मुजाहिद शेख
मुजाहिद शेख इस्लामी मराठी साहित्य विश्वाशी संबधित संशोधनात्मक लेखन करणारे तरुण लेखक आहेत. त्यांच्या लेखनाने इस्लामी मराठी साहित्याला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. इस्लामी शिकवणीशी संबंधित विविध विषयांवर जसे इस्लामी मुलतत्वे, इस्लामी समाजव्यवस्था, प्रेषितांचे चरित्र, प्रेषितांचे उपदेश आणि शिकवणी, इस्लामचा इतिहास, मुस्लिम ज्ञानविश्व आणि इस्लामी ज्ञानशाखा इ. वर त्यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांचे बरेच लेखन पुस्तिका आणि इ – पुस्तिका स्वरुपात प्रकाशित झाले आहे.
मुजाहिद शेख यांचे लेखन सर्वसामान्य मराठी वाचकासाठी आहे. त्यांच्या लेखनाची भाषा अत्यंत सोपी आणि मांडणी अत्यंत साधी आहे. अर्थगर्भ शब्दांचा कीस पाडून विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यापेक्षा वाचकाला विषयाचे आकलन व्हावे यासाठी साधे आणि सोपे लिखाण करणे महत्वाचे आहे. या तत्वाला धरून मुजाहिद शेख सामान्य मराठी वाचकासाठी लिखाण करीत आहेत. त्यांच्या लिखाणाचा उद्देश समाजजागृती करणे असल्यामुळे ते आपल्या प्रकाशित पुस्तिका नाममात्र दरात वाचकांसाठी उपलब्ध करीत आहेत. तसेच e पुस्तिकेच्या स्वरुपात सामान्य मराठी वाचकांपर्यंत पूर्णतः नि:शुल्क पोहोचवीत आहेत. त्यांच्या लिखाणाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व प्रकारच्या विचारधारेच्या प्रभावातून मुक्त होऊन – इस्लाम जसा आहे तसा – मांडण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या मांडणीतील इस्लाम उजव्या, डाव्या, मार्क्सवादी, समाजवादी, साम्यवादी, भांडवलवादी किंवा अन्य कोणत्याही विचारधारेच्या प्रभावातून पूर्णतः मुक्त आहे. ते इस्लामी विचारांशी प्रामाणिक राहून निष्पक्षपणे आपले विचार मांडीत आहेत. सध्या ते कुरआन-हदीस ग्रंथांच्या थेट अरबीतून मराठी अनुवादाच्या महत्वाच्या प्रकल्पावर कार्य करीत आहेत.