मानवी स्वभावाचा एक गुण, जो बाळगण्यास इस्लाम लोकांना सदा प्रोत्साहित करतो, तो म्हणजे उदारता. कुटुंबीय, मित्रमंडळी, शेजारी, अनोळखी आणि अगदी शत्रू यांच्याप्रती उदार असण्याचे महत्व, संपूर्ण कुरआन आणि प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या शिकवणीत वारंवार नमूद करण्यात आले आहे. उदारतेबद्दल बोलण्यासाठी रमजानच्या महिन्यापेक्षा चांगली वेळ दुसरी असूच शकत नाही.
जगभरातील मुस्लिमांसाठी रमजानचा महिना अल्लाहच्या कृपेचा महिना आहे. या महिन्यात मुस्लिम लोक त्यांच्या जीवनशैलीचे परीक्षण करतात आणि त्यात बदल घडविण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करतात. रमजानचा महिना तीव्र आणि निरंतर अशा भक्तीमुळे आस्तिकांना त्यांच्या अंतःकरणाची आणि मनाची तपासणी करण्यास भाग पाडतो. रोजांचा महिना म्हणून प्रसिद्ध असलेला रमजान हा दान आणि कृपेचा महिना देखील आहे. दिवसाचे रोजे आणि रात्रीची नमाज मानवी अंतःकरणाला शुद्ध करतात आणि हृदयात करुणा व उदारतेचे तरंग निर्माण करतात. भक्तीचा हा महिना सावकाश येतो, हळूवारपणे स्थिर होतो आणि मानवावर अल्लाहची कृपा, दया व क्षमा अवतरीत करतो. रमजानची कृपा आणि उदारता ओसंडून वाहणाऱ्या नदीप्रमाणे असते.
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद [स.] लोकांच्या तुलनेत सर्वाधिक उदार होते आणि रमजानच्या महिन्यात जेव्हा जिब्रईल त्यांना भेटायला येत, तेव्हा ते तुलनेने जास्त उदार होत. रमजानच्या प्रत्येक रात्री महिन्याच्या शेवटपर्यंत, प्रेषित मुहम्मद [स.] जिब्रईल यांना कुरआन वाचून दाखवीत आणि जिब्रईलशी भेट झाल्यानंतर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापेक्षा जास्त उदारतेने वागत. [1]
रमजानच्या या २९/३० दिवसांमध्ये, मुस्लिम लोक उदारतेचे प्रदर्शन करतात. ते स्वतःहून आपल्या खर्चांना कात्री लावतात आणि अनाथांना, गरजूंना, वंचितांना आणि धर्मादाय संस्थांना जाहीरपणे किंवा जाहीर न करता आर्थिक मदत करतात. तथापि, इस्लाममध्ये दान केवळ पैसे देऊनच होते असे नाही. आपल्याकडे असणारी कोणतीही दान करण्याजोगी वस्तू दान केली जाऊ शकते. पैसे असणाऱ्याने पैसे, उत्पादकाने उत्पन्नातील काही भाग आणि शारीरिक क्षमता असणाऱ्याने श्रमदान करावे. सारांश ज्याच्याकडे दान करण्यासाठी जे आहे, त्याने त्यापैकी उघड मनाने सढळहस्ते दान करावे. दान करण्याजोगे काहीच नसणाऱ्या व्यक्तीने केवळ स्मितहास्य करून पाहणे देखील दान आहे.
इस्लाम मुस्लिमांना नेहमीच उदारतेसाठी प्रोत्साहित करतो, तथापि रमजान एक स्मरणपत्र म्हणून कार्य करतो. जेव्हा या जीवनाची चिंता व संकटे जबरदस्त असतात, तेव्हा मानवाला अल्लाहने त्याच्यावर केलेल्या अगणित कृपांचा विसर पडतो. रमजान त्याला स्मरण करून देतो की, अल्लाहची कोणतीच कृपा साठवून ठेवण्यासाठी नाही, तर अल्लाहच्या मार्गात सढळहस्ते खर्च करण्यासाठी आहे. यासाठी आहे की त्याद्वारे, आपण त्याच्या कृपेबाबत उदारतेचे प्रदर्शन करावे. जसे अल्लाहने आपल्यावर कृपा अवतरीत करताना उदारतेचे प्रदर्शन केले, तशीच उदारता दाखवून आपण देखील ही कृपा गरजवंतांमध्ये वितरीत करावी.
अल्लाह करीम आहे अर्थात अत्यंत उदार आहे. सर्वकाही त्याच्यापासून उद्भवते आणि सर्वकाही शेवटी त्याच्याकडेच परत जाणार आहे, म्हणून आपली साधनसंपत्ती अल्लाहची कृपा समजून त्यातून इतरांना वाटा देणे महत्वाचे आहे. अल्लाहने जे काही प्रदान केले आहे, ते जतन करण्यास, त्याचे संरक्षण करण्यास आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे ते सर्वांसोबत सामाईक करण्यास आम्ही बांधील आहोत.
“सांगा, माझा पालनकर्ता त्याच्या भक्तांपैकी ज्याला तो इच्छितो त्याला विपुल प्रमाणात देतो आणि ज्याला तो इच्छितो त्याला कमी देतो. तुम्ही जे काही दान द्याल ते तो बदलून घेईल; निसंशय तो सर्वोत्कृष्ट प्रदाता आहे.’’ [2]
उदारतेचे मूर्तिमंत रूप म्हणून जगभरातील मुस्लिम प्रेषित मुहम्मद [स.] आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या रमजान महिन्यातील आचरणाकडे पाहतात. येथे इस्लामला उदारतेचा आधुनिक अर्थ अभिप्रेत नाही. कारण उदारतेच्या आधुनिक अर्थानुसार तुम्हाला गरज नसलेल्या किंवा तुमच्या वापरातून बाद झालेल्या वस्तू दान करणे आणि गरजूंना देणे. इस्लाम अशा दानधर्माला पसंत करीत नाही. उदारतेचा इस्लामी अर्थ आणि प्रेषितांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केलेला आदर्श तुम्हाला तुमच्या गरजेच्या आणि अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू अल्लाहच्या मार्गात दान करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
प्रेषितांच्या पत्नी आणि जगातील सर्व इमानधारकांच्या माता आयशा म्हणतात, “एक महिला, तिच्या दोन मुलींसह माझ्याकडे काही भिक्षा मागण्यासाठी आली, परंतु तिला देण्यासाठी माझ्याकडे एक खजूरशिवाय काहीच नव्हते, मी तिला ती खजूर देऊ केली. तिने ती खजूर तिच्या दोन मुलींमध्ये वाटून टाकली.” [3]
प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या सभोवतालच्या स्त्री-पुरुषांना उदारतेचे खरे मूल्य समजले होते. त्यांनी जाणले की, दयाळू आणि उदार कृत्ये ही मरणोत्तर जीवनासाठीची गुंतवणूक आहे. सत्कृत्ये, विचारप्रवर्तक उपदेश आणि दयाळूवृत्तीचे मरणोत्तर जीवनात भरपूर प्रतिफळ मिळतील. अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी केल्या जाणाऱ्या दानकार्याचे मोबदले कित्येक पटीने वाढवून दिले जातील. मुक्तपणे दान करण्यात आलेली संपत्ती मरणोत्तर जीवनात ऐहिक जगातील कर्मांचे प्रतिफळ बनवून सादर केली जाईल.
औदार्य एक कालातीत सद्गुण असले तरी, रमजानमध्ये केली जाणारी सत्कृत्ये, दयावृत्ती आणि उदारतेचे प्रतिफळ कित्येक पटीने वाढवून दिले जाते. हा दयेचा महिना आहे, ज्यात अल्लाह मानवाला त्याच्या कर्मांचे अमर्याद मोबदले प्राप्त करण्याची संधी देतो, जे वर्षभरात संकलित करता येणाऱ्या पुण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात. रमजान हा अल्लाहच्या औदार्य, दयावृत्ती आणि क्षमाशीलता महिना आहे. मन:पूर्वक व्यक्त केलेल्या पश्चातापाच्या बदल्यात अल्लाह मानवाच्या चुका आणि पापांना क्षमा करतो. अर्थातच त्याची क्षमा आणि दया केवळ रमजानपुरती मर्यादित नाही.
तसेच या महिन्यात, उपासनेत व्यतीत केलेल्या १००० महिन्यांपेक्षा उत्तम अशी रात्र आहे. ही रात्र अल्लाहच्या मानवावरील प्रेमाचा पुरावा आहे. ही अशी रात्र आहे, ज्यात इमानधारक महिन्याभराच्या उपासनेच्या तुलनेत विशेष अशी भक्ती व उपासना करतात आणि औदार्याचे व उदारतेचे प्रदर्शन करतात. रमजानचा रोजा इमानधारकांना अल्लाहच्या अमर्याद कृपांची आठवण करून देतो, तसेच त्यापासून वंचित असलेल्या लोकांच्या हाल-अपेष्टांची जाणीवही करून देतो. रमजानमुळे इमानधारकांना गरजवंत, वंचित आणि निर्धन लोकांची मदत करण्याची संधी मिळते.
औदार्य आणि दयावृत्ती खरोखर मानवी हृदयाला आनंद देते. ज्याने देखील शुद्ध अंतःकरणाने आपली साधनसंपत्ती केवळ अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी दान केली, त्याला त्या कृत्यामुळे अतुलनीय समाधान लाभते. तथापि ज्यांच्याकडे काहीच उपलब्ध नाही त्यांचे काय? निश्चितच, अल्लाहच्या औदार्याला कसलीच सीमा नाही. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतही मानव उदार होऊ शकतो. प्रेषितांच्या काळात घडलेला एक प्रसंग याचे उत्तम उदाहरण आहे.
काही लोक प्रेषित मुहम्मद [स.] यांच्याकडे आले आणि त्यांनी विचारले, जर एखाद्याकडे देण्यासारखे काही उपलब्ध नसेल तर त्याने काय करावे? ते म्हणाले, त्याने त्याच्या कमाईतून स्वतःही लाभ घ्यावा आणि इतरांनाही दान करावे. त्यांनी विचारले, जर त्याच्याकडे तेही नसेल तर त्याने काय करावे? त्यांनी उत्तर दिले, त्याने मदतीसाठी आवाहन करणाऱ्या गरजवंतला शक्य त्याप्रकारे मदत करावी. लोकांनी पुन्हा विचारले, जर तो तसे करण्यासही असमर्थ असेल तर? त्यांनी उत्तर दिले, मग त्याने सत्कर्म करावे आणि दुष्कर्मांपासून परावृत्त राहावे आणि हेच त्याचे दानधर्म मानले जाईल. [4]
रमजान रोजांचा महिना म्हणून ओळखला जातो. रमजान अल्लाहकडून देण्यात आलेली देणगी, त्याच्या दयेचे प्रकटीकरण आणि मानवाच्या अंतर्निहित चांगुलपणाची आठवण करून देणारा महिना आहे. रमजान दानधर्माचा व उदारतेचा महिना आहे.
संदर्भ:
[1] इमाम बुखारी, सहीह, किताबुल मनाकिब, ६३
[2] कुरआन, सुरह सबा, सुरह ३४, आयत ३९
[3] इमाम बुखारी, सहीह, किताबुल अदब, २६
[4] बुखारी