आता आपण मांसाहाराबद्दल चर्चा करूयात. अनेकांचा असा गैरसमज आहे की, मुस्लिमांच्या मांसाहारामागे धार्मिक प्रेरणा कार्यरत असते. या प्रकरणात आपण मांसाहाराबद्दलचा सर्वधर्मिय दृष्टीकोन काय आहे, हे समजून घेणार आहोत. तत्पूर्वी शाकाहार आणि मांसाहाराची व्याख्या काय, हे पाहूयात. मांसाहार म्हणजे फक्त आणि फक्त मांसाचा आहार असे नाही. मांसाहाराची अशी व्याख्या कोणत्याही शब्दकोशात सापडत नाही. मांसाहाराची व्याख्या केवळ इतकीच आहे की, आहारात मांसाचा किंवा प्राण्यांपासून प्राप्त होणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे.[1] मांसाहारी लोक पालेभाज्या, फळ, वनस्पती, कडधान्ये, दुध आणि अंडी सोबत मासे, चिकन आणि मांस खातात. परंतु शाकाहारींचे तसे नाही. शाकाहार म्हणजे नैतिक, धार्मिक वा आरोग्याशी संबंधित कारणांमुळे फक्त आणि फक्त वनस्पतीजन्य पदार्थांचा आहार म्हणून उपयोग करणे.[2]
मात्र सगळेच शाकाहारी सारखे असतात, असेही नाही. काही शाकाहारी केवळ पालेभाज्या आणि फळाहार करतात. काही शाकाहारी पालेभाज्या आणि फळांसोबत कडधान्ये खातात. बहुसंख्य शाकाहारी पालेभाज्या, फळ आणि कडधान्ये यांच्यासोबत दुधही पितात. दुध तर झाडाला लागत नाही. अनेक शाकाहारी लोक पालेभाज्या, फळ, कडधान्ये आणि दुध यांच्यासोबत अंडीही खातात.[3] शाकाहारींचे वर्गीकरण जागतिक शाकाहारी सोसायटीने तयार केले आहे. गोव्यातील काही शुद्ध शाकाहारी गौड सारस्वत ब्राम्हण पालेभाज्या, फळ, कडधान्ये यांच्यासोबत दुध, अंडी आणि मासेही खातात.
इस्लाम आणि मांसाहार
इस्लामची शिकवण मूलभूत मानवी स्वभावाशी सुसंगत आहे. त्याचा प्रत्येक आदेश आणि प्रत्येक नियम नैसर्गिक आहे. त्याच्या शिकवणीत कसलीच उणीव नाही. एखाद्याचे मुस्लिम असणे शाकाहार किंवा मांसाहारावर अवलंबून नाही. कुरआनने वा प्रेषित मुहम्मद [स.] यांनी कुठेही मुस्लिम असण्यासाठी मांसाहाराची अट निर्धारित केली नाही. मात्र इस्लामने मांसाहाराची परवानगी दिली आहे. भारतीय उपखंडातील धार्मिक वर्तुळात विशिष्ट विचारप्रणालीचा प्रभाव दिसून येतो. या विचारप्रणालीनुसार धार्मिक स्वभावाची ईशपरायण व्यक्ती मांसाहारी असूच शकत नाही. म्हणून आपल्या निदर्शनास आले असेल की, अनेक धार्मिक प्रवृत्तीचे लोक जेव्हा धर्माचरण करायला लागतात, तेव्हा मांसाहाराचा त्याग करतात. त्यांच्यानुसार मांसाहार करणे पाप आणि दुष्कर्म आहे, जे अजिबात धर्ममान्य नाही. प्रेषितांच्या काळातही काही लोकांची हीच द्विधा मनस्थिती होती. अशा लोकांना मार्गदर्शन देताना इस्लामने मांसाहाराचे पाप वा दुष्कर्म असण्याचे खंडन केले आहे. इस्लामने मांसाहाराची परवानगी दिली. इस्लामची ही परवानगी मानवाच्या स्वभावाशी सुसंगत आहे. इस्लामने मांसाहाराला निषिद्ध केले असते अथवा अपसंती दर्शविली असती तर इस्लाम निर्विवाद अनैसर्गिक धर्म ठरला असता. तसेच तो एकाच भागापुरता मर्यादित राहिला असता. इस्लामने मांसाहाराच्या सवलतीचा उल्लेख कुरआनात तीन ठिकाणी आढळतो,
हे इमानधारकांनो! आपल्या वचनांशी प्रामाणिक रहा. तुमच्यासाठी पुढे वर्णन केल्या जाणाऱ्या प्राण्यांव्यतिरिक्त [पाळीव] चतुष्पाद वैध आहेत.[4]
त्यानेच [निर्मात्याने] तुमच्यासाठी पशुधनाची निर्मिती केली. ज्यांच्यापासून तुम्ही वस्त्रे आणि इतर अनेक लाभ प्राप्त करता. काहींचा अन्न म्हणून वापर करता.[5]
पाळीव प्राण्यांत तुमच्या चिंतनासाठी आयत आहेत. आम्ही त्यांच्या पोटात जे काही आहे त्यापासून तुम्हाला [आरोग्यदायक] दुध पाजतो; आणि त्यांच्यात तुमच्यासाठी अनेक लाभ आहेत. तुम्ही त्यांना खाता देखील.[6]
वरील एकाही आयतीत मांसाहाराचा आदेश देण्यात आलेला दिसत नाही. मांस खा अन्यथा तुम्ही मुस्लिम नाही, असा आदेश देण्याचा तर प्रश्नच येत नाही. कुरआनची भूमिका केवळ इतकीच आहे की, अल्लाहने या पृथ्वीतलातील प्रत्येक वस्तू मानवाच्या लाभासाठी निर्माण केली आहे. पाळीव पशूदेखील त्याच श्रेणीतील आहेत. या पाळीव प्राण्यांपासून मानव अनेक लाभ प्राप्त करू शकतो. अन्न म्हणून प्राण्यांचा वापर त्याच लाभाचा एक भाग आहे.
हिंदू धर्म आणि मांसाहार
अनेक हिंदू बांधवांना हा गैरसमज आहे की, हिंदू धर्मात मांसाहाराची परवानगी नाही. म्हणून ते धार्मिक आचरण करताना मांस वर्ज्य समजतात. परंतु हिंदू धर्मग्रंथात मांसाहाराची परवानगीच नव्हे तर आदेशही देण्यात आलेला आहे. तसेच या धर्मग्रंथात अनेक ऋषी मुनींचा उल्लेख आहे, जे मांसाहार करीत असत. मनुस्मृती हिंदू धर्मग्रंथात विशेष स्थान राखते. मनुस्मृतीत मांसाहारासंबंधी आलेले खालील आदेश पहा.
पितरांच्या मासिक श्राद्धाला पंडित चांगल्याप्रकारे जाणतात. त्यांचा श्राद्धविधीत नेहमी उत्तम मांसाने करावे.[7] हे द्विजातीसाठी निःशेष भक्षाभक्ष्य सांगितले. यानंतर मांस भक्षण आणि त्याग यांचा विधी सांगतो.[8] मांस खाण्याची इच्छा ब्राम्हणाला झाली तर, त्याने यज्ञात प्रोक्षण विधीने शुद्ध करून खावे आणि प्राण रक्षणासाठी खावयाचे असेल तर, सामाजिक कायद्यानुसार खावे.[9] भक्षण योग्य असे भक्षण केल्याने खाणाऱ्याला दोष लागत नाही. कारण परमेश्वरानेच भोजन आणि भोजन करणारे या दोघांना उत्पन्न केले आहे.[10] यज्ञाच्या निमित्ताने मांस भक्षण करणे, देव विधी आहे.[11] रोजगारासाठी जो पशूंना मारतो, त्याला पाप लागत नाही.[12] मंत्राने ज्याचे संस्कार केलेले नाहीत, त्या पशूंना ब्राम्हणाने कधीही खाऊ नये आणि शाश्वत वेदाच्या विधीने यज्ञात संस्कारित केलेले भक्षण करावे.[13]
आयुर्देव अथर्ववेदाचा भाग आहे. आयुर्वेदाला हिंदू धर्माशी जोडून पाहिले जाते. आयुर्वेद मूळ भारतीय चिकीत्साशास्त्र आहे. आयुर्वेदाचा महान विद्वान चरकने त्याच्या संहितेमध्ये अनेक रोगांच्या उपचारासाठी मांसाहार करण्याचे सुचविले.[14] पद्मभूषण पुरस्कार विजेते भारतीय वैज्ञानिक पी. एम. भार्गव चरकसंहितेचा संदर्भ देऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, “वायू, नासिकादोष, अनियमित ताप, दीर्घकालीन कोरडा खोकला, थकवा आणि कठोर श्रमामुळे होणाऱ्या तीव्र अशा विकारांसाठी गाईचे मांस उपयुक्त औषधी आहे.” [15]
वाल्मिकीलिखित रामायण भारतीय संस्कृतीत महत्वाचा धर्मग्रंथ मानला जातो. या ग्रंथात एकूण आठ कांड आहेत. यापैकी प्रत्येक कांडात मांसाहाराचे भरपूर संदर्भ आढळतात. IIT कानपूर, के. एम. के. मूर्ती, मन्मथ नाथ दत्त, हरीप्रसाद शास्त्री आणि द्वारकाप्रसाद शर्मा यांनी त्यांच्या अनुवादात मांसाहाराचे संदर्भ अनुवादित केले आहेत. रामायणातील अशा संदर्भांची संख्या किमान १८ आहे, ज्यात रामायणातील प्रमुख पात्रांच्या मांसाहाराचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यापैकी शब्दशः मांस शब्दाचा प्रयोग करण्यात आलेले संदर्भ हे आहेत,
सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च।
यक्ष्ये त्वां प्रयता देवि पुरीं पुनरुपागता।।[16]
ऐणेयं मांसमाहृत्य शालां यक्ष्यामहे वयम्।
कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीविभिः।।[17]
इत्युक्त्वोपायनं गृह्य मत्स्यमांसमधूनि च।
अभिचक्राम भरतं निषादाधिपतिर्गुहः।।[18]
अस्ति मूलं फलञ्चैव निषादैस्समुपाहृतम्।
आर्द्रं च मांसं शुष्कं च वन्यं चोच्चावचं महत्।।[19]
विचित्राणि च माल्यानि पादपप्रच्युतानि च।
सुरादीनि च पेयानि मांसानि विविधानि च।।[20]
सुरास्सुरापाः पिबत पायसं च बुभुक्षिताः।।
मांसानि च सुमेध्यानि भक्ष्यन्तां यावदिच्छथ।।[21]
वाप्यो मैरेयपूर्णाश्च मृष्टमांसचयैर्वृताः।
प्रतप्तपिठरैश्चापि मार्गमायूरकौक्कुटैः।।[22]
तां तथा दर्शयित्वा तु मैथिलीं गिरिनिम्नगाम्।
निषसाद गिरिप्रस्थे सीतां मांसेन छन्दयन्।।[23]
निहत्य पृषतं चान्यं मांसमादाय राघवः।
त्वरमाणो जनस्थानं ससाराभिमुखस्तदा।।[24]
मांसानि च सुमृष्टानि फलानि विविधानि च।
रामास्याभ्यवहारार्थं किंकरास्तूर्तमाहरन्।।[25]
रामायणातून इतरही अनेक श्लोकांचा संदर्भ देता येतो, मात्र मी केवळ त्यांचा उल्लेख केला आहे, ज्यात शब्दशः मांस या शब्दाचा प्रयोग करण्यात आला आहे. या श्लोकांच्या अनुवादात मांसाहाराचा स्पष्ट उल्लेख आढळतो.
हिंदू धर्म विद्वान आणि मांसाहार
प्राचीन भारतीय संस्कृतीत मांसाहार, केवळ स्वीकार्यच नव्हता, तर तो धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग होता, असे प्रख्यात इतिहासकार प्रा. डी. एन. झा यांनी त्यांच्या ‘द मिथ ऑफ होली काऊ’ या ग्रंथात तपशीलवार मांडले आहे. वेद, उपनिषदे, पुराण आणि धर्मसूत्रांसारख्या ग्रंथांमधील असंख्य संदर्भांवर आधारित, झा यांनी युक्तिवाद केला आहे की, प्राचीन काळात गाय कधीच सर्वमान्य पवित्र प्राणी मानली गेली नाही. उदाहरणार्थ, तैत्तिरीय ब्राह्मणमध्ये “अथो अन्नं वै गौः” [गाय अन्न आहे] असा उल्लेख आहे, जो यज्ञांमध्ये गोमांसाच्या उपयोगाला वैधता देतो. आणि आपस्तंब धर्मसूत्र स्पष्ट करते की, श्राद्धविधींमध्ये गोमांसाने पितरांना वर्षभर तृप्ती मिळते, ज्यामुळे गोमांसाचा धार्मिक विधींमधील महत्त्वाचा वापर दिसून येतो. मनुस्मृती [५.३१-५.३६] यज्ञ आणि श्राद्धांसाठी मांसाहाराला परवानगी देते, जे प्राचीन भारतीय समाजातील मांसाहाराच्या व्यापक स्वीकाराचे द्योतक आहे.[26]
प्रसिद्ध हिंदुत्ववादी इतिहासकार आर. सी. मुजुमदार यांनीही त्यांच्या ‘भारतीय इतिहास आणि संस्कृती’ या ग्रंथात हिंदू धर्मग्रंथांचा आधार घेत मांसाहाराच्या प्राचीन परंपरेची चर्चा केली आहे. ते लिहितात की, राजा रतिदेव आपल्या राज्यातील जनतेला अन्नपुरवठा करण्यासाठी आणि स्वतःच्या आहारासाठी दररोज दोन हजार गायी आणि इतर प्राण्यांची कत्तल करायचे. हा उल्लेख महाभारत [द्रोण पर्व, ६१.२०-२५] मधील आहे, ज्यामुळे वैदिक आणि पौराणिक काळात मांसाहाराचे सामाजिक आणि राजकीय महत्त्व अधोरेखित होते. यावरून स्पष्ट होते की, मांसाहार केवळ वैयक्तिक आहारापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक व्यवस्थेचा आधारस्तंभ होता.[27]
या संदर्भात, स्वामी विवेकानंद यांचे मांसाहाराविषयीचे विचार वाचकांसाठी महत्वाचे ठरू शकतात. विवेकानंदांनी मांसाहाराला धार्मिक किंवा नैतिक दृष्टिकोनातून पाप मानले नाही, तर ते मानवी स्वभाव आणि सांस्कृतिक विविधतेचा स्वीकार करणारे व्यावहारिक दृष्टिकोन मांडतात. ते म्हणतात, “व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती मांसाहार किंवा शाकाहारावर अवलंबून नाही; प्रत्यक्षात, भारतातील अनेक संन्यासी मांसाहारी होते.” यामुळे मांसाहाराविषयीचा आधुनिक गैरसमज दूर होण्यास मदत होते. प्रस्तुत पुस्तिकेच्या शेवटी विवेकानंदांच्या मांसाहाराविषयीच्या विचारांचे एक स्वतंत्र परिशिष्ट जोडण्यात आले आहे, जे वाचकांना हिंदू धर्मातील मांसाहाराच्या ऐतिहासिक आणि तात्त्विक स्वीकाराचा सखोल आढावा देईल.
बौद्ध धर्म आणि मांसाहार
बौद्ध धर्म, जो अहिंसेच्या तत्त्वासाठी जगभर ओळखला जातो, मांसाहाराच्या बाबतीत संतुलित आणि व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारतो. बौद्ध धर्मग्रंथांमध्ये मांसाहार निषिद्ध असल्याचा कोणताही स्पष्ट आदेश नाही, ज्यामुळे मांसाहार हा वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भांवर अवलंबून आहे. बौद्धग्रंथ विनय पिटकनुसार, बौद्ध भिक्षुकांसाठी जीवहत्या निषिद्ध आहे, परंतु गृहस्थांनी भिक्षा म्हणून वाढलेले मांस खाण्यास बंदी नाही, त्रिविध नियम पाळावे इतकीच अट – मांस विशेषतः भिक्षूसाठी मारलेले नसावे, भिक्षूने ते मारलेले पाहिलेले नसावे, आणि त्याबाबत ऐकलेले नसावे. या नियमामुळे बौद्ध धर्म अहिंसेचा पुरस्कार करताना आहाराच्या बाबतीत लवचिकता दाखवतो. एका प्रसंगी, बुद्धांना भिक्षेदरम्यान वाढले गेलेले मांस त्यांनी आनंदाने आणि कृतज्ञतेने ग्रहण केले, ज्यामुळे मांसाहाराच्या स्वीकार्यतेचे उदाहरण समोर येते.[28]
बौद्ध धर्मातील मांसाहाराविषयीच्या या तटस्थ दृष्टिकोनाला आणखी बळकटी मिळते, जेव्हा बुद्धांनी शिष्य देवदत्त याच्या शाकाहाराची सक्ती करण्याच्या विनंतीला स्पष्ट नकार दिला. कुल्लवग्गमध्ये नमूद आहे की, देवदत्ताने भिक्षुकांसाठी शाकाहार अनिवार्य करण्याची मागणी केली, परंतु बुद्धांनी नाकारली, कारण असे करणे म्हणजे भिक्षूंच्या जीवनावर अनावश्यक बंधने लादणे आणि गृहस्थांच्या दानाच्या परंपरेला बाधा आणणे. बुद्धांचा हा निर्णय बौद्ध धर्माच्या मध्यम मार्गाच्या तत्त्वाशी सुसंगत आहे, जिथे अति शाकाहार किंवा मांसाहार यापेक्षा आहाराचे संतुलन आणि नैतिकता याला प्राधान्य दिले जाते. यामुळे बौद्ध धर्मात मांसाहार हा पाप किंवा अनैतिक कृत्य मानला जात नाही.[29]
ऐतिहासिक संदर्भातून, सम्राट अशोकचे उदाहरण बौद्ध धर्मातील मांसाहाराच्या स्वीकृतीला अधोरेखित करते. अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही मांसाहार चालू ठेवला होता, ज्याचा उल्लेख त्याच्या शिलालेखांमध्ये आहे. यावरून स्पष्ट होते की, बौद्ध धर्मात मांसाहार हा व्यक्तीच्या नैतिक आणि सामाजिक परिस्थितीवर अवलंबून आहे, आणि तो धर्माच्या मध्यवर्ती तत्त्वांशी विसंगत नाही.[30]
सारांश:
मांसाहार हे धार्मिक पाप आहे की मानवी स्वभावाशी सुसंगत आहारपद्धती? मांसाहार म्हणजे केवळ मांस नव्हे तर प्राणिज पदार्थांचा समावेश असलेल्या आहाराचा समावेश, तर शाकाहार म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थांचा आहार. इस्लाममध्ये कुरआन [सुरह मायदा ५:१, नहल १६:५, मुमिनून २३:२१] मांसाहाराला परवानगी देते, परंतु तो अनिवार्य नाही. मनुस्मृती [५.३१-५.३६] यज्ञ आणि श्राद्धासाठी मांसाहाराला परवानगी देते, रामायणात [अयोध्याकांड २.२०.२९] मांसाहाराचे १८ संदर्भ आहेत. बौद्ध धर्मात विनय पिटक, महावग्ग ६.३१ नुसार बुद्धांनी मांस ग्रहण केले, परंतु त्रिविध नियम पाळला. वैज्ञानिकदृष्ट्या, मांसाहार प्रथिने आणि व्हिटॅमिन B12 चा स्रोत आहे, आणि नैसर्गिक आहार प्राधान्यतेनुसार जगातील ८५% लोकसंख्या मांसाहारी आहे.
संदर्भ:
[1] https://en.oxforddictionaries.com/definition/non-vegetarian
[2] https://en.oxforddictionaries.com/definition/vegetarian
[3] https://www.vegsoc.org/definition
[4] कुरआन, सुरह माईदा, आयत १
[5] कुरआन, सुरह नहल, आयत ५
[6] कुरआन, सुरह मुमिनून, आयत २१
[7] मनुस्मृती, अध्याय ३, मंत्र १२३
[8] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र २५
[9] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र २७
[10] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र ३०
[11] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र ३१
[12] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र ३४
[13] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र ३६
[14] चरकसंहिता, पृ. ८६-८७
[15] https://timesofindia.indiatimes.com/india/Ayurveda-prescribes-beef-for-several-disorders-Scientist/articleshow/49743126.cms
[16] वाल्मिकी रामायण, अयोध्या कांड, सर्ग ५२, श्लोक ८९
[17] वाल्मिकी रामायण, अयोध्या कांड, सर्ग ५६, श्लोक २२
[18] वाल्मिकी रामायण, अयोध्या कांड, सर्ग ८४, श्लोक १०
[19] वाल्मिकी रामायण, अयोध्या कांड, सर्ग ८४, श्लोक १७
[20] वाल्मिकी रामायण, अयोध्या कांड, सर्ग ९१, श्लोक २१
[21] वाल्मिकी रामायण, अयोध्या कांड, सर्ग ९१, श्लोक ५३
[22] वाल्मिकी रामायण, अयोध्या कांड, सर्ग ९१, श्लोक ७१
[23] वाल्मिकी रामायण, अयोध्या कांड, सर्ग ९६, श्लोक १
[24] वाल्मिकी रामायण, अरण्य कांड, सर्ग ४४, श्लोक २७
[25] वाल्मिकी रामायण, उत्तर कांड, सर्ग ४२, श्लोक १९
[26] झा. डी. एन., मिथ ऑफ हॉली काऊ, पृ. ३०-३२
[27] मुजुमदार आर. सी., भारतीय इतिहास आणि संस्कृती, खंड २, पृ.५८७
[28] Dhammananda, K. Shiri., What Buddhist Believes, Pg. 215 | विनय पिटक, महावग्ग ६.३१.१२-१४
[29] Dhammananda, K. Shiri., What Buddhist Believes, Pg. 215 | कुल्लवग्ग ७.३.१४
[30] http://www.thehindu.com/2001/08/14/stories/13140833.htm