्नी पेटविण्यात आला. शहरभर दवंडी देऊन जनतेला बोलविण्यात आले. सर्वांसमोर प्रेषित इब्राहीम [अलै.] यांना धगधगत्या आगीत जिवंत फेकण्यात आले. पवित्र कुरआनात या घटनेचा उल्लेख आला आहे तो असा,

ते [लोक] म्हणाले, जर तुम्हाला खरेच काही करायचे असेल तर याला जाळून टाका आणि आपल्या देवतांचा सूड घ्या.[6]

त्यांचा गुन्हा काय होता? पुरोहिताच्या घरात जन्माला येऊन त्यांनी निसर्गपूजा नाकारली होती. मूर्तीपूजा नाकारली होती. शासकाला देवता मानण्यास नकार दिला होता. विवेकाच्या मार्गावर चालताना सारा समाज विरोधात उभा असताना, आनंदाने मृत्यूला कवटाळून सत्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यास ते तयार झाले होते. अशावेळी अल्लाहने त्यांची मदत केली. अल्लाहच्या आदेशाने अग्नी थंड झाला आणि ते आगीतून अगदी सुखरूप बाहेर आले. पवित्र कुरआनात या घटनेचा उल्लेख आला आहे तो असा,

आम्ही आदेश दिला, आगी तू थंड हो आणि इब्राहीम यांना सुरक्षा प्रदान कर.[7]

त्यांच्या मदतीसाठी दैवी शक्ती कार्यरत आहे, असे समजून शासकाने आणि जनतेने त्यांची वाट सोडली आणि त्यांना राज्याबाहेर काढले. प्रेषित इब्राहीम [अलै.] यांनी आपल्या सुखी आणि समृद्ध जीवनाचा त्याग करून वणवण भटकण्याचा मार्ग स्वीकारला. राज्यातून बाहेर पडल्यानंतर ते जेथे कोठे गेले, तेथे त्यांनी हाच संदेश दिला की, ज्या नैसर्गिक वस्तू वा मूर्तींना तुम्ही देवता म्हणून पुजता त्या केवळ निर्मितीमात्र आहेत. यांच्यापैकी काहीच ईश्वराच्या समकक्ष असू शकत नाही. त्यांच्या आवाहनामुळे मानवी विचारविश्वाला चिंतनाचे नवे मार्ग सापडले. निसर्गाला पुजणारे निसर्गाबद्दल चिंतन करू लागले. ज्यामुळे एका नव्या युगाचा आरंभ झाला.

ईश्वराच्या एकत्वाचा संदेश देण्यासाठी त्यांनी कित्येक राज्ये पालथी घातली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी हाच संदेश दिला की, आपल्या वास्तविक निर्मात्याशिवाय अन्य कोणासही देवता मानू नका. शासक देवतांचे पुत्र नसून आपल्यासारखे सामान्य मनुष्य आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीत रुसो, लॉके आणि वॉल्टेअर यांनी शासकांच्या अधिकारांची मर्यादा निश्चिती करण्याच्या ३८०० वर्षांपूर्वी प्रेषित इब्राहीम [अलै.] यांनी शासकांचे देवत्व नाकारून त्यांना सामान्य माणूस ठरवले होते. परिणामी शासक आणि जनता त्यांची शत्रू झाली. त्यांच्या आवाहनाचा पवित्र कुरआनात उल्लेख करण्यात आला आहे तो असा,

दुर्दैव तुमचे आणि त्यांचे ज्यांची एकमात्र पालनकर्त्याशिवाय तुम्ही उपासना करता. तुम्ही बुद्धीचा वापर करीत नाही का? [8]

शेवटी असे भटकंतीचे जीवन जगत असताना ते Palestine भूमीवर स्थाईक झाले. उतारवयात नव्वदीच्या आसपास त्यांना त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून पहिल्या पुत्राची प्राप्ती झाली. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना हे गोंडस बाळ झाले होते. त्याचे नाव त्यांनी इस्माईल ठेवले. उतारवयात इस्माईल आपला आधार बनेल, या आशेने ते जगू लागले. त्यांनी आपले विचार इस्माईलच्या मनावर अलगद कोरले. मुलानेही ते विचार सहज आत्मसात केले. आयुष्य संथगतीने व्यतीत होत असताना अल्लाहकडून इस्माईल आणि हाजरा[9] यांना मक्का[10] या निर्जन स्थळी सोडण्याचे आदेश देण्यात आले. अल्लाहच्या आदेशाला समर्पित होऊन त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला मक्का येथे सोडले. या आदेशाद्वारे अल्लाहने प्रेषित इब्राहीम यांची परीक्षा घेतली. जेणेकरून त्यांना समस्त मानवजातीकरिता आदर्श बनविता यावे.

काही वर्षे अशीच निघून गेली. आपल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी ते दोनदा मक्केला गेल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. दुसऱ्या भेटीत त्यांनी रात्री स्वप्न पाहिले की, ते आपल्या मुलाची – इस्माईलची कुर्बानी देत आहेत. आपल्या स्वप्नाला ईशआज्ञा मानून त्यांनी पुत्राची कुर्बानी करण्याचे ठरविले. इस्माईल किशोरवयात आला होता. त्यांनी आपल्या पुत्रास अल्लाहच्या आज्ञेसंबंधी सांगितले. पुत्राने आपल्या वडिलांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सहमती दर्शविली. म्हतारपणी आपल्या कोवळ्या मुलाच्या मानेवर सुरा फिरविण्याच्या विचाराने त्यांच्या काळजावर काय गुजरली असेल, ते त्यांनाच ठाऊक! जेव्हा त्यांनी मीनाच्या मैदानात आपल्या एकुलत्या पुत्रास कुर्बानीसाठी जमिनीवर पालथे पाडले आणि त्याच्या गळ्यावर सुरा धरला, तेव्हा दोघांचा दृढनिश्चय पाहून अल्लाहने कुर्बानी करण्यासाठी त्यांच्यापर्यंत मेंढा पोहोचविला आणि इब्राहीम [अलै.] यांना मेंढ्याची कुर्बानी करण्याची आज्ञा दिली. आपला एकुलता पुत्र, ते अल्लाहच्या आज्ञेनुसार कुर्बान करतात की नाही, ही त्यांची परीक्षा होती आणि त्यात ते पूर्णतः यशस्वी ठरले होते. पवित्र कुरआनात उल्लेख आलेला आहे,

आणि जेव्हा त्यांचा [इब्राहीम] मुलगा [इस्माईल] वयात येऊन त्यांच्यासोबत धावपळ करू लागला, तेव्हा ते आपल्या मुलास म्हणाले, “माझ्या मुला! मी स्वप्न पाहिले आहे की, मी तुझी कुर्बानी करीत आहे. विचारपूर्वक सांग, तुझे याविषयी काय मत आहे?” तो म्हणाला, “बाबा! तुम्हांस जी आज्ञा दिली जात आहे, त्यानुसार कृती करा. एकमात्र पालनकर्त्याने इच्छिले, तर मी तुम्हाला अटळ संयमी आढळेन.” जेव्हा दोघे पालनकर्त्याच्या इच्छेला पूर्णतः समर्पित झाले आणि त्यांनी आपल्या मुलास पालथे पाडले. तेव्हा आम्ही हाक दिली, “हे इब्राहीम! तुम्ही आपले स्वप्न खरे करून दाखविले. निश्चितच आम्ही सदाचारी लोकांना अशाचप्रकारे [परीक्षा घेऊन] मोबदला देत असतो.” खरोखर ही उघड परीक्षा होती. [तुम्ही यात सफल ठरले म्हणून] आम्ही मोठ्या कुर्बानी [ला मुलाच्या कुर्बानीच्या समकक्ष ठरवून त्या] द्वारे त्याचा पर्याय उपलब्ध करवून दिला.[11]

कुर्बानीद्वारे अल्लाहने प्रेषित इब्राहीम [अलै.] यांची अंतिम परीक्षा घेतली. या परीक्षेच्या माध्यमातून समस्त मानवजातीला उच्चतम नैतिक मूल्यांची शिकवण देणे अभिप्रेत होते. त्यांच्यासमोर सर्वोत्तम आदर्श सादर करणे अपेक्षित होते. नि:स्वार्थता, समर्पणभाव, त्याग आणि बलिदान यांचा जिवंत पुरावा असणारा आदर्श. तो आदर्श प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या रुपात साकार केला जात होता. सत्यासाठी समर्पित होण्याच्या त्यांच्या मानसिक तयारीची अंतिम सीमा काय असू शकते? हे सोदाहरण दाखविण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. आयुष्यभर प्राणाची कुर्बानी देण्यास तयार असणारे इब्राहीम [अलै.] आपल्या एकुलत्या पुत्राचीही कुर्बानी करू शकतात, हे याद्वारे दाखविण्यात आले. पूर्वीच्या अनेक परीक्षांप्रमाणे ते या परीक्षेतही यशस्वी ठरले. त्यांच्या सत्याप्रती त्याग, बलिदान व समर्पणाच्या भावनेने प्रसन्न होऊन पालनकर्त्याने त्यांच्यावर आपल्या कृपाप्रसादांचा वर्षाव केला. अल्लाहच्या आज्ञेनुसार त्यांनी पुत्राच्या कुर्बानीच्या जागी पशुची कुर्बानी दिली.

हजची यात्रा आणि कुर्बानीचे वैश्विकीकरण

कुर्बानीचा सण आनंदोत्सव तर आहेच, मात्र त्याहून जास्त बलिदानोत्सव आहे. प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ त्यांची स्मृती जपण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाद्वारे त्यांच्या त्याग, बलिदान आणि समर्पणाला जगाच्या अंतापर्यंत मानवजातीसाठी आदर्श बनविण्यात आले. यासाठी अल्लाहने प्रेषित इब्राहीम [अलै.] यांना मक्का या निर्जनस्थळी अल्लाहच्या उपासनेसाठी एका घराची निर्मिती करण्याचे व अजान देण्याचे आदेश दिले. या निर्जनस्थळी अल्लाहची उपासना कोण करणार, असा प्रश्न त्यांना साहजिकच पडला असणार. तेव्हा अल्लाहने त्यांना वचन दिले की, आम्ही प्रलयापर्यंत या शहराला अल्लाहच्या उपासनेचे केंद्र बनवू. जेथे जगभरातून भाविक येतील आणि त्यांच्या त्याग, बलिदान व समर्पणातून प्रेरणा घेतील. या जिवंत चमत्काराचा उल्लेख कुरआनने अशाप्रकारे केला आहे,

आणि लोकांमध्ये हजची घोषणा करा. दूरवरच्या ठिकाणांहून पायी अथवा उंटावर स्वार होऊन त्यांना येऊ द्या.[12]

अल्लाहने या वचनाची पूर्तता केली. एक-दोन नव्हे तर सलग ४० शतकांपासून मक्का शहर अल्लाहच्या उपासनेचे केंद्र आहे. प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या त्याग आणि समर्पणातून मानवजातीने प्रेरणा घ्यावी, म्हणून त्यांच्या त्याग आणि समर्पणाला कायम स्वरूपी जिवंत ठेवण्यात आले आहे आणि त्याद्वारे इस्लामचे उच्च जीवन उद्देश मानवी मनावर कोरण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या त्याग आणि समर्पणाची कायम आठवण राहावी आणि त्यांच्या जीवन संदेशास समस्त पिढ्यांनी आचरणात आणावे, म्हणून दरवर्षी हजयात्रा आणि कुर्बानीद्वारे त्यांच्या समर्पित जीवनाचे स्मरण केले जाते. हजयात्रा नमाज, रोजा आणि जकातप्रमाणे असाधारण उपासना आहे. हज करण्यास सक्षम असणाऱ्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी त्याच्या आयुष्यातून एकदा हज करणे अनिवार्य आहे. मात्र हजसाठी आर्थिक व शारीरिक सामर्थ्य नसणाऱ्या मुस्लिमांनाही त्याग, बलिदान आणि समर्पणाच्या इब्राहीमी संस्कृतीशी जोडून ठेवण्यासाठी हजच्या एका विधीला – कुर्बानीला – सार्वत्रिक करण्यात आले आहे.

ईदच्या दिवशी त्यांच्या समर्पित जीवनाच्या आठवणी ताज्या केल्या जातात. त्यांच्या जीवनातून सत्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा घेतली जाते. कुर्बानीचा सण पशूहत्या करून साजरा केला जाणारा आनंदोत्सव नाही, तर त्याग व समर्पणाची भावना निर्माण करणारा प्रेरणोत्सव आणि बलिदानोत्सव आहे. ज्याद्वारे सत्यासाठी वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देण्याची भावना समाजामध्ये जागृत केली जाते. हा इब्राहीमी संस्कृतीचा ठेवा आहे, मागील अनेक शतकांच्या इतिहासाचे संचित आहे. जगातील समस्त मुस्लिमांच्या ऐतिहासिक प्रवाहाचे हे संचित आपल्या कृतीतून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणे, मुस्लिमांसाठी अनिवार्य आहे, ते त्यांचे नैतिक कर्तव्यही आहे. कुर्बानीचा विधी भावी मुस्लिम पिढ्यांना इब्राहीमी संस्कृती आणि इतिहासाशी जोडणारा अत्यंत महत्वाचा धागा आहे. अनेक शतकांच्या त्याग आणि बलिदानाच्या इतिहासाचा वारसा आहे. हा धागा तोडणारा आणि वारसा नष्ट करू पाहणारा समाज, कोणत्याही सांस्कृतिक पुरुषाशिवाय उभा राहण्याचा प्रयत्न करणारा अधांतरी समाज ठरेल.

प्रेषित इब्राहीम यांचा काळ

इतिहासकारांनी प्रेषित इब्राहीम [अलै.] यांचा काळ आजपासून अंदाजे ४ हजार वर्षांपूर्वीचा सांगितला आहे. प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या समर्पित जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी कुर्बानीचा उत्सव हजयात्रेच्या महिन्यात साजरा केला जातो. ज्ञात इतिहास प्रेषित इब्राहीम [अलै.] यांचा ‘राष्ट्रांचे पिता’ म्हणून गौरव करतो. ज्यू, ख्रिस्ती आणि मुस्लिम हे तिन्ही समाज स्वतःला प्रेषित इब्राहीम [अलै.] यांचे अनुयायी मानतात. काही ख्रिस्ती विद्वानांच्या मते हिंदू धर्मामध्ये प्रेषित इब्राहीम [अलै.] यांचा उल्लेख अभिराम[13] नावाने करण्यात आलेला आहे. परंतु मुस्लिम विद्वान या मताशी सहमत नाहीत. चौदा शतकांपूर्वी झालेले अंतिम प्रेषित मुहम्मद [स.] इब्राहीमपुत्र इस्माईल यांचे वंशज होत. त्यांनी तोच धर्मसंदेश दिला, जो प्रेषित इब्राहीम [अलै.] यांनी दिला होता.

तुमच्यासाठी त्याने धर्माची तीच पद्धत आखून दिली, जी त्याने नूह यांना पाळावयास लावली होती आणि इब्राहीम, मुसा आणि ईसा यांनाही त्याच धर्मास प्रस्थापित करण्यास सांगितले होते.[14]

हे सारे प्रेषित ईश्वराचे संदेशवाहक होते. त्यांचा काळ वेगवेगळा असला तरी त्यांची शिकवण, धर्म आणि संदेश एकच होता. एकमात्र चिरंजीवी पालनकर्त्याच्या भक्तीचा आणि त्याच्यासमोर नतमस्तक होण्याचा संदेश; प्रेमाचा आणि माणूसकीचा संदेश. सर्वांना जोडणारा संदेश. परंतु खेद आहे की, लोकांनी त्याला वेगवेगळे समजले.

आणि त्यांना [पूर्वीच्या समस्त पैगंबरांना] याशिवाय कोणता आदेश देण्यात आला नव्हता की, त्यांनी आपल्या धर्माला त्याच्यासाठी विशुद्ध ठेवून केवळ अल्लाहची भक्ती करावी अगदी एकाग्र होऊन आणि नमाज अदा करावी आणि जकात देत राहावी. हाच खरा धर्म आहे.[15]


संदर्भ:

[1] ‘अलैहस्सलाम’चे संक्षिप्त रूप. प्रेषितांच्या नावाचा उल्लेख येताच त्यांच्यासाठी अल्लाहकडे ‘शांती आणि कृपेची’ दुआ करण्याची मुस्लिम परंपरा आहे.

[2] कुरआन, सुरह मरयम, आयत ४१-४३

[3] कुरआन, सुरह अनआम, आयत ७४-७९

[4] कुरआन, सुरह मरयम, आयत ४६

[5] कुरआन, सुरह बकरा, आयत २५८

[6] कुरआन, सुरह अंबिया, आयत ६८

[7] कुरआन, सुरह अंबिया, आयत ६९

[8] कुरआन, सुरह अंबिया, आयत ६७

[9] हाजरा प्रेषित इब्राहीम यांच्या दुसऱ्या पत्नी आणि इस्माईल यांच्या माता.

[10] मक्का त्यावेळी निर्जन स्थळ होते. पुढे हाजरा आणि इस्माईल यांनीच मक्केला वसविले. अरब लोक इस्माईल यांचे वंशज आहेत.

[11] कुरआन, सुरह साफ्फात, आयत १०२-१०७

[12] कुरआन, सुरह हज, आयत २७

[13] http://www.hermetics.org/Abraham2.html

[14] कुरआन, सुरह शूरा, आयत १३

[15] कुरआन, सुरह बय्यिना, आयत ५