दरवर्षी जगभरातील आणि सर्व देशातील आणि आर्थिक पार्श्वभूमीतील मुस्लिम इस्लामी परंपरेतील रमजान म्हणून ओळखल्या जाणार्या सर्वात आशीर्वादित महिन्यात दररोज पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास सुरू करतात. परंतु रमजानला आशीर्वादित महिना कशामुळे म्हणतात? मुस्लिम या महिन्यात उपवास का करतात? उपवासाचे आध्यात्मिक फायदे काय आहेत? हे सर्व आणि यासारखे बरेच काही प्रश्न या लेखात संबोधित केले आहे, जे तुम्हाला एका महिन्याच्या दीर्घ आध्यात्मिक प्रवासाची ओळख करून देतील, ज्यामध्ये जगभरातील १.८ अब्जपेक्षा जास्त मुस्लिम सहभागी असतात.
रमजानचा संपूर्ण महिना म्हणजे कुरआनच्या प्रकटीकरणाचा महिना आहे. रमजान हा अल्लाहच्या कृपेचा उत्सव साजरा करण्याचा महिना आहे, ज्याद्वारे त्याने कुरआनमध्ये एक मार्गदर्शक प्रकाश पाठविला, जो मानवाला आदर्श आणि सद्गुणाच्या मार्गावर नेतो आणि मानवी आत्म्याचे वाईट आणि दुर्गुणांपासून संरक्षण करतो.
मुस्लिम रमजानमध्ये अन्नपाणी आणि लैंगिक संबंध टाळून, अल्लाहचे सान्निध्य साधण्याचा प्रयत्न करतात आणि जीवनात अल्लाहच्या उपस्थितीबद्दल खोल आंतरिक जाणीव विकसित करून, या मार्गदर्शनाबद्दल अल्लाहप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. अल्लाहची उपस्थिती जाणवण्याची ही आंतरिक यंत्रणा जीवनातील सर्वात कठीण परिस्थितीतही आत्म्याला जे न्याय्य तेच कार्य करण्यास प्रवृत्त करते आणि आत्म्याला चुकीच्या कृत्यांपासून दूर ठेवते, जरी तो जीवनाचा दृश्य स्वरुपात सर्वात सोपा किंवा सर्वात मोहक मार्ग असला तरी! यामुळेच कुरआन रमजानमध्ये उपवासाचे आदेश दिल्यावर अल्लाह आणि भक्त यांच्यातील घनिष्ठ नात्याबद्दल बोलतो.
“जेव्हा जेव्हा माझे सेवक तुम्हाला माझ्याबद्दल विचारतात, तेव्हा मी खरोखरच जवळ असतो – जेव्हा कोणी मला हाक मारतो, तेव्हा मी प्रार्थना करणार्याची प्रार्थना ऐकतो; म्हणून त्यांनी माझे ऐकावे, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा, म्हणजे त्यांनी योग्य मार्गाने जावे.” [1]
जेव्हा आत्मा आपल्या विधात्यापुढे स्वतःला कृतज्ञता व अधीनतेच्या स्थानावर पाहतो, तेव्हा त्याला रोजांद्वारे अल्लाहची दया, करुणा, प्रेम आणि औदार्याची ओळख होते. त्याला अल्लाहने दिलेल्या देणग्या चांगल्या कामांसाठी वापरण्याची जाणीव होते. वास्तविकतः, कुरआन आपल्या आत्म्याच्या नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे एका अल्लाहवर समर्पित विश्वास ठेवून व धार्मिक कृत्ये करून अल्लाहच्या इच्छेला अधीन होण्याची शिकवण देतो. [2] अशाप्रकारे इस्लामी परंपरेत, पापाची संकल्पना, स्वतःच्या आत्म्याला त्याच्या स्वभावाच्या आणि निर्माण केलेल्या उद्देशाच्या विरोधी असलेल्या अवस्थेत जबरदस्तीने लादण्यासाठी दडपशाहीची कृती म्हणून ओळखली जाते. [3] जेव्हा आत्मा पाप करीत राहतो, तेव्हा तो स्वतःच्या इच्छांचा गुलाम बनतो, स्वतःच्या इच्छेचा कैदी बनतो. [4]
स्वैरइच्छांना नियंत्रित करून आत्म्याला या बंधनांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न उपवासाद्वारे केला जातो आणि आत्म्यात उत्तरदायीत्वाची भावना वाढवली जाते. जी नैसर्गिकरित्या चांगुलपणाकडे आकर्षित असते. काही तासांसाठी जीवनाच्या मूलभूत गरजांपासून जीवाला वंचित ठेवल्याने, मानव स्वतःला राग, सूड, द्वेष, ईर्ष्या, अनैतिक आणि अतिलैंगिक इत्यादी वाईट गोष्टींपासून आत्मसंयम आणि आत्मनियंत्रण शिकवू शकतो. म्हणून प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले होते, जेव्हा तुमच्यापैकी कोणी उपवास करीत असेल, तेव्हा त्याने अश्लील बोलू नये आणि ओरडू नये; आणि जर कोणी त्याचा अपमान केला किंवा त्याच्याशी भांडण करण्याचा प्रयत्न केला तर त्याने म्हणावे, ‘मी उपवास करीत आहे, मी उपवास करीत आहे.’ प्रेषितांनी मुस्लिमांना इशारा दिला होता की, उपवासाला असा विधी बनवू नका, ज्याचा एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर आणि सवयींवर कोणताही परिणाम होणार नाही. जर एखादी व्यक्ती खोटेपणा व खोट्या वागण्यापासून परावृत्त होत नाही, तर अल्लाहला अशा व्यक्तीच्या खाण्यापिण्यापासून दूर राहण्याची काहीच गरज नाही. [5]
व्यक्तीमध्ये विकसित होण्यासाठीच्या सर्वात महत्त्वाच्या गुणांपैकी एक म्हणजे अल्लाह आणि अल्लाहच्या सृष्टीसाठी विनम्र असणे. भूक आणि तहान एखाद्याला हे समजण्यास साहाय्यक ठरते की, जर त्यांना अल्लाहची दया आणि पालनपोषण लाभले नसते, तर त्यांना देखील सर्वात कठीण आणि अवांछनीय परिस्थितीचा सामना करावा लागला असता. उपवास एक नम्र अनुभव आहे, जो नीतिमान आत्म्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, कारण खोटा अभिमान आणि गर्विष्ठपणा कधीच प्रामाणिक धार्मिकते सोबत राहू शकत नाही.
उपवासाची कृती, समाजातील गर्भश्रीमंतांना काही काळासाठी का अन्न, पाणी आणि जीवनाच्या इतर मूलभूत गरजांशिवाय लाखो लोक ज्या वेदना आणि दु:ख सहन करतात, ते अनुभवण्यासाठी संधी प्रदान करते. उपवास श्रीमंत आणि गरीब, शाश्वत आणि गरीब, सधन आणि गरजू यांच्यातील दरी कमी करतो. या अनुभवाने मग करुणा आणि दयेची प्रेरणा दिली पाहिजे, जी गरज असलेल्यांना मदत करण्यासाठी संपत्ती व वेळेच्या उदारतेने प्रकट होते. प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या परंपरेनुसार, मुस्लिमांना या महिन्यात विशेषतः बाहेर जाण्यासाठी आणि भुकेल्यांना अन्न देण्यासाठी आणि त्यांची संपत्ती चांगल्या कारणांसाठी खर्च करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते, जसे की शाळा व रुग्णालये इत्यादी. अल्लाहने या आशीर्वादित महिन्यातील सत्कृत्ये, चांगुलपणा आणि उदारतेची कृत्ये यांचा मोबदला या जगात आणि मरणोत्तर जीवनात दहा पटीने परत करण्याचे वचन दिले आहे.
रमजानशी संबंधित आशीर्वाद व बक्षीसांमुळे, मुस्लिमांना त्यांचे अन्न त्यांच्या शेजाऱ्यांसोबत सामायिक करण्यासाठी, सूर्योदयाच्या वेळी उपवास सुरू करण्यासाठी, सूर्यास्ताच्या वेळी उपवास सोडण्यासाठी त्यांच्या घरी पाहुण्यांना आमंत्रित करण्यास प्रोत्साहित केले जाते. मुस्लिमांना या महिन्यात अल्लाहची उपासना लक्षणीयरीत्या वाढवण्यास प्रोत्साहित केले जाते आणि म्हणूनच प्रत्येक मशिदीमध्ये रात्रीपर्यंत विशेष प्रार्थना केल्या जातात, बहुतेक मस्जिद उपासकांनी भरलेल्या असतात. यामुळे रमजान नेहमीच मजबूत धार्मिक वातावरण निर्मिती करतो आणि परिणामी समाजातील संबंध अधिक दृढ होतात. त्यामुळे बहुतेक मुस्लिमांना रमजानचा महिना गेल्याचे पाहून खूप वाईट वाटते.
शेवटी, रमजान कुरआनद्वारे मानवतेला देण्यात आलेल्या मार्गदर्शनाचा आनंद उत्सव आहे, ज्यात न्याय्य तेच करण्यासाठी मार्गदर्शक आणि वाईट विरुद्ध चेतावणी आहे. आत्म्याला विश्वास व सद्गुणांच्या कुरआनातील आदर्शांशी सुसंगत करण्यासाठी, भक्तांना अल्लाहशी जवळीक साधण्याचा व त्यांच्या आत्म्याला धार्मिकतेच्या नवीन उंचीवर नेण्याचा एक मार्ग म्हणून उपवास निर्धारित केला आहे. असे केल्याने, संपूर्ण मानवी अस्तित्व स्वतःला सकारात्मक नैतिक आणि सामाजिक बदलामध्ये रूपांतरित करण्यास सक्षम होते. जे कंजूसपणाला उदारतेने, क्रोधाला संयमाने, बदल्याला प्रेमाने आणि युद्धाला शांतीने बदलू शकते.
संदर्भ:
[1] कुरआन, सुरह बकरा, सुरह २, आयत १८६
[2] कुरआन, सुरह रूम, सुरह ३०, आयत ३०
[3] कुरआन, सुरह आले इमरान, सुरह ३, आयत ११७
[4] कुरआन, सुरह फुरकान, सुरह २५, आयत ४३
[5] बुखारी, सहीह, किताबुल अदब, ८७