अस्पृश्यता आणि इस्लाम
अस्पृश्यता मानवी समाजास पोखरून काढणारी किड आहे. समाजास जडलेला एक रोग आहे. ज्या समाजाला हा रोग होतो, तो समाज इतिहासाच्या पानावर आपला कलंकित चेहरा मागे ठेवून जातो. उच्च मानवी मुल्यांचा, नैतिकतेचा पाया अस्पृश्यता पोखरुन टाकते; समाजाला विस्मयकारकपणे रानटी, क्रूर आणि असभ्य बनवते. जेथे मानवच मानवाचा शत्रु बनतो. तो त्यांची विभागणी विविध वर्गात करतो. या वर्गांच्या आधारावर त्यांचे अधिकार ठरविले जातात. कोणाला श्रेष्ठतेचा तर कोणाला कनिष्ठतेचा किताब बहाल केला जातो. ज्या वर्गात जन्म झाला, तो वर्ग बदलण्याचा कसलाच अधिकार कोणाला दिला जात नाही. श्रेष्ठ वर्ग कनिष्ठ वर्गावर अन्याय आणि अत्याचार लादतात. कनिष्ठ गटांची चोहोबाजूने नाकेबंदी केली जाते. त्यांच्या मुलभूत अधिकारांचे हनन केले जाते. सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय स्तरावर त्यांची मुस्कटदाबी केली जाते. त्यांच्या विकासाचे उन्नतीचे सर्व मार्ग बंद केले जातात. उच्च वर्गाची गुलामी त्यांच्या माथी मारली जाते.
या अस्पृश्यतेने जगाला काय दिले याचा अभ्यास करताना अक्षरशः अंगावर शहारे उभे राहतात. अस्पृश्यतेच्या भावनेने केलेल्या अत्याचारांचे चित्र डोळ्यासमोर आल्यास रक्त शरीरातच गोठून जाते. भारतीय समाजामध्ये अस्पृश्यतेला अत्यंत मर्यादीत दृष्टीकोनातुन पाहण्यात आले आहे. भारतात आढळणारी अस्पृश्यता हीच एकमेव अस्पृश्यता नसून, जगाच्या विविध भागात या अस्पृश्यतचे विविध रुपे आहेत. या लेखाची मर्यादा पाहता हे शक्य नाही की येथे त्यांची सविस्तर माहिती देता यावी. तरी देखील आपण काही निवडक अस्पृश्यता थोडक्यात पाहुयात…..
वांशिक अस्पृश्यता
वंशवादाचा जन्म वांशिक अस्पृश्यतेतुन झाला. कोण्या एका वंशाला वाटले की आमचा वंश दैवी वंश आहे, साक्षात ईश्वराच्या वंशातुन आमचा जन्म झाला असल्याने आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत. या वंशवादाने जगाला अत्यंत भयावह आणि रक्तरंजित असा इतिहास दिला. अगदी अलिकडच्या काळामध्ये हिटलर या वंशवादाचा मुर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्या आर्य वंशाच्या अहंकाराने (गर्वाने नव्हे!) ६० लाख निष्पापांचा बळी घेतला. आपल्या राष्ट्रात आर्यवंश सोडून इतर कोणताही वंश बाकी राहता कामा नये, या विचाराने पेटून उठलेल्या हिटलरने साऱ्या जर्मनीमध्ये होलोकॉस्ट राबवले. जनावरापेक्षाही भयंकर मृत्यु ज्यूंच्या माथी मारण्यात आला. विषारी वायुंचे चेंबर बनवून ज्यू लोक अक्षरशः त्यात कोंबण्यात आले. यात निष्पाप बालके, गरोदर स्त्रिया आणि वृद्धदेखील होतेच. जगाच्या इतिहासात होलोकॉस्ट नेहमीकरिता निर्दयता आणि अमानुषपणा याचे जिवंत उदाहरण बनून राहिले आहे.
वर्णवादाची अस्पृश्यता
गोऱ्या साहेबांच्या वर्णवादाने मागील काही शतके या जगाला अत्याचार, अन्याय, दमन आणि निर्दयतेची काळीकुट्ट काळरात्र दिली. कृष्णवर्णीय तसेच काळ्या निग्रो लोकांना माणुस म्हणून जगण्याचा अधिकारच साहेब लोकांनी नाकारला. काळ्या लोकांची बाजारामध्ये सर्रास खरेदी-विक्री केली जात असे. बाजारामध्ये आपण जसा निवडून भाजीपाला घेतो, तशी त्यांची निवड होत असे. शरीराचे अंग-अंग निरखुन पाहिले जाई. गोऱ्या साहेबांनी आफ्रीका पादाक्रांत करताना आपल्या अत्याचाराचे बळी किती गेले, याची मोजदादच केली नाही. आपण डास मारतो ना, अगदी तसेच मारले त्यांना ! जहाजात कोंबुन महासागरात जलसमाधी दिली लाखोंना !
१८ व्या शतकात युरोपीय देशात प्राणी संग्रहालये असतात, तशी निग्रो लोकांची संग्रहालये उभारली जात असत. गोऱ्या साहेबांची पोरं तिथं जात, निग्रो लोकांना मोठ्या कुतुहलाने पाहात आणि ही जनावरं अगदी माणसासारखीच दिसत असल्याचा शेरा मारीत असत! अगदी अलिकडे आपल्या सभ्यतेचा आणि आधुनिकतेचा ठेंबा मिरविणाऱ्या स्वतंत्र अमेरिकेच्या संविधानात देखील तीन काळ्या व्यक्ती एका गोऱ्या व्यक्तीच्या समान समजल्या जाव्यात, अशी तरतुद करण्यात आलेली होती.
जातीय अस्पृश्यता
आपल्या भारतभुमीला अस्पृश्यतेचा चरणस्पर्श जातीवादाच्या स्वरुपात झाला. जातीवादाने माणसांना चार विविध वर्गात विभागुन टाकले. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र. शुद्रांचा (दलितांचा) वर्ग या चार वर्गात सर्वात खालच्या दर्जाचा आणि तुच्छ मानला गेला. या वर्गाला इतरांसारखे कसलेही अधिकार देण्यात आले नव्हते. उलटपक्षी, अधिकार असतात तरी काय याची त्यांना कल्पनादेखील नव्हती. श्रेष्ठ वर्गाची गुलामी करणे हेच त्यांचे जीणे होते. सार्वजनिक मार्ग वापरण्याचा, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा, इतकेच काय तर सार्वजनिक मंदिरात पुजा करण्याचा देखील अधिकार नव्हता त्यांना (आजदेखील नाही काही भागांत) ! आजही भारतात दलित स्त्रीयांची नग्न धिंड काढणे, दलितांना जिवंत जाळणे, गावाबाहेर काढणे आणि वाळीत टाकणे, असे प्रकार सर्रास घडत असतात. आजही दलित बांधवांच्या वस्त्या गाव असो की शहर, सामान्यतः वेशीबाहेरच असतात. भांड्यात कुत्र्याने तोंड घातलेले लोकांना खपते, परंतु दलिताने हात घालणे आजही अनेकांना खपत नाही.
भाषिक-सांस्कृतिक अस्पृश्यता
उपरोक्त अस्पृश्यता काय कमी होत्या की जगाने याव्यतिरिक्त आणखी एका प्रकारची अस्पृश्यता पाहिली, ती म्हणजे भाषा-संस्कृतीच्या नावाने उदयास आलेली अस्पृश्यता ! या अस्पृश्यतेमुळे एकाच जाती-समुदायाचे, वर्ण-वंशाचे, इतकेच काय तर एकाच राष्ट्राचे लोक एकमेकांचे विरोधक बनले. भाषेच्या आधारावर जनसमुह श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविले जाऊ लागले. जगभरात ठीकठिकाणी हिंसाचार घडू लागले. राष्ट्रांचे विभाजन होऊन नवनवीन राष्ट्रे उदयास येऊ लागले. स्वातंत्र्योतत्र काळात भाषा-संस्कृतीच्या नावाखाली झालेली राज्यांची निर्मिती असो अथवा पाकिस्तान-बांग्लादेश संघर्ष असो, या विभाजनाचे श्रेय हे याच भाषा-संस्कृतीच्या अस्पृश्यतेला दिले गेले पाहिजे.
इस्लाम आणि मानवजातीची एकता
जगाचा इतिहास याची साक्ष देतो की जगभरातील या अस्पृश्यतांना तिलांजली देऊन मानवजातीला एकाच माळेत गुंफण्याचे श्रेय जाते ते फक्त नि फक्त इस्लामलाच ! समाजाच्या विकासासाठी अत्यावश्यक असणाऱ्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांची मुहूर्तमेढ आजपासून १४४० वर्षापुर्वी इस्लामने रोवली याची साक्ष जगाचा इतिहास आणि समस्त समाजसुधारक स्वतः देतात. पवित्र ग्रंथ कुरआनची स्पष्टोक्ती आहे.
“लोकहो! आम्ही एकाच स्त्री-पुरुषापासून तुमची निर्मिती केली आणि तुमचे विविध जाती- समुदाय बनविले, यासाठी की तुम्ही एकमेकांना ओळखावे. निःसंशय, तुमच्यापैकी तोच अल्लाहकडे सन्मानास पात्र आहे, जो सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा, जाणीव असणारा आहे.” (पवित्र कुरआन ४९:१३)
इस्लामने दिलेला हा संदेश अर्थातच दिव्य आहे, क्रांतीकारक आहे. या एकाच संकेताने अस्पृश्यतेची पाळेमूळे उध्वस्त होऊन जातात. इस्लाम एका झटक्यात अरब -अरबेतरांना, मराठे-मुघलांना, दलित-स्वर्णांना, मालक-गुलामांना, शोषक-शोषितांना आणि कामगार-भांडवलदारांना एका आद्य आई-वडीलांची संतान ठरवितो. जन्माच्या आधारावर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा जातीभेद, वर्णभेद, वंशभेद किंवा भाषा-संस्कृतीचा भेद इस्लाम पूर्णपणे नाकारतो. इस्लाम प्रत्येकाला कर्म करण्याचे स्वातंत्र्य देतो, समान संधी देतो आणि एकाच आद्य आई-वडीलांची संतती संबोधून त्यांच्यामध्ये वैश्विक बंधुता निर्माण करतो. त्यांच्यातील कोणत्याही कथित भेदाला कसलीही किंमत देत नाही.
जन्माच्या आधारावर कोणालाही कोणावरही कसलेही श्रेष्ठत्व प्राप्त नाही. प्रेषित मुहम्मद स. अंतिम वार्षिक मेळाव्यात आपल्या अनुयायांना संबोधताना स्पष्टपणे म्हणाले होते,
“कोण्या गोऱ्याला कोण्या काळयावर, कोण्या काळयाला कोण्या गोऱ्यावर, कोण्या अरबाला कोण्या अरबेत्तरावर, कोण्या अरबेत्तराला कोण्या अरबावर कसलेही श्रेष्ठत्व नाही.” (मुस्नद अहमद २२/९७८)
हो श्रेष्ठत्व प्राप्त केले जाऊ शकते, ते फक्त कर्माच्या आधारावर ! जसे उपरोक्त नावापैकी काहींनी काहींवर आपल्या गुण-कर्माच्या आधारावर श्रेष्ठत्व प्राप्त केले आणि हेच श्रेष्ठत्व इस्लामला मान्य आहे.