कुरआनातील आयतींचा संदर्भ [Reference to verses in the Qur’an]

आपल्या हेतूंच्या समर्थनार्थ कुरआनच्या आयतींना त्यांच्या मूळ संदर्भापासून वेगळे करून त्यांचा आपल्याला हवा तसा सोयीस्कर अन्वयार्थ करण्याचा प्रयत्न जगभर अनेकदा करण्यात आला आहे. असे प्रयत्न जवळजवळ प्रत्येक धर्म संहितेबद्दल होतच असतात. जगभरातील दहशतवादी संघटना त्यांच्या दुष्कृत्याच्या समर्थनार्थ धर्मग्रंथांचा संदर्भ देत असतात. दुसरीकडे जगातील बहुसंख्य धर्मविद्वान आणि अभ्यासक त्यांच्या या मांडणीचे खंडन करीत असतात. तसेच जगातील बहुसंख्य मुस्लिम समाज, त्याच्या व्यावहारिक आचरणातून दहशतवाद्यांकडून केली जाणारी धर्मग्रंथाची विकृत मांडणी नाकारत असतो. हेच तत्व खालील आयतीच्या बाबतीतही आहे. संदर्भ जाणून न घेता कुरआनच्या आयतींचा मनमानी अन्वयार्थ करण्याची पद्धती अतिरेकी आणि अविवेकी आहे. तरीही काही लोकांकडून हेतुपूर्वक किंवा त्यांच्या अल्पज्ञानामुळे कुर्बानी संदर्भात सुरह आले इमरान आणि सुरह हजच्या दोन आयतींचा दाखला दिला जातो. आयतींना त्यांच्या संदर्भापासून विभक्त करून त्यांचा चुकीचा अर्थ सांगून समाजाची दिशाभूल केली जाते. या प्रकरणात आपण त्या आयतींचा संदर्भ आणि त्यांचा वास्तविक अर्थ समजून घेणार आहोत.

प्रथमतः आपण सुरह आले इमरानची आयत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ती आयत अशी आहे,

इमानधारकांनो! जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रिय असणाऱ्या वस्तूंपैकी अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाही, तोपर्यंत तुम्ही निष्ठावंत होऊ शकत नाही. [खबरदार] तुम्ही जो काही खर्च करता, निश्चितपणे अल्लाह ते [सर्वकाही] जाणून आहे.[1]

या आयतीचा संबंध कुर्बानीशी जोडला जातो आणि त्याचा उद्देश केवळ ‘खर्च’ करण्यापर्यंत मर्यादित केला जातो. वास्तविकतः स्थळकाळ परिस्थिती संदर्भ पाहता, या आयतीचा कुर्बानीशी अंशमात्रही संबंध नाही. आयतीत खर्च करण्याचा स्पष्ट उल्लेख असताना याचा संबंध कुर्बानीशी जोडणे म्हणजे तारेवरची कसरत आहे, ज्याची काही गरज नाही. तरीही शंकेचे निरसन करण्यासाठी आपण कुरआन भाष्य परंपरेत प्रस्तुत आयतीची करण्यात आलेली चर्चा पाहूयात.

प्रेषितांचे सहकारी इब्न अब्बास यासंदर्भात भाष्य करताना म्हणतात, अल्लाह मुस्लिमांना आपली संपत्ती अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यास प्रोत्साहित करत आहे. जोपर्यंत तुम्ही अल्लाहच्या मार्गात तुमची प्रिय वस्तू खर्च करत नाही, तोपर्यंत तुम्हाला अल्लाहच्या दृष्टीने प्रतिफळ आणि स्वर्ग मिळू शकणार नाही. त्याशिवाय इमान आणि धार्मिकता प्राप्त होऊ शकत नाही.[2] या आयतीचे भाष्य करताना इब्ने अब्बास कोठेही कुर्बानीचा संदर्भ देत नाहीत. उलट सामान्य परिस्थितीतील दानधर्माची चर्चा करतात.

कुरआनचे दुसरे महत्वाचे भाष्यकार असणाऱ्या इब्न कसीर यांनी या आयतीच्या भाष्यात प्रेषितांच्या सहकाऱ्यांचे अनेक प्रसंग नोंदवले आहेत, ज्यांनी या आयतींच्या अवतरणानंतर त्यांच्याकडे असणारी आणि त्यांना प्रिय असणारी बहुमूल्य साधनसंपत्ती अल्लाहच्या मार्गात खर्च करून टाकली. यापैकी एकही प्रसंग ईदचा अथवा कुर्बानीचा संदर्भ देत नाही.[3] मौलाना आझाद यासंदर्भात भाष्य करताना इब्न कसीर यांच्याप्रमाणे प्रेषितांच्या विविध सहकाऱ्यांच्या दानाच्या प्रसंगांचा संदर्भ देतात. यासाठी बहुतकरून पारंपरिक भाष्यांचाच आधार घेतात.[4]

कुरआनची कोणतीही व कितीही भाष्ये चाळली तरी त्यापैकी एकाही भाष्यात या आयतीचा संबंध कुर्बानीशी जोडण्यात आल्याचे आढळत नाही. कुरआनच्या सर्व भाष्यकारांनी या आयतीला अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याचा सामान्य नियम, याच दृष्टीकोनातून पाहिले आहे. म्हणून या आयतीचा संबंध कुर्बानीशी जोडण्यास कसलाच आधार उपलब्ध नाही. यानंतर आता आपण दुसरी आयत पाहूयात.

मागील तीन दशकात जगभरातून इस्लाम आणि मुस्लिमांवर हल्ल्याच्या व्यापक कटाचा भाग म्हणून कुर्बानीला विरोध करण्यात आला. याची सुरुवात पाश्चात्य जगात इस्लामद्वेषी विचारवंतांकडून झाली. मात्र त्याला चोख प्रतीउत्तर देण्यात आल्याने हा मुद्दा मागे पडला. पाश्चात्य जगतात वैचारिक चर्चेतून बाद झालेला हा विषय ९० च्या दशकात देशातील मुस्लिम द्वेष्ट्यांनी उचलून धरला. देशी शाकाहार समर्थक संघटनांनी त्यांच्या पत्रकातून कुरआनच्या २२:३७ चा संदर्भ देऊन मुस्लिमांना घेरण्याचा प्रयत्न सुरु केला. २२:३७ ला तिच्या संदर्भापासून दूर करून केली जाणारी मांडणी मुस्लिम विद्वान व अभ्यासकांनी खोडून काढली आहे. तसेच मुस्लिम समाजाने त्यांच्या आचरणाद्वारे नाकारली आहे. यासाठीच कुरआनच्या आयतींचा योग्य संदर्भ जाणून घेणे महत्वाचे ठरते. आपण या प्रकरणात कुरआनच्या २२:३७ या आयतीबद्दल कुरआनच्या विविध भाष्यकारांनी केलेले भाष्य पाहणार आहोत.

प्रेषितांचे सहकारी इब्न अब्बास कुरआनचे आद्य भाष्यकार होते. कुरआनच्या भाष्यासंदर्भात त्यांचे भाष्य प्रमाण मानले जाते. ते म्हणतात, अज्ञानयुगात लोक त्यांनी कुर्बान केलेल्या प्राण्याचे मांस काबागृहाच्या भिंतींजवळ सोडून येत असत आणि त्या भिंतींना प्राण्यांचे रक्त लावत असत. अल्लाहने त्यांना असे करण्यापासून रोखले आहे. ही आयत या संदर्भात अवतरीत झाली आहे.[5]

कुरआनचे महान भाष्यकार इब्न कसीर उपरोक्त आयतीबद्दल भाष्य करताना म्हणतात की, अज्ञानयुगात कुर्बान केलेल्या प्राण्याचे मांस त्यांच्या मूर्तीसमोर ठेवायची आणि मूर्त्यांवर रक्त शिंपडायची प्रथा होती. प्रेषितांच्या सहकाऱ्यांनी जेव्हा इस्लामचा स्वीकार केला, तेव्हा त्यांनी काबागृहावर कुर्बानीच्या जनावराचे रक्त शिंपडण्याबद्दल प्रेषितांकडे चौकशी केली. त्यासंदर्भात ही आयत अवतरली. इब्न कसीर पुढे कुर्बानीच्या संदर्भातील काही हदीसचा संदर्भ देऊन म्हणतात, कुर्बानीच्या प्राण्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडण्यापूर्वी तुमची निष्ठा अल्लाहपर्यंत पोहोचते. याचा अर्थ रक्ताचा एक थेंब वेगळा होताच कुर्बानी अल्लाहकडे स्वीकृती प्राप्त करते.[6]

मौलाना मौदुदी म्हणतात, अज्ञानयुगात अरब लोक जसे कुर्बानीचे मांस मूर्त्यांना अर्पण करत असत, तसेच ते अल्लाहलाही अर्पण करीत. त्यासाठी कुर्बानी केलेल्या प्राण्याचे मांस व रक्त काबागृहाच्या भिंतीला लावत. त्यांच्यामते कुर्बानी ही यासाठीच केली जात असे की, त्याद्वारे प्राण्याचे मांस आणि रक्ताला अल्लाहसमोर सादर करता यावे. अल्लाहने या आयतीत त्यांच्या या अज्ञानाचे खंडन केले आहे.[7]

मौलाना अब्दुल मजीद दर्याबादी उपरोक्त संदर्भांचा उल्लेख केल्यानंतर पुढे म्हणतात, ज्यू आणि ख्रिस्त्यांनी यज्ञ म्हणजे प्राण्यांचे रक्‍त सांडणे, हे प्रायश्‍चित्ताचे साधन मानले. तसेच बॅबिलोनवासींचा विश्वास होता की, देवांची मेजवानी आकाशात होते. त्यांच्या नावाने जे अर्पण केले जाते, ते त्याचा वास घेतात आणि खातात. कुर्बानी यासाठी नाही. [म्हणजे या आयतीत अशा विचारधारेचे खंडन आहे.][8]

वरील विवेचनाबाबत समस्त कुरआन भाष्यकारांचे एकमत आहे. आयतीच्या भाष्याचे अनेक संदर्भ देता येतात. मात्र सर्वांनी एकाच गोष्टीचा पुनरुच्चार केल्यामुळे जास्तीचे संदर्भ देणे टाळले आहे. तसेच आयत ३७ स्वतंत्र आयत नसुन आयत ३४-३७ चा भाग आहे. म्हणून आयत समजून घेण्यासाठी ३४ ते ३७ पर्यंतचे वाचन महत्वाचे आहे. या चार आयतींचा अनुवाद असा आहे,

३४ आम्ही समस्त जनसमुहांसाठी कुर्बानी निर्धारित केली आहे, जेणेकरून त्यांनी आम्ही प्रदान केलेल्या खाण्यायोग्य चतुष्पाद प्राण्यांपैकी कुर्बानी देताना अल्लाहचे नामस्मरण करावे. [लक्षात ठेवा] तुमचा पूजनीय एकमात्र पूजनीय आहे, तुम्ही त्यालाच समर्पित राहा आणि विनम्रतापूर्वक वागणाऱ्यांना शुभवार्ता द्या. ३५ [विनयशील ते आहेत] ज्यांची अंतःकरणे अल्लाहचा उल्लेख ऐकताच थरथरतात, कठीण प्रसंगी धैर्य-संयमाचे प्रदर्शन करतात, नमाज कायम करतात आणि जी उपजीविका आम्ही त्यांना दिली आहे, त्यातून खर्च करतात. ३६ [तेव्हा हे विनयशील लोकहो] कुर्बान केल्या जाणाऱ्या उंटांना आम्ही अल्लाहच्या प्रतीकांपैकी निर्धारित केले आहे. त्यामध्ये तुमचे हित आहे. कुर्बानीसाठी त्यांना रांगेत उभे करून अल्लाहचे नाव उच्चारा. ते आपल्या कुशीवर खाली पडल्यानंतर त्यातून तुम्हीही खा; मागणाऱ्यांना आणि गरजवंतांनाही द्या. अशाप्रकारे आम्ही प्राण्यांना तुमच्या अधीन केले जेणेकरून तुम्ही कृतज्ञ असावे. ३७ [मात्र असे करताना लक्षात ठेवा] अल्लाहपर्यंत त्यांचे मांस पोहोचते ना त्यांचे रक्त; पोहोचते मात्र तुमची परायणता. अशाप्रकारे त्याने त्या प्राण्यांना तुमच्या स्वाधीन केले आहे, जेणेकरून त्याने प्रदान केलेल्या मार्गदर्शनावर तुम्ही त्याचा महिमा वर्णन करावा आणि हे प्रेषित [मुहम्मद स] शुभवार्ता द्या, [अशी] परिणत अवस्था प्राप्त करणाऱ्यांना.[9]

या आयतींचे वाचन त्यांच्या संदर्भासह केले असता, यातून कसलाही गैरसमज निर्माण होत नाही. तसेच मनमानी अन्वयार्थ करण्याची संधी मिळत नाही. कुरआनचा या आयतीतील आदेश अगदी स्पष्ट आहे की, उपासना पद्धतींचे निर्धारण अल्लाहकडून करण्यात आले आहे आणि कुर्बानी निर्धारित उपासना पद्धतींपैकी आहे. कुर्बानीसाठी अल्लाहने पशुही निर्धारित केले आहेत. तेव्हा त्या चतुष्पाद पशुंवर अल्लाहच्या नावाचा उच्चार करून त्यांची कुर्बानी करणे इमानधारकांसाठी अनिवार्य आहे. कुर्बानी केल्यावर त्या पशुंचे मांस आणि रक्त, यापैकी काहीही अल्लाहसाठी नाही. त्यांनी ते मांस स्वतः खावे आणि इतरांनाही द्यावे. विशेषतः गरजवंत, उपेक्षित आणि वंचित घटकांचा जरूर विचार करावा. तसेच अल्लाहने मानवाला उपासनेच्या ज्या पद्धती शिकविल्या आहेत, त्याबद्दल अल्लाहचा महिमा वर्ण करावा. या आयतीतील संदेश इतका स्पष्ट असताना या आयतीला त्याच्या संदर्भापासून वेगळे करून त्याचा मनमानी अर्थ काढणारी व्यक्ती आणि संघटना यांचा हेतू अजिबात निष्कपट नाही, हे सिद्ध होते.

प्रेषितांच्या जीवनातून कुर्बानीचे प्रमाण

अल्लाहने त्याचा अंतिम संदेश प्रेषित मुहम्मद [स.] यांच्यावर अवतरीत केला. ते अल्लाहच्या संदेशाचे ईशनियुक्त भाष्यकार होते. त्यांचे जीवन चालतेबोलते कुरआन होते. कुरआनच्या आदेश आणि उपदेशांचे ते व्यावहारिक जीवनातील सर्वोत्तम आदर्श होते. अल्लाहच्या प्रेषितांनी या आयतींनुसार केलेले आचरण मुस्लिमांसाठी सर्वोत्तम आदर्श आहे. प्रेषितांनी या आयतींच्या अवतरणानंतर कुर्बानीचा त्याग केला असेल तर मुस्लिमांनीही तसेच करायला हवे. मात्र प्रेषितांनी कुर्बानीचा त्याग केला नव्हता, उलट आपल्या सहकाऱ्यांना कुर्बानीचे आदेश दिले होते. उपरोक्त आयतींच्या अवतरणानंतर अल्लाहच्या प्रेषितांना दहा वर्षांचे आयुष्य लाभले आणि या दहा वर्षात त्यांनी दरवर्षी कुर्बानी केल्याचे अनेक स्पष्ट संदर्भ प्रेषितांच्या जीवन चरित्रात आणि हदीस साहित्यात आढळतात. त्यापैकी काही संदर्भ येथे देण्यात आले आहेत.

प्रेषितांनी कुर्बानी केल्याची साक्ष त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद [स.] ईदगाहच्या ठिकाणी कुर्बानी करीत असत.[10] अल्लाहचे प्रेषित मुहम्मद [स.] एक नव्हे, दोन मेंढ्यांची कुर्बानी करीत असत.[11] ईदच्या नमाजनंतर सर्वांना तातडीने कुर्बानी करता यावी, म्हणून कुर्बानीची व्यवस्था ईदगाह जवळ केलेली असायची. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद [स.] ईदगाहच्या ठिकाणी प्राण्यांची कुर्बानी करीत असत.[12] अजहाबद्दल आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून अल्लाहचे प्रेषित मुहम्मद म्हणाले, ईद उल अजहा कुर्बानीचा दिवस आहे.[13] तसेच ते हे देखील म्हणाले, आर्थिकदृष्ट्या समर्थ असूनही जो कुर्बानी करीत नाही, त्याने आमच्या ईदगाहजवळ येऊ नये.[14]

इस्लामी धर्मवेत्त्यांच्या दृष्टीकोनातून कुर्बानीचे महत्व

चार प्रमुख इमामांपैकी पहिले अबू हनिफा यांनी कुर्बानीकडे अनिवार्य उपासना म्हणून पहिले आहे.[15] हाच युक्तिवाद १० व्या शतकातील इब्न हजम यांचा आहे.[16] ८ व्या शतकातील महान धर्मशास्त्री इमाम मालिक यांच्या मते, प्रेषितांच्या आदर्शानुसार जीवन जगण्याचा भाग म्हणून कुर्बानी अत्याधिक महत्वाची आहे.[17] याच काळातील दुसरे महत्वाचे कायदेशास्त्री इमाम शाफई यांनी कुर्बानीला कृतज्ञता आणि समर्पणाची अभिव्यक्ती मानले आहे.[18]

११ व्या शतकातील इमाम गजाली, एक अत्यंत प्रभावशाली इस्लामी धर्मशास्त्री आणि तत्त्वज्ञ होते. ते कुर्बानीला एक महत्त्वपूर्ण उपासना मानत. त्यांचा असा विश्वास होता की, प्राण्यांची कुर्बानी देण्याची विधी प्रेषित इब्राहीम [अलै.] यांनी अल्लाहच्या आज्ञेनुसार आपला मुलगा इस्माईल यांची कुर्बानी करण्याच्या प्रयत्नाचे स्मरण म्हणून कार्य करते. इमाम गझालींच्या मते, कुर्बानीची कृती अल्लाहला समर्पण दर्शवते आणि निःस्वार्थ भक्तीभावाचे उदाहरण प्रतिबिंबित करते.[19] १३ व्या शतकातील इमाम नववी यांच्या मते कुर्बानी अल्लाहशी जवळीक साधण्याचे माध्यम आहे.[20] इमाम इब्न तैमिया इमाम गजाली यांच्या नंतरचे महत्वाचे धर्मशास्त्री आणि तत्वज्ञ मानले जातात. त्यांच्या मते कुर्बानी समर्पण आणि कृतज्ञता यांचा सुवर्ण मिलाफ आहे.[21]

आधुनिक विद्वानांच्या दृष्टीकोनातून कुर्बानीचे महत्व

आधुनिक काळातील विद्वानांमध्ये जामिया अजहर विद्यापीठ इजिप्तचे सर्वोच्च मुफ्ती युसुफ अल करजावी, प्रमुख इस्लामी विद्वान मानले गेले आहेत, ज्यांना इस्लामी न्यायशास्त्राच्या सर्वसमावेशक आकलनासाठी ओळखले जाते. ते ईद उल अजहाच्या दिवशी प्राण्याची कुर्बानी देण्याची कृती एक अत्यंत प्रोत्साहनकारक परंपरा असल्याचे मानतात. करजावी यांच्या मते, कुर्बानी कृतज्ञता व्यक्त करण्याचे व प्रेषित इब्राहीम यांच्या सुन्नाहची पूर्तता करण्याचे साधन आहे.[22] जस्टीस मुफ्ती तकी उस्मानी भारतीय उपखंडातील महत्वाचे इस्लामी विद्वान आणि न्यायशास्त्री आहेत. ईद उल अजहाच्या दिवशी प्राण्याची कुर्बानी देण्याची कृती ही प्रोत्साहनकारक प्रथा आहे, यावर ते भर देतात. जस्टीस मुफ्ती तकी उस्मानींच्या मते, कुर्बानी अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी कुर्बान होण्याच्या इच्छेचे प्रमाण आहे आणि कृतज्ञता दर्शविण्याचे साधन आहे.[23] शेख हमजा युसूफ प्रसिद्ध अमेरिकन इस्लामी विद्वान आणि झैतुना कॉलेजचे सह संस्थापक आहेत. ईद उल अजहाच्या दिवशी प्राण्यांची कुर्बानी देण्याच्या कृतीला अत्यंत प्रोत्साहनकारक सुन्नत मानतात. हमजा युसूफ कुर्बानी करताना प्रामाणिकपणा आणि त्यामागील हेतूचे महत्त्व अधोरेखित करतात.[24] डॉ. तारिक रमदान हे पाश्चात्य ज्ञानविश्वातील महत्वाचे इस्लाम अभ्यासक आणि लेखक आहेत. अल्लाहच्या आज्ञाधारकतेचे आणि सांसारिक आसक्ती सोडण्याच्या इच्छेचे प्रमाण धार्मिक कर्तव्य म्हणून ते ईदुल अजहाच्या दिवशी कुर्बानीच्या कृतीच्या महत्त्वावर जोर देतात.[25]

संदर्भ:

[1] कुरआन, सुरह आले इमरान, आयत ९२

[2] मो. सईद अहमद, तफ्सीर इब्न अब्बास, तफ्सीर हाज़ा

[3] इमाम इब्न कसीर, तफ्सीर सुरह आले इमरान

[4] मौलाना आझाद, तर्जुमान उल कुरआन, तफ्सीर सुरह आले इमरान

[5] मो. सईद अहमद, तफ्सीर इब्न अब्बास, तफ्सीर हाज़ा

[6] इमाम इब्न कसीर, तफ्सीर सुरह हज

[7] मौलाना मौदुदी, तफ्हीम उल कुरआन

[8] मौलाना अब्दुल मजीद, तफ्सीर उल कुरआन

[9] कुरआन, सुरह हज, आयत ३४-३७

[10] मिश्कात अल मसाबिह, १४३८

[11] इमाम नसाई, किताबुज अजहाया, ४३८५

[12] इमाम बुखारी, किताबुल इदैन, ९८२

[13] इमाम तीर्मिजी, अल जामेअ, ७७२

[14] इमाम इब्ने माजाह, सुनन, ३१२३

[15] इब्न रुश्द, बिदायतुल मुज्तहीद, खंड १, पृ. ५१६

[16] इब्न हजम, अल मुहल्ला, खंड ६, पृ. ३७

[17] इमाम मालिक, अल मुदव्वनाह अल कुबरा

[18] इमाम शाफई, अल उम्म

[19] इमाम गजाली, अहया उलुम अल दीन

[20] इमाम नववी, मज्मूआ अल शरह अल मुहज्जब

[21] तैमिया, मज्मूआ अल फतावा

[22] युसुफ अल करजावी, अल हलाल वल हराम फिल इस्लाम

[23] मुफ्ती तकी उस्मानी, फिक उल इबादाह

[24] हमजा युसुफ, Speeches and Writings

[25] तारिक रमदान, द मेसेंजर: द मीनिंग्ज ऑफ द लाइफ ऑफ मुहम्मद

Leave a Comment