कुर्बानी – तत्वज्ञान आणि उद्देश [Qurbani – Philosophy and Purpose]

मानवाच्या आपल्या पालनकर्त्याप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी, धर्माने ठरवून दिलेल्या पद्धती म्हणजे ‘उपासना’ होय. इस्लाममध्ये अनुयायांसाठी काही उपासना पद्धती निर्धारित करण्यात आल्या आहेत. अर्थात त्यांचे निर्धारण अल्लाहतर्फे केले गेले आहे. त्या उपासना पद्धती कोणत्या? नमाज, रोजा, जकात आणि हज या चार उपासना अल्लाहतर्फे निर्धारित करण्यात आल्या आहेत. या उपासनांमागे काही उद्देश आहेत. उपासना कधीच उद्देशहीन नसते. नमाजचा उद्देश अल्लाहप्रति कृतज्ञता व्यक्त करणे आणि अल्लाहशी जवळीक साधणे हा आहे. दिवसांतून पाच वेळेस नमाजच्या माध्यमातून प्रत्येक मुस्लिम व्यक्ती कृतज्ञतेद्वारे अल्लाहशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असते. मानवाला आपल्या इच्छा – आकांक्षांना नियंत्रित करण्याचे प्रशिक्षण देणे, हा रोजांचा उद्देश आहे. नीतिमान आणि न्यायाच्या मर्यादेत जीवन जगण्याची मानसिकता रोजांद्वारे निर्माण केली जाते. मानवाच्या मनात समाजातील उपेक्षितांबद्दल कळवळा निर्माण व्हावा, सुख आणि चैनीचे जीवन जगणाऱ्यांनी रंजल्या गांजल्यांप्रती उदारभाव दाखवावा, जेणेकरून त्यांनी भौतिकवादी बनू नये, हा जकातचा उद्देश आहे. भौतिकतेच्या पलीकडील सत्याला पाहण्याचा दृष्टीकोन मिळावा, यासाठी मानवाला निस्वार्थी आणि समर्पित जीवनाची प्रेरणा देणे, हा हजचा उद्देश आहे.

वरील उद्देश साध्य करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. अल्लाहची जवळीक इतर मार्गांनीही साधली जाऊ शकते. आपल्या इच्छा – आकांक्षांना नियंत्रित करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. वचितांबद्दल उदारभाव निर्माण करण्याच्या इतर पद्धती असू शकतात. नि:स्वार्थी जीवन जगण्यासाठी दुसरे मार्गही आहेत. जर मानवाला याबाबत स्वातंत्र्य दिले गेले असते तर, त्याने विविध मार्गांचा शोध घेतला असता आणि विविध मार्गांनुसार आचरणही केले असते. परंतु कोणत्याच मार्गावर त्याचे मतैक्य झाले नसते. मानवाला सन्मार्ग दाखविणारे मार्ग वादाचे विषय ठरले असते. म्हणून वैश्विक मुस्लिम समाजात एकवाक्यता राहावी, यासाठी अल्लाहने वरील चारही मार्ग स्वतः निर्धारित करून दिले. वरील मार्गांना निर्धारित करण्याचा एक अर्थ असा देखील आहे की, या उद्देशांच्या प्राप्तीकरिता उल्लेखित चार मार्गांपेक्षा प्रभावी, परिणामकारक आणि उत्तम मार्ग दुसरे नाहीत. पालनकर्त्याची भक्ती-आराधना-उपासना करण्याचे हे सर्वोत्तम मार्ग आहेत. अध्यात्माला लाभलेले सुंदर सामाजिक अंग, उद्दात्त हेतू आणि उच्च उद्देश! या उपासनेत नवसाला जागा नाही की दर्शनाला स्थान नाही. एखादी वस्तू उपासनागृहात अर्पण करण्याचे आदेश नाहीत, कसले कर्मकांड नाहीत की धर्मविधींचे अवडंबर नाही.

उपासनांचे स्वरूप बदलले जाऊ शकते का?

या उपासनांपैकी एक आहे कुर्बानी. कुर्बानी मानवी विचारातून उपजलेली प्रथा नसून अल्लाहकडून निर्धारित करण्यात आलेली उपासना पद्धती आहे. कुर्बानी हजचा भाग आहे. हजयात्रेस असमर्थ असणाऱ्यांकरिता कुर्बानीला व्यापक रूप देण्यात आले आहे. अल्लाहतर्फे निर्धारित करण्यात आलेल्या उपासना धर्मशास्त्रात विहित करण्यात आल्याप्रमाणे करणे गरजेचे आहे. यात कोणताही बदल करता येत नाही. नमाज अदा करण्याचा उद्देश अल्लाहची जवळीक साधणे आहे. नमाजचे निर्धारण स्वतः अल्लाहने केले आहे. यासाठी नमाजला इतर कोणत्याही कृतीशी बदलता येणार नाही. याप्रमाणे रोजा आपल्या इच्छाआकांक्षा अल्लाहला समर्पित करण्याचा मार्ग आहे. म्हणून इच्छा-आकांक्षा समर्पित करण्यासाठी रोजाऐवजी दुसरा मार्ग चोखाळला जाऊ शकत नाही. इतर कोणत्याही मार्गासाठी रोजा टाळता येत नाही किंवा त्याला इतर कर्माशी बदलता येत नाही. अगदी असेच जकात, हज आणि कुर्बानीबाबत आहे.

काही जणांचा विचार आहे की, या रूढी परंपरांमध्ये कालानुरूप बदल व्हायला हवेत. कोणत्याही उपासनेसंदर्भात हा विचार गैरलागू आहे. कारण कोणतीही उपासना निव्वळ परंपरा नसून ईशनिर्धारित पद्धती आहे. कोणत्याही उपासना पद्धतीकडे केवळ सामाजिक दृष्टीकोनातून पाहता येत नाही. त्याचा सामाजिक पैलू जितका महत्वाचा असतो, तितकाच किंबहुना त्याहून जास्त अध्यात्मिक पैलू महत्वाचा आहे. उपासनेच्या सामाजिक पैलूचा प्रभाव ठराविक काळासाठी मानवी हिताचा ठरू शकतो, मात्र त्याचा अध्यात्मिक पैलू मानवी समाजासाठी दीर्घकालीन लाभाचा स्रोत असतो. कुर्बानीचा अध्यात्मिक पैलू सत्यासाठी वेळप्रसंगी आपल्या प्राणांची कुर्बानी देण्याच्या व्यावहारिक साक्ष देण्याकडे लक्ष केंद्रित करतो. ही साक्ष प्राण्याच्या कुर्बानीद्वारे दिली जाते.

कुर्बानीची चर्चा

कुर्बानी अल्लाहतर्फे निर्धारित करण्यात आलेली उपासना पद्धती आहे, ज्याचा उल्लेख इतर उपासनांप्रमाणेच करण्यात आला आहे. कुरआनमध्ये यासंदर्भात आलेला उल्लेख असा आहे, तुझ्या पालनकर्त्यासाठी नमाज आणि कुर्बानी कर.[1]

सांगा! माझी नमाज, माझी कुर्बानी, माझे जीवन, माझे मरण केवळ जगाच्या पोशिंद्या अल्लाहसाठीच आहे.[2]

कुरआनच्या वरील आयतींमध्ये कुर्बानीचा उल्लेख सर्वात महत्वाची उपासना – नमाजसोबत करण्यात आला आहे. जगातील प्रत्येक जनसमुहासाठी अल्लाहतर्फे त्याग आणि बलिदानाच्या भावनेचा पुरावा म्हणून कुर्बानीच निर्धारित करण्यात आली होती. ज्याचा उल्लेख कुरआनमध्ये अशाप्रकारे करण्यात आला आहे.

आम्ही समस्त जनसमुहांसाठी कुर्बानी निर्धारित केली आहे, जेणेकरून त्यांनी आम्ही प्रदान केलेल्या खाण्यायोग्य चतुष्पाद प्राण्यांपैकी कुर्बानी देताना अल्लाहचे नामस्मरण करावे. [लक्षात ठेवा] तुमचा पूजनीय एकमात्र पूजनीय आहे, तुम्ही त्यालाच समर्पित राहा आणि विनम्रतापूर्वक वागणाऱ्यांना शुभवार्ता द्या.[3]

कुर्बानी प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या काळापासून चालू आहे. कुर्बानीचा संबंध केवळ मुस्लिमांशी नाही. जगातील प्रत्येक जनसमूहात याचे संदर्भ सापडतात. एकमात्र अल्लाहचे ईशत्व मान्य करणे, स्वतःला त्याच्या समोर पूर्णतः समर्पित करणे, स्वतःला अत्यंत विनयशील बनविणे आणि प्रसंगी प्राणांचे बलिदान देण्यासाठी सज्ज असणे; हा कुर्बानीचा मूळ आत्मा आहे. एखाद्या प्राण्याला जमिनीवर पाडणे वास्तविकतः स्वतःला अल्लाहसमोर पाडणे आहे. प्राण्याच्या गळ्यावरून सूरा फिरवणे, वास्तविकतः प्रसंगी आपल्या प्राणाच्या बलिदानाचे प्रशिक्षण आहे. कुर्बानी समर्पणाच्या भावनेचा परमोच्च बिंदू आहे. कुर्बानी, आम्ही सत्यासाठी आमच्या स्वतःच्या जीवाची कुर्बानी देण्यातही संकोच करणार नाही, या गोष्टीची साक्ष आहे.

स्वतःला प्रिय असलेल्या वस्तूची कुर्बानी करणे

काही लोकांचा असा गैरसमज आहे की, सर्वाधिक प्रिय वस्तूची कुर्बानी करावी लागते. स्वतःला सर्वाधिक प्रिय असणारी वस्तू दान करणे, हा सामान्य नियम आहे. जो प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी आयुष्यभर लागू आहे. या नियमाचा कुर्बानीशी कसलाच संबंध नाही. याची चर्चा आपण पुढील प्रकरणात स्वतंत्रपणे करणार आहोत. परंतु जर एखादी व्यक्ती या नियमाला संदर्भातून काढून कुर्बानीशी जोडत असेल तर तिने विचार करावा, मानवाला प्राणाहून प्रिय काय असू शकते? माणसाला पैसा सर्वाधिक प्रिय आहे, असे काहींचे म्हणणे आहे. मात्र प्रस्तुत विधान निराधार आहे. स्वतःच्या प्राणाहून पैश्याला जास्त किंमत देणारा दुर्भागी कधीच भेटणार नाही. प्राणासाठी शक्य तितके पैसे मोजण्याची तयारी असणारे मात्र अनेक भेटतील. म्हणून दानधर्म केल्याने कुर्बानी होणार नाही. गरजूंना आर्थिक सहाय्य करण्यासाठी इस्लामने जकात, सदका, फित्रा, खैरात, अतियात, हिबा आणि वक्फ करण्याचे स्वतंत्र आदेश दिलेच आहेत. जगभरात मुस्लिम समाजाइतका अत्याधिक दानधर्म करणारा समाज शोधूनही सापडत नाही. तसेच दानधर्म करण्यासाठी इस्लाममध्ये स्वतंत्रपणे तरतूद करण्यात आली असताना, त्यासाठी कुर्बानीचा बळी देण्याची काहीच गरज नाही.

प्रेषित इब्राहीम [अलै.] यांनी आयुष्यभर सत्याच्या प्रचारासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली. मृत्युदंडाची शिक्षा हसतमुखाने स्वीकारली. जन्मभूमीचा त्याग केला. पत्नी आणि मुलाला निर्जनस्थळी मक्केत सोडून आले. जेव्हा त्यांना परीक्षा स्वरूप आपल्या एकुलत्या मुलाची कुर्बानी करण्याचा आदेश देण्यात आला, तेव्हा त्यांनी कसलाही संकोच न बाळगता कुर्बानी करण्यास होकार दिला. इस्माईल त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्राणाहून प्रिय होता. मात्र ते क्षणाचाही विलंब न करता त्याच्या बलिदानास तयार झाले. त्यांनी सत्याप्रती समर्पणाचा परमोच्च बिंदू गाठल्याचा हा पुरावाच नव्हे तर काय आहे की, ते आपल्या पोटच्या गोळ्याची कुर्बानी करण्यासाठी तयार झाले. याच बलिदानाच्या मानसिकतेचा व्यावहारिक पुरावा म्हणजे कुर्बानी होय.

अल्लाहतर्फे निर्धारित विधी

बलिदानाची भावना जागृत करण्याचा उदात्त हेतू व उद्देश कुर्बानीमागे कार्यरत आहे. कुर्बानीला अल्लाहने ‘शआईरिल्लाह’ म्हणजे अल्लाहने निर्धारित केलेले प्रतीक म्हणाले आहे. हे प्रतीक कोण निर्धारित केले आहे? जगातील समस्त मुस्लिमांनी एकत्र येऊन स्वतः निर्धारित केलेले नाही. त्याग आणि बलिदानाच्या भावनेची, कृतीद्वारे साक्ष देण्यासाठी अल्लाहकडून याचे निर्धारण करण्यात आले आहे. इस्लामची सारी इमारत त्याच्या प्रतीकांवर उभी आहे. या प्रतीकांना विरोध करणारे मुळात इस्लामचे शत्रू किंवा प्रचंड अज्ञानी आहेत. प्रतीकांचा आदर केल्याने आणि त्यासंबंधी निर्धारित शिष्टाचार पार पाडल्याने अल्लाहप्रती असलेला समर्पणभाव सदैव जिवंत राहतो. जसे, स्वातंत्र्य दिनी सलामी देताना कोण म्हणेल की, राष्ट्रध्वज सामान्य कापडाचा शिवलेला तुकडा आहे. निःसंशय, तो कापडाचा तुकडाच असतो; परंतु जेव्हा तो तिरंगा बनतो, तेव्हा तो देशप्रेमाचे प्रतीक असतो. बलिदानाची गाथा त्यामागे असते. तो कोट्यवधी भारतीयांना त्यांच्या उद्देशाप्रती जागृत करीत असतो. अगदी हेच तत्व कुर्बानीसाठी देखील लागू आहे. प्राण्यांच्या कुर्बानीचा विधी अल्लाहतर्फे निर्धारित करण्यात आला आहे. याचा उल्लेख करताना कुरआन म्हणतो,

कुर्बान केल्या जाणाऱ्या उंटांना आम्ही अल्लाहच्या प्रतीकांपैकी निर्धारित केले आहे. त्यामध्ये तुमचे हित आहे. कुर्बानीसाठी त्यांना रांगेत उभे करून अल्लाहचे नाव उच्चारा. ते आपल्या कुशीवर खाली पडल्यानंतर त्यातून तुम्हीही खा; मागणाऱ्यांना आणि गरजवंतांनाही द्या. अशाप्रकारे आम्ही प्राण्यांना तुमच्या अधीन केले जेणेकरून तुम्ही कृतज्ञ असावे.[4]

दानधर्म आणि रक्तदान

मुस्लिमांच्या धार्मिक उपासनांना विरोध करणारे कथित मुस्लिम हितैषी आणि मुस्लिमद्वेषी यांच्यात कमालीचे साम्य आढळते. दोन्ही गटांना मुस्लिमांच्या उपासना पद्धती नको आहेत. ते एकत्रितपणे मुस्लिमांना त्यांच्या उपासना पद्धतींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत राहतात. मात्र कुर्बानी तसेच अन्य कोणतीही उपासना जशी धर्मशास्त्रात विहित आहे, तशीच केली जाईल. पैसे दान करून किंवा रक्तदान करून कुर्बानी केली जाऊ शकत नाही. कुर्बानीची उपासना रक्तदान केल्याने होत असेल तर मग नमाज अदा करण्याची गरज काय? रोजांचे पालन करायचे तरी कशासाठी करावे? त्यालाही पर्याय शोधला जाऊ शकतो ना? आणि जेव्हा पर्याय शोधले जातील, तेव्हा त्या बदललेल्या उपासना पद्धती अजिबात इस्लामी उपासना पद्धती असणार नाहीत. त्या उपासनांसाठी निर्धारित करण्यात आलेली ती प्रतीके अल्लाहतर्फे निर्धारित प्रतीके नसतील तर समर्पण आणि त्यागाच्या भावनेच्या विरोधातील बंडाची प्रतीके असतील. अल्लाहच्या निर्धारित प्रतीकांच्या विरोधात बंडाची प्रतीके असतील. प्रेषित मुहम्मद [स.] यांनी दिलेली उपासना पद्धती तीच आहे, जिचा उल्लेख वरील परिच्छेदात केला गेला आहे.

अतिरेक नव्हे संतुलन

तसेच या उपासना पद्धतींच्या बाबतीत अतिरेकही होता कामा नये. काळाच्या प्रवाहात समुह आपले उद्देश हरवून बसतात आणि प्रतीकांनाच उद्देश समजण्याची चूक करतात. याबाबत अतिरेक होऊ नये, म्हणून कुरआन दक्षता घेतो. राष्ट्रध्वज देशप्रेमाचे प्रतीक निर्विवाद आहे, परंतु देशप्रेमाचा पुरावा नाही. ध्वजाच्या लांबीवरून कोणाचे देशप्रेम मोजता येत नाही. अगदी तसेच कुर्बानीवरून एखाद्याची धर्मनिष्ठा मोजता येत नाही. इस्लामी उपासनांचा अवलंब करणे, मुस्लिम असण्याची किमान अट आहे. परंतु उपासनांच्या आधारे एखाद्याला धर्मनिष्ठ ठरविता येणार नाही. धर्मनिष्ठेच्या निर्णयाचा अधिकार अल्लाहने त्याच्याकडे राखीव ठेवला आहे. कुर्बानीबाबत मुस्लिम समुदायाने अतिरेक करू नये म्हणून कुरआन बजावून सांगतो,

[लक्षात असू द्या] अल्लाहपर्यंत त्यांचे मांस पोहोचते ना त्यांचे रक्त; पोहोचते मात्र तुमची परायणता [धर्मनिष्ठा].[5]

वरील आयतीचा विपर्यास करून कुर्बानीला विरोध करणाऱ्यांकडून नेहमी उद्धृत केली जाते. कुरआनच्या आयतींना मूळ संदर्भापासून दूर करून एखादी आयत म्हणजे जणूकाही स्वतंत्र विचार मांडणारे वाक्य आहे, अशाप्रकारे मांडणी करणे हे कुठल्याही संहितेच्या वाचनाची न्याय्य पद्धत नव्हे. एखादी आयत कशाबद्दल भाष्य करीत आहे, हे तिच्या मागच्या-पुढच्या आयतींचा संदर्भ पाहूनच निश्चित करता येते. प्रेषितांच्या काळी लोक कुर्बानीचे मांस व रक्त तशाच स्थितीत काबागृहात सोडून द्यायचे. मांस मूर्त्यांना अर्पण करायचे तर रक्त काबागृहाच्या भिंतींवर लावायचे. कुर्बान केलेला पशु तसाच ठेवायचे आणि अल्लाहला अर्पण केला आहे, असे म्हणायचे. अशा परिस्थितीत ही आयत अवतरीत करण्यात आली. या आयतीमध्ये स्पष्ट बजावून सांगण्यात आले आहे की, कुर्बानीचे मांस वा रक्त अल्लाहपर्यंत अजिबात पोहोचत नाही. अल्लाहला केवळ तुमची समर्पणभावाची परीक्षा घेणे अभिप्रेत आहे. समर्पणाच्या भावनेने कुर्बानी करणे, कुर्बानीचा उद्देश आहे. प्राणाची आहुती देण्यास तयार असणे, कुर्बानीचा उद्देश आहे. आपले सर्वस्व अपर्ण करण्याची मानसिकता तयार करणे, कुर्बानीचा उद्देश आहे.

कुर्बानी परीक्षा आहे, पुरावा नाही. विशेष गोष्ट अशी लक्षात ठेवायला हवी की, कुर्बानीचा आदेश मुळात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मुस्लिम व्यक्तीसाठी आहे. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील त्यांच्यासाठी कुर्बानी अनिवार्य नाही. मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यास कुर्बानीची परीक्षा आयुष्यभर देत राहावी लागेल. गेल्यावर्षी परीक्षा दिली होती, आता मी धर्मनिष्ठ झालो किंवा मी मागील कित्येक वर्षांपासून परीक्षा देत आलो आहे, माझ्या धर्मनिष्ठेवर शंका कशी घेता? म्हणता येणार नाही. नमाज वगळता अन्य कोणतीच उपासना धर्मनिष्ठेचा पुरावा नाही. मात्र हा धर्मादेश धर्मनिष्ठेचा पुरावा नाही असे म्हणताच, एखाद्याने कुरआनच्या उपरोक्त आयतींचा चुकीचा अर्थ लावून कुर्बानीच्या प्रतिकालाच नष्ट करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. अल्लाहला कुर्बानी अभिप्रेत नसून केवळ समर्पणभाव अपेक्षित आहे; असे म्हणून एखाद्याने कुर्बानीलाच संपविण्याचे प्रयत्न करू नये, म्हणून कुरआन बजावून सांगतो की,

जो अल्लाहच्या प्रतीकांचा आदर करतो, त्याद्वारे तो त्याच्या मनातील धर्मनिष्ठा व्यक्त करीत असतो.[6]

कुर्बानी नाकारणारे आणि ईद

प्रतीके केवळ आदरास पात्र अशा परंपरा नाहीत, तर त्यांचा संबंध धर्म आणि ईशपरायणतेशी आहे. या प्रतीकांमुळे अल्लाहच्या महानतेची धारणा मनात उत्पन्न होते आणि ही धारणा धर्म आणि ईशपरायणता निर्माण करते. जाणीवपूर्वक या प्रतीकांना नाकारणारे किंवा यांचा आदर न करणारे अल्लाहच्या अस्तित्वाला मान्य करीत नाहीत किंवा त्यांनी अल्लाहच्या प्रतीकांच्या विरोधात उघडपणे बंड थोपटले आहे. नमाजनंतर कुर्बानी दुसरी सर्वात महत्वाची उपासना आहे. नमाज उपासनेचा आरंभ आहे, तर कुर्बानी उपासनेचा अंतिम बिंदू आहे. प्रेषित मुहम्मद [स.] यांनी कुर्बानीचे गांभीर्य स्पष्ट करताना उपदेश केला, “समर्थ असूनही हेतूपूर्वक कुर्बानी करीत नाही, त्याने आमच्या ईदगाहपासून दूर राहावे.”[7]

ही साधारण तंबी नाही. सामर्थ्य असूनही विनाकारण किंवा कुर्बानीला विरोध करण्याच्या उद्देशाने कुर्बानी टाळणाऱ्यांनी मुस्लिम समाजाच्या आनंदात सहभागी होऊ नये. या आनंदाच्या आणि सामाजिक सोहळ्याच्या दिवशी त्यांनी समाजापासून दूर रहावे. समाजानेही त्यांना दूर ठेवावे. हा आदेश अत्यंत तीव्र स्वरूपाचा आहे. आपल्या गर्भवती मुलीच्या हल्लेखोरांना माफ करणारे प्रेषित मुहम्मद [स.], आपल्या काकांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना माफ करणारे प्रेषित मुहम्मद [स.], प्रेषितांवर दगडांचा वर्षाव करून त्यांना रक्तबंबाळ करणाऱ्यांना विनाअट माफ करणारे प्रेषित मुहम्मद [स.] या प्रसंगी इतके कठोर का झाले असतील? हे विचार करण्यासारखे आहे. याचे कारण हेच आहे की, अल्लाहतर्फे निर्धारित करण्यात आलेल्या प्रतीकांना विरोध इस्लामला विरोध आहे. हा इस्लामच्या हेतू आणि उद्देशांवर हल्ला आहे.

संदर्भ:

[1] कुरआन, सुरह कौसर, आयत २

[2] कुरआन, सुरह अनआम, आयत १६२

[3] कुरआन, सुरह हज, आयत ३४

[4] कुरआन, सुरह हज, आयत ३६

[5] कुरआन, सुरह हज, आयत ३७

[6] कुरआन, सुरह हज, आयत ३२

[7] अलबानी, सहीह अल जामेअ, हदीस ६४९०

Leave a Comment