मानवजात आणि एकता
मानव समाजप्रिय प्राणी आहे. विकसीत मानवी समाजासाठी सामाजिक एकता अनिवार्य आहे. एकतेशिवाय मानवी समाजाचा विकास होणे शक्य नाही. समस्त मानवजातीच्या मुलभूत गरजा सारख्याच आहेत. सर्व माणसे एकाच प्रकारे जन्माला येतात, एकाच प्रकारे आपल्या मुलभूत गरजा पुर्ण करतात आणि एकाच प्रकारे त्यांचा अंत होतो. निसर्गाचा हाच नियम आहे. मानवी समाजात इतकी कमालीची नैसर्गीक एकता आढळूनदेखील मानवी समाज जात-वंश, संस्कृती आणि भौगोलिकतेच्या नावावर विविध गटांत विभागलेला आहे. प्रत्येक गट दुसऱ्या गटाशी स्पर्धा करण्यात मग्न आहे; प्रसंगी ही स्पर्धा हिंसक रुप धारण करीत आहे आणि याचे कोणासही काही गैर वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या गटबाजी कधी एकेकाळी मानवाला एकसंघ करण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नांचे फलित आहेत.
मानवांना विविध गटांत विभागून त्यांना आपसात लढण्यास प्रवृत्त करणारी गोष्ट म्हणजे मानवी जीवनाचा उद्देश. मानवी जीवनाचा उद्देश हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू असतो. ज्याच्या पुर्तीसाठी तो आपले साधन-संपत्ती, वेळ आणि योग्यता अर्पण करतो. प्रसंगी त्याग आणि बलिदान करतो आणि याला तो आपल्या जीवनाची सर्वोच्च प्राप्ती समजतो. उद्देशहीन जीवन मानव जगू शकत नाही; किंबहुना उद्देशहीन जगणे, जणू न जगण्यासारखेच आहे! माणसाला अर्थपूर्ण अस्तित्वासाठी उद्देशाची गरज आहेच ! मानवी जीवनाचा उद्देश काय आहे, यावर विविध विचारवंतांनी प्रत्येक काळात आपले विचार व्यक्त केले आणि त्याच्या फलस्वरुप मानवी समाज विविध गटांत विभागला गेला.
मानवी जीवनाचे कथित उद्देश
मागील काही शतकांपुर्वी पुरातन साम्राज्य व्यवस्थांचा अंत झाला आणि मानव समाज विभागला जाऊ लागला. समाजाला एकसंघ ठेवणे कठीण होऊ लागले. तेव्हा समाजाला एकत्रीत करण्यासाठी विविध चळवळी सुरु झाल्या. यातील प्रमुख तीन प्रकारच्या चळवळींचा उल्लेख करणे योग्य राहील.
जात आणि वंशच माणसाच्या जन्म, विकास आणि संरक्षणास कारणीभूत आहे म्हणुन आपल्या जाती-वंशाची सेवा करणे, तिच्या लाभासाठी धडपड करणे, तिचे समर्थन करणे आणि तिचे संरक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे, आणि आपल्या जाती – वंशाचे ऋण फेडायचे असल्यास आपले जीवन या उद्देशासाठीच असणे गरजेचे आहे, असा विचार ज्या चळवळींनी समाजास दिला त्या चळवळी जाती-वंशाच्या नावाने सुरु झाल्या.
समाजास जात-वंशाच्या आधारे विभागून आणि केवळ आपापल्या जातीचा उद्धार साधून समाजाची वास्तविक प्रगती साधता येणार नाही, मानवजातीचा विकास होणार नाही. मानवाच्या विकासासाठी फक्त जातवंश कारणीभूत नसून समाजदेखील त्याच्या विकासात निर्णायक भूमिका बजावतो. अनेक जाती-वंशाची माणसे एकाच प्रकारची भाषा बोलतात किंवा त्यांची संस्कृती एकच आहे, या आधारावर ज्या काही चळवळी उदयास आल्या त्यांनी सांस्कृतिक एकतेचा नारा दिला. आपापल्या संस्कृतीचे जतन, संवर्धन, प्रसार आणि प्रचार हे समाजाचे उद्देश्य ठरविले गेले.
या शिवाय आणखी एक प्रकारचा विचार मांडण्यात आला. ज्या मातीत आपला जन्म होतो, आपला विकास आणि उद्धार होतो, ज्या मातीत आपण मरतो, त्या मातीशी प्रामाणिक राहण्याचा आणि त्या मातीचे ऋण फेडण्याचा तसेच जात-वंश, सांस्कृतिक विविधता असूनही एकाच मातीत राहणाऱ्या लोकांनी एकमेकांशी एकसंघ राहण्याचा आणि परस्पर सहकार्याने आपला विकास साध्य करण्याचा. हा विचार समाजाला भौगोलीक एकतेकडे आमंत्रण देणाऱ्यांकडून मांडण्यात आला.
वास्तविक पाहता या सर्व चळवळी अत्यंत तकलादू आणि अतिशय संकुचित मानसिकतेने प्रेरीत होत्या. सुंदर शब्दांच्या आवरणात एक भयावह वास्तव लपले होते. जातीय एकतेने मानवजातीस जातीवाद दिला. सांस्कृतिक एकतेने संस्कृतीवाद आणि भौगोलीक एकतेने जगाची ओळख राष्ट्रवादाशी करुन दिली. या तिन्ही मानसिकतेने प्रेरीत झालेले जनसमुह केवळ आपापल्या जाती-वंशाचा, आपापल्या संस्कृतीचा आणि आपापल्या राष्ट्राचा विकास साधण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करु लागले. इतरांशी स्पर्धा करु लागले. प्रसंगी ही स्पर्धा हिंसक रुप धारण करु लागली. आपापल्या जाती – वंशांचा, संस्कृतीचा आणि राष्ट्राचा विकास साधण्यासाठी, उद्धार करण्यासाठी ते एकमेंकासमोर उभे ठाकले आणि या उद्देशपुर्तीसाठी वाट्टेल ते करु लागले.
जातीवादाने स्वयंघोषित उच्च जातींकडून शुद्र जातींवर अमानुष अत्याचार लादले. जनावरापेक्षांही उपेक्षित असे जीणे त्यांच्या माथी मारण्यात आले. वंशवादाने जगाला हिटलर, मुसोलिनी आणि स्टॅलिनसारखे न विसरता येणारे क्रूरकर्मा जगाला दिले, ज्यांनी या संकुचीत मनोवृत्तीने प्रेरीत होऊन लाखोंचा संहार केला. आधुनिकतेची पताका फडकविणाऱ्या अमेरिकेसारख्या प्रगत समजल्या गेलेल्या राष्ट्राच्या संविधानात तीन काळया व्यक्तींना एका गोऱ्या व्यक्तीच्या समान ठरविण्यात आले. संस्कृतीच्या नावाखाली जागतिक जनसमुह विविध गटांत विभागले जाऊ लागले. भारताला या सांस्कृतिक वादाने २९ राज्यात विभागले. ही राज्ये प्रगतीसाठी एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत आणि त्यांची स्पर्धा सामान्य भारतीयांसाठी जीवघेणी सिद्ध होत आहे. राष्ट्रवादाने जगाला संहारक युद्धे दिली. बलवान आणि शक्तीशाली राष्ट्रांनी कमजोर व कमकुवत राष्ट्रांचे लचके तोडले. जगाला दोन महासंहारक अशा विश्वयुद्धांची देणगी राष्ट्रवादाने दिली.
आज मानवतेला कशाची गरज आहे ?
आज मानवी समाजाच्या उद्धारासाठी जगाला मानवतेच्या धड्यांची नितांत गरज आहे. गटबाजीमुळे पायदळी तुडविली गेलेली मानवी मुल्ये पुन्हाः जिवंत करणे गरजेचे आहे. मग ही मानवी मुल्ये जगातील ज्या कोण्या व्यवस्थेत असतील, ज्या कोण्या धर्मात असतील, त्यांचा स्विकार करणे अपरिहार्य आहे.
इस्लाम जगाला मानवतेचा संदेश देताना याच मुल्यांची स्थापना करतो. तो जगाला अशी निष्पक्षः शिकवणी देतो की ज्यातून एका आदर्श समाजाची स्थापना होऊ शकते. इस्लाम समस्त मानवजातीला एकाच आद्य स्त्री-पुरुषाची संतान ठरवितो. जात, वंश, वर्ण, संस्कृती, भौगोलिकेच्या आधारावर तो कोणासही श्रेष्ठता प्रदान करीत नाही अथवा तुच्छही लेखीत नाही. पवित्र ग्रंथ कुरआनची स्पष्टोक्ती आहे,
“लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा. ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्यापासूनच तुमचे जोडे निर्माण केले. आणि त्या दोघांपासून असंख्य स्त्री-पुरुष निर्माण करुन (जगभरात) पसरविले.” (पवित्र कुरआन ४:१)
याच शिकवणींचा परिणाम होता ही इस्लामने अखिल मानवजातीस स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण दिली. स्वातंत्रता अशी की मानवाला मानवाच्या गुलामीतून कायमची मुक्तता दिली. जात, वंश, वर्ण, संस्कृती, भौगोलिकतेचा खोटा गर्व, अहंकार इस्लामने एका झटक्यात नष्ट केला. समता अशी की गुलामांनाही अज़ान देण्याची संधी दिली. इतकेच नव्हे तर राज्यकर्ते बनण्याची संधी दिली. भारतातील बहुतेक सर्व मोघल राज्यकर्ते गुलामच होते. बंधुता अशी की समस्त मानवजातीस एकाच आद्य आई – वडीलांची संतान घोषीत करुन टाकले. न्याय असा की शासकालाही सामान्य नागरीकांप्रमाणे न्यायालयात उभे केले. प्रेषित मुहम्मद आपल्या अंतिम प्रवचनात आपल्या अनुयायांना संबोधताना स्पष्टपणे म्हणाले होते,
कोण्या गोऱ्याला कोण्या काळयावर, कोण्या काळयाला कोण्या गोऱ्यावर, कोण्या अरबाला कोण्या अरबेत्तरावर, कोण्या अरबेत्तराला कोण्या अरबावर कसलेही श्रेष्ठत्व नाही. (मुस्नद अहमद २२/९७८)
इस्लाम समस्त मानवजातीस मानवतेची शिकवणच देत नाही तर त्यांना एक समान आणि सर्वसमावेशक असा जीवन उद्देश्य देतो. पवित्र कुरआनची स्पष्टोक्ती आहे,
“आम्ही जिन्न आणि मानवांची निर्मीती यासाठीच केली की त्यांनी माझी उपासना करावी.” (पवित्र कुरआन ५१:५६)
इस्लाम कोण्या एका माणसाचा, जातीचा, वंशाचा, राष्ट्राचा नव्हे, तर समस्त मानवजातीचा एकच उद्देश्य ठरवितो. पवित्र कुरआनची स्पष्टोक्ती आहे,
“लोकहो! उपासना करा आपल्या पालनकर्त्याची, ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पुर्वीच्यांना निर्माण केले, यासाठी की तुम्ही ईशपरायण बनावे.” (पवित्र कुरआन २:२१)
इस्लाम समस्त मानवजातीला एकाच निर्मात्याची निर्मीती ठरवितो, सर्वांचा निर्माता एकच असल्याची शिकवण देतो, समस्त मानवजातीला एकाच आद्य आई – वडीलांची संतान संबोधतो आणि आपल्या पालनकर्त्याला जाणून घेणे, त्याने दिलेल्या शिकवणीनुसार आपले जीवन व्यतीत करणे याला तो आपल्या जीवनाचा उद्देश, नव्हे सर्वोच्च उद्देश करार देतो!