इस्लामने मुस्लिमांसाठी केवळ दोनच धार्मिक सण निर्धारित केले आहेत. ‘ईद उल फित्र’ आणि ‘ईद उल अझहा’. भारतीय उपखंडात ईद उल फित्र ‘रमजान ईद’ तर ईद उल अझहा ‘बकरी ईद’ या नावाने ओळखली जाते. हे दोन्ही सण वैश्विक मुस्लिम समाजातर्फे जगभरात साजरे केले जातात. कोट्यवधी मुस्लिम एकाच दिवशी एकाच प्रकारे हे सण जगभरात साजरे करतात.
‘ईद’ शब्दाचा पारिभाषिक अर्थ ‘आनंदाचा क्षण’ असा आहे. ईद शब्द अरबी शब्द ‘औदा’पासून व्युत्पन्न झाला आहे, ज्याचा अर्थ ‘परत येणे’ किंवा ‘पुनरागमन’ असा आहे. यामुळे ईद म्हणजे दरवर्षी परत येणारा उत्सव किंवा सण; जो आनंद, कृतज्ञता आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. इस्लामने मुस्लिम समाजासाठी वर्षातून केवळ दोन धार्मिक सण निर्धारित केले आहेत. हे दोन्ही सण मुस्लिम समाजासाठी वैश्विक सण आहेत. इस्लामी दृष्टीकोन, प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला या सणांत सामील करून घेण्यासाठी आग्रही आहे. आपण पाहू शकतो की, हे दोन्ही सण पूर्णतः समाजाभिमुख आहेत. ईद-उल-फित्रच्या वेळी प्रत्येक मुस्लिम व्यक्तीवर नमाज अदा करण्यापूर्वी फित्रा [म्हणजेच अन्नधान्य दान] अदा करणे अनिवार्य आहे[1], तर ईद-उल-अझहाच्या वेळी कुर्बानीच्या भावनेने कुर्बान केलेल्या पशूचे मांसदान करणे प्रोत्साहित कर्म आहे.[2]
‘ईद उल फित्र’ चे स्वरूप
‘ईद उल फित्र’ हिजरी[3] कालगणनेनुसार १० व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. इस्लामी कॅलेंडरनुसार ९ वा महिना रमजान असतो. रमजानमध्ये महिनाभराच्या रोजांचे पालन केले जाते. स्त्रीपुरुष भेद न करता सर्वांनी रोजांचे पालन करावे, अशी प्रथा इस्लाममध्ये आहे. रमजानचे रोजे प्रत्येक सशक्त सुदृढ मुस्लिम व्यक्तीसाठी अनिवार्य आहेत.[4] मात्र काही कारणाने शारीरिक दुर्बलता ज्यांच्यामध्ये आहे, असे अशक्त, आजारी, रज:स्वला, गर्भवती, बाळंतीण, वृद्ध आणि बालक यांना रोजांच्या बाबतीत सूट देण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ प्रवासी देखील घेऊ शकतात. चांद्रकालगणनेनुसार महिना २९ किंवा ३० दिवसांचा असू शकतो. महिन्याच्या २९ तारखेला मुस्लिम लोक सायंकाळच्या नमाजनंतर चंद्र पाहण्याची घाई करतात. २९ तारखेला चंद्र दिसल्यास महिना २९ दिवसांचा मानला जातो आणि दुसऱ्या दिवशी शव्वाल सुरु होतो. परंतु २९ तारखेला चंद्र न दिसल्यास महिना ३० दिवसांचा मानला जातो.[5] महिनाभराच्या रोजांचे पालन करून १० वा महिना शव्वालच्या पहिल्या दिवशी अल्लाहप्रती कृतज्ञतेच्या भावनेने रमजान ईद साजरी केली जाते. सामान्य गरिबांनाही ईदच्या आनंदात सहभागी होता यावे, यासाठी ईदच्या आदल्या दिवशी अनिवार्य फित्रा दिला जातो.[6] ज्याद्वारे गोरगरिबांना, गरजवंतांना आणि उपेक्षितांना अन्नधान्याची मदत केली जाते. ही मदत अन्नधान्याच्या स्वरुपात करावी लागते. रोख रकमेच्या स्वरूपातील मदत जकात आणि सामान्य सदकाच्या माध्यमातून करता येते.
ईदच्या दिवशी मुस्लिम लोक भल्यापहाटे उठून शुचिर्भूत होतात. नवीन कपडे परिधान करतात. प्रेषित मुहम्मद [स.][7] पांढऱ्या रंगाला पसंती द्यायचे, म्हणून बहुतेक करून पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पांढरा रंग हा शांतीचा प्रतीक मानला जातो. तसेच पांढरा रंग सूर्याच्या प्रकाशकिरणांना शोषून घेत नाही, परावर्तीत करतो; म्हणून पांढऱ्या रंगाचे कपडे आरोग्याच्या दृष्टीनेदेखील लाभदायक ठरतात. घराबाहेर पडण्यापूर्वी इस्लामी परंपरेप्रमाणे[8] गोड पदार्थ खजूर खातात किंवा भारतीय उपखंडात शिरखुर्मा पितात. ईदगाह[9] मैदानावर जाऊन ईदची नमाज अदा करतात. ईदगाह शहरात किंवा शहराबाहेरही असू शकते. ईदच्या नमाजची व्यवस्था मोकळ्या मैदानात करावी, असा नियम इस्लामी विधीशास्त्रात निश्चित करण्यात आला आहे.[10] ईदगाह मैदानाकडे जाताना शांतपणे तकबीरचे पठन केले जाते. तकबीरमध्ये अल्लाहच्या महानतेची साक्ष दिली जाते. अल्लाहच्या कृपावर्षावांचा अंतःकरणपूर्वक स्विकार केला जातो. त्याची करुणा भाकली जाते. तकबीरचे शब्द, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्ललाह व अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर व लिल्लाही अलहम्द, असे आहेत.[11] दोन्ही ईदची नमाज सूर्योदयानंतर अदा केली जाते. नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या जातात. छोटे असो वा मोठे, श्रीमंत असो वा गरीब, प्रतिष्ठित असो वा सामान्य, इस्लामी समता सर्वांना समान दर्जा देते. म्हणून शुभेच्छासाठी आलिंगन करण्याची परंपरा मुस्लिम समाजात निर्माण झाली. आलिंगन इस्लामी समतेचे प्रतीक आहे. ईद दिवशी नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या गाठीभेटी घेतल्या जातात. विभिन्न भौगोलिक प्रदेशात विविध पदार्थ तयार केले जातात. भारतीय उपखंडात शेवया, शिरखुर्मा आणि गुलगुल्यांसारखे गोड पदार्थ बनविले जातात. आणि शेजारी, नातेवाईकांना व मित्रमंडळींना आमंत्रित केले जाते आणि अशाप्रकारे ‘ईद उल फित्र’ अर्थात रमजान ईद साजरी केली जाते.
‘ईद उल अझहा’ चे स्वरूप
‘ईद उल अझहा’ हिजरी चांद्र कालगणनेनुसार १२ व्या महिन्याच्या १० तारखेला साजरी केली जाते. १२ वा महिना जिलहिज्जा. हा हजयात्रेचा महिना. आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या मुस्लिम व्यक्तीसाठी आयुष्यात एकदा हज अनिवार्य आहे.[12] अनिवार्य हज अदा करण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो मुस्लिम मक्केला जातात. आणि या हजयात्रेत हाजी[13] लोक जिलहज्जाच्या १० तारखेला कुर्बानी करतात. त्यांच्यासोबत जगभरातील मुस्लिम देखील कुर्बानी करतात. हीच आहे ईद उल अझहा.
‘ईद उल अझहा’च्या काही दिवसांपूर्वी कुर्बानीसाठी जनावर खरेदी केले जाते. परंतु आधुनिक काळात वाढत्या शहरीकरणामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. जागेची समस्या त्यापैकी एक आहे. कुर्बानीचे जनावर घरी आणता येत नाही, म्हणून ते सवलतीनुसार शेतात, मैदानात किंवा खाटीकाकडे ठेवले जाते. या ईदच्या दिवशीही मुस्लिम लोक भल्यापहाटे उठून शुचिर्भूत होतात. नवे कपडे परिधान करून ईदगाहला जातात. ईदगाहला जाताना चालत जाण्याची परंपरा आहे.[14] ईदगाहपासून काही किमी अंतरावर वाहनस्थळाची व्यवस्था करून चालत गेल्याने ट्राफिकची समस्या निर्माण होत नाही. या ईदची नमाजदेखील सुर्योदयानंतरच अदा केली जाते. देशात अनेक ठिकाणी स्त्रियादेखील ईदच्या नमाजमध्ये सामील होतात. त्यांच्या सहभागाबद्दल प्रेषितांनी विशेष आदेश दिले होते.[15] नमाज अदा केल्यानंतर इमाम[16] प्रासंगिक प्रवचन देतात. या प्रसंगी प्रवचनात ईदची ऐतिहासिक पार्श्वभूमी, महत्व, स्वरूप आणि धर्म प्रामाण्यता विषद केली जाते. नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या जातात. नंतर कुर्बानगाहकडे[17] जाऊन आपला प्राणी कुर्बान केला जातो. स्त्रियादेखील कुर्बानी करू शकतात. प्रेषितांच्या काळापासून मुस्लिम स्त्रिया कुर्बानी करीत आल्या आहेत.[18] कुर्बानीनंतर कुर्बान केलेल्या प्राणाच्या मांसाची विभागणी करून काही भाग घरी आणला जातो. तर काही भाग नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेट दिला जातो. उर्वरित भाग समाजातील उपेक्षितांना, वंचितांना आणि गरजवंतांना ईदची भेट म्हणून दिला जातो. यासंदर्भात कुरआनातील आदेश असा,
ज्या चतुष्पाद प्राण्यांची आम्ही तरतूद केली आहे, त्यावर निर्धारित केलेल्या दिवशी अल्लाहचे नाव घ्या [आणि कुर्बानी करा]. त्यातून तुम्हीही खा आणि लाचार वंचितांनाही खाऊ द्या.[19]
काही महत्वाच्या बाबी
वरील परिच्छेदात आपण दोन्ही इस्लामी सणांच्या स्वरुपाची चर्चा केली आहे. आता जरा या सणांकडे लक्षपूर्वक पहा. या दोन्ही इस्लामी सणांत गोंधळाचा हलकासा तरी लवलेश दिसतो का? कसलाही गाजावाजा दिसतो का? आनंद साजरा करतानाचा उन्माद दिसतो का? मुस्लिमांच्या एखाद्या ईदचा समाजाला त्रास होतो का? वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मिळणे कठीण आहे. देशाच्या इतिहासात क्वचितच असे घडले असावे की, या सणांमुळे शासन यंत्रणेवर ताण पडला असावा किंवा समाज जीवन विस्कळीत झाले असावे. कसल्याही वायू अथवा ध्वनी प्रदूषणाशिवाय हे दोन्ही सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे केले जातात. पैश्याचा अपव्यय नाही की श्रीमंतीचा बडेजाव दाखवण्याची संधी नाही. कसलाही जयघोष नाही की कसली घोषणाबाजी नाही. समाजाला त्रास होऊ शकतो, अशी एकही गोष्ट नाही.
सुर्योदयानंतर मुस्लिम लोक ईदगाहला जाऊन गरीब आणि श्रीमंत एकसारखे पांढरे कपडे परिधान करून खांद्याला खांदा लावून नमाज कायम करतात. एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात, ईदचा आनंद साजरा करतात आणि काही तासांत हा आनंदसोहळा साजरा करून आपापल्या घरी पोहोचतात. पुढच्याच क्षणी घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त होतात. अशाप्रकारे लाखो मुस्लिमांचे दरवर्षी इस्लामी सण साजरा करण्याकरिता एका ठिकाणी शांततेत एकत्र येणे आणि अलग होणे, जगाच्या इतिहासात मागील चौदा शतकांपासून निरंतर घडत आहे. परंतु त्यांच्या एकत्र येण्याने समाजाला कधीच कसलाच त्रास झाला नाही. ते कसलाही गाजावाजा करीत नाहीत की आरडाओरडा करीत नाहीत. शांततेत एकत्र येतात आणि शांततेत वेगळे होतात. या सणांची कॅलेंडरवर नोंद नसती तर कदाचित जगाला कळालेही नसते की, मुस्लिमांचे असे एकत्र येणे हे सणानिमित्त आहे आणि हे प्रसंग मुस्लिम समाजाचे आनंदोत्सव आहेत.
आनंदोत्सवात वंचितांचा सहभाग
ईदच्या मुहूर्तावर समाजातील उपेक्षित, गरजवंत व वंचित घटकांना सणांच्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी इस्लामने विशेष काळजी घेतली आहे. ‘ईद उल फित्र’ च्या वेळी फित्राच्या माध्यमातून वंचित घटकांना अन्नधान्य पुरविले जाते. फित्रा अदा केल्याशिवाय ईद साजरी होऊ शकत नाही. तर ‘ईद उल अझहा’च्या वेळी जबिहा केलेले मांस गरजूंना द्यावे हे प्रोत्साहित कर्म आहे. ईदप्रसंगी मनाच्या उदारतेला किती महत्व देण्यात आले, याचा अंदाज घेण्यासाठी इतकी गोष्ट पुरेशी आहे की, या दोन्ही ईदचे नामकरण दानधर्मावरून करण्यात आले आहे. पहिली ‘ईद उल फित्र’ म्हणजे फित्रा देण्याची ईद तर दुसरी ‘ईद उल अझहा’ म्हणजे जबिहा अदा करण्याची ईद.
सारांश:
इस्लामने मानवजातीला साधेपणा, समता आणि त्यागाच्या भावनेवर आधारित हे दोन वैश्विक सण दिले. ‘ईद उल फित्र’ रमजानमधील आत्मसंयम, उपासना आणि कृतज्ञतेची परिणती आहे, जी सदका-ए-फित्र दानाद्वारे समाजातील वंचितांना सणाच्या आनंदात सहभागी करते. फित्रा हे दान सामान्यतः अन्नधान्याच्या स्वरूपात असते. तर दुसरीकडे, ‘ईद उल अझहा’ प्रेषित इब्राहिम [अलै.] यांच्या अल्लाहच्या आज्ञेपुढील समर्पण व त्यागाच्या स्मरणात साजरी होते. कुर्बानीद्वारे मुस्लिम समाज गरजूंना मांस वाटतो, ज्यामुळे सामाजिक बंधुता आणि दानशीलता दृढ होते. हे दोन्ही सण स्थानिक संस्कृतींनी समृद्ध झाले असले, तरी त्यांचे मूलभूत तत्त्वज्ञान – नमाज, फित्रा आणि कुर्बानी – जगभरातील १.९ अब्ज मुस्लिमांमध्ये समान आहे, ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने वैश्विक ठरतात.
मुस्लिमांच्या धार्मिक सणांची तोंडओळख झाल्यानंतर आता आपण कुर्बानीची चर्चा करूयात. कुर्बानीची सुरुवात कशी, का आणि कोणत्या परिस्थितीत झाली? तसेच कुर्बानीचा उद्देश काय आहे? त्याद्वारे मुस्लिम समाजावर कोणत्या भावना आणि जीवन उद्देश बिंबवले गेले आहेत? या प्रश्नांची उत्तरे आपण पुढील प्रकरणांत पाहणार आहोत.
संदर्भ:
[1] बुखारी, सहीह, किताबुज्जकात, खंड १, हदीस १५०३
[2] मुस्लिम, सहीह, किताबुल अजही, खंड १, हदीस १९७१
[3] प्रेषित मुहम्मद [स.] यांनी मक्केहून मदिनेकडे केलेल्या स्थलांतरापासून हिजरी कालगणना सुरु होते.
[4] कुरआन, सुरह बकरा, आयत १८३-१८५
[5] मुस्लिम, सहीह, किताबुस्सियाम, खंड १, हदीस १०८१
[6] बुखारी, सहीह, किताबुज्जकात, खंड १, हदीस १५०३
[7] प्रेषितांचे नाव घेताना ‘सल्लेल्लाहू अलैही व सल्लम’ म्हणजेच ‘शांती व कृपा असो त्यांच्यावर’ असे म्हणून त्याद्वारे प्रेषितांसाठी अल्लाहकडे दुआ करण्याची मुस्लिमांची परंपरा आहे.
[8] बुखारी, सहीह, किताबुल इदैन, खंड १, हदीस ९५३
[9] ईदची नमाज ज्या मैदानात अदा करायची असते, त्यास ईदगाह म्हणजे ईदस्थळ असे म्हणतात.
[10] इमाम शौकानी, फिकहुल हदीस, खंड १, पृ. ६०३
[11] नैनुल अवताद, खंड २, पृ. ६२१
[12] कुरआन, सुरह आले इमरान, आयत ९७
[13] हज करणाऱ्या व्यक्तीला हाजी म्हणाले जाते. हाजी पदवी किंवा मान-सन्मान वाढविणारे पद नाही.
[14] इमाम शौकानी, फिकहुल हदीस, खंड १, पृ. ६०५
[15] बुखारी, सहीह, किताबुल हैज, खंड १, हदीस ३२४
[16] ज्या व्यक्तीच्या नेतृत्वात नमाज अदा केली जाते, त्यास इमाम म्हणतात. इमाम पुरोहितपद नसून नेतृत्वपद आहे. कोणतीही पात्र मुस्लिम व्यक्ती या पदासाठी नियुक्त केली जाऊ शकते.
[17] जनावर कुर्बान करण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या स्थळाला कुर्बानगाह म्हणतात.
[18] इब्ने हजर, फतहूल बारी, शरह सहीह बुखारी
[19] कुरआन, सुरह हज, आयत २८