सण-उत्सव समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. सामाजिक जीवनाची जाणीव मानवामध्ये निर्माण झाल्यापासून सणांचे अस्तित्व आहे. कधीही कोणताही सण साजरा न करणारा समाज जगात झाला नाही आणि होणारही नाही. लोकांचे समान विचाराने, समान उद्देशाने एका ठिकाणी एकत्र येणे, एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणे, एकाच पद्धतीने कसलाही विरोध न करता काही नियमांचे पालन करणे; यातून समाजाचे संघटीकरण घडते. विविध कारणांनिमित्त दूर राहणारे एकमेकांजवळ येतात. यामुळे परस्परसंबंध दृढ करण्याची संधी उपलब्ध होते. सणांद्वारे समाज मनावर विशिष्ट जीवन उद्देश आणि भावना बिंबविता येतात. सणांना दरवर्षी एका निश्चित तारखेला साजरे करण्यामागे हेच उद्देश कार्यरत असतात.
समाजाला सण-उत्सवांची नितांत गरज आहे. त्याशिवाय समाज संघटित राहू शकत नाही, विखुरला जातो. म्हणूनच आजच्या आधुनिकीकरणाच्या काळात सण-उत्सवांच्या बाबतीत सामाजिक ओढ आणखी तीव्र झाली आहे. नवनवीन सण-उत्सव निर्माण, आयात आणि साजरे केले जात आहेत. विद्यार्थ्यांचे वार्षिक समारंभ असोत की एखाद्या व्यावसायिक पेढीचा वर्षपूर्ती सोहळा असो, एखाद्या Whatsapp ग्रुपचा वाढदिवस असो की आणखी काही असो! हे सारे काही त्या मूलभूत मानवी स्वभावाचे प्रतिनिधित्व करतात, जो मागणी करतो की आम्हाला संघटीत राहण्यासाठी सामाजिक सणांची, उत्सवांची आणि सोहळ्यांची गरज आहे. जेथे दैनंदिन जीवनातील ताणतणाव विसरून आम्ही समान भावनेने, समान उद्देशाने, समान पद्धतीने एकत्र येतो आणि एकमेकांशी जोडले जातो.
सण-उत्सव विविध प्रकारचे असतात. जसे राष्ट्रीय, धार्मिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक. या सणांचा बारकाईने अभ्यास केल्यास असे दिसून येते की, यापैकी काही सणांमागे एखाद्या ऐतिहासिक घटनेची पार्श्वभूमी असते तर काही सणांमागे एखादी व्यक्ती उभी असते. जसे दिवाळीला रामाच्या विजयी मोहिमेच्या आगमनाची पार्श्वभूमी आहे. तर २५ डिसेंबरला साजरा केल्या जाणाऱ्या ख्रिसमसमागे प्रेषित येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनाची पार्श्वभूमी आहे. सणांचे प्रकार असतात, तसे त्यांना साजरे करण्याचेही प्रकार असतात. काही निव्वळ आनंदोत्सव असतात तर काही स्मरणोत्सव असतात, ज्याद्वारे इतिहासातील त्याग व बलिदानांचे स्मरण केले जाते. सण साजरा करण्याच्या पद्धतीवरून त्यांचा उद्देश आणि त्याद्वारे निर्माण केली जाणारी भावना, यांचा अंदाज घेता येतो. पद्धती व भावना जितकी उच्च असेल, तितका त्याचा उद्देशही उच्च असतो.
उदाहरणादाखल आपण आपल्या राष्ट्रीय सणांबाबत बोलूयात. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन, हे दोन दिवस देशातील नागरिकांसाठी केवळ राष्ट्रीय सण नाहीत तर नवचेतना, नवप्रेरणा देणारे स्रोतही आहेत. या सणांच्या आयोजनावर भारत सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते.[1] हे सण १२५ कोटी नागरिकांमध्ये स्फूर्ती आणि नवचेतना निर्माण करतात. या निमित्ताने विविध साधनांद्वारे देशाच्या इतिहासाला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविले जाते. देशासाठी त्याग आणि बलिदान करणाऱ्यांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. परिणामतः लाखो लोक देश व समाजासाठी जगण्याचा संकल्प करतात. ज्यामुळे अनेकांच्या आयुष्याला दिशा मिळते. लोक आपल्या साऱ्या वेदना, दु:ख आणि हाल-अपेष्टा विसरून एकत्र येतात. एकमेकांशी प्रेमाने आणि सहकार्याने वागायला हवे, याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण होते. चोहीकडे आनंदाचे वातावरण असते. लहानग्यांना देशप्रेमाचे बाळकडू पाजले जाते. अशाप्रकारे १२५ कोटी नागरिकांच्या मनात आपण ‘भारतीय’ असल्याची जाणीव बळकट होते.[2]
दुसरे उदाहरण धार्मिक सणांचे. भारतात हिंदू बांधव बहुसंख्यांक आहेत. हिंदू बांधव वर्षभर विविध प्रकारचे सण साजरे करीत असतात. एका वर्षात सर्वात जास्त सण साजरा करणारा, हिंदू कदाचित जगातील एकमेव समाज असेल. हिंदू बांधवांचे बहुतेक सण प्रादेशिक असतात. दक्षिण व उत्तर भारतातील सण साजरा करण्याच्या पद्धती पूर्णतः भिन्न आहेत. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सणही निराळे आहेत. तसेच एका प्रांतातील अनेक सण दुसऱ्या प्रांतात साजरे केले जात नाहीत. काही वर्षांपूर्वी बिहारी लोकांच्या छटपुजेला महाराष्ट्रात प्रखर विरोध झाला होता. छटपुजा साजरा करणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या लोकांचा धर्म एकच होता.[3] अशा विभिन्न सणांत दिवाळी मात्र देशाच्या बहुतांश भागात साजरी केली जाते. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत बहुसंख्य हिंदू दिवाळी साजरी करतात. १४ वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र अयोध्येस परतल्याच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साजरी केली जाते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धनपूजा आणि भाऊबीज इ. दिवस आठवडाभर साजरे केले जातात. आठवडाभराच्या या सणावेळी घरांना रंगरंगोटी केली जाते, नवनवीन वस्तूंची खरेदी केली जाते. विविध प्रकारच्या फराळाचे पदार्थ तयार केले जातात. आप्तजनांना, नातेवाईकांना आणि मित्रांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात. एकमेकांना उपहार दिले जातात. दूरवर राहणारे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. नोकरीनिमित्त किंवा व्यवसायासाठी गावाबाहेर किंवा देशाबाहेर असलेले घरी परतात. सारे मिळून हा आनंद साजरा करतात.
तिसरे उदाहरण प्रादेशिक किंवा सांस्कृतिक सणांचे आहे. विविध ठिकाणी विविध प्रदेशात जे प्रादेशिक किंवा सांस्कृतिक सण साजरे केले जातात, ते ठराविक भूभागांपुरते मर्यादित असतात. ते त्या-त्या भागातील लोकांना एकत्रित आणि संघटीत करण्याचे काम करतात. त्या प्रदेशातील लोकांच्या संस्कृतीचे जतन संवर्धन करणे आणि विकास घडविणे, हे उद्देशदेखील या सणांच्या आयोजनामागे कार्यरत असतात. आपल्या बहुसांस्कृतिक देशात विविध राज्यांत अनेक प्रकारचे सांस्कृतिक सण साजरे केले जातात. या सणांच्या आयोजनामागे सारखेच उद्देश कार्यरत असतात. लोकांना एकत्र येण्याची संधी भेटावी आणि समाजाचे संघटीकरण घडावे, इ. उद्देश या सणांच्या आयोजनाद्वारे साध्य केले जातात.
जगभरातील सारे सण-उत्सव समान उद्देशाने साजरे केले जातात, त्यांच्यामागे समान हेतू कार्यरत असतात. हे हेतू प्रादेशिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय, जाती-जमातीच्या किंवा वंशाच्या अस्मितेशी जुळलेले असतात. मर्यादित हेतू आणि उद्देश असणारे सण-उत्सव प्रादेशिक सण-उत्सवाच्या स्वरुपात मर्यादित राहतात. ते व्यापक रूप धारण करू शकत नाहीत. एका प्रदेशात साजरे केले जाणारे सण-उत्सव, दुसऱ्या प्रदेशात साजरे केले जात नाहीत. धर्म एक असूनही प्रांत बदलले तर सण उत्सव देखील बदलतात. अखिल मानवजातीला संघटीत करण्यासाठी अखिल मानवजातीचा व्यापक असा सण उत्सव असणे गरजेचे आहे, ज्याद्वारे मानवजातीला संघटीत करता येणे शक्य व्हावे. अशा उत्सवांमागे प्रादेशिक, प्रांतीय, राष्ट्रीय, जातीय किंवा वांशिक अस्मिता नव्हे तर मानवजातीला एकत्र करू शकणारी वैश्विक प्रेरणा असणे गरजेचे आहे. अशा सण उत्सवाची पार्श्वभूमी एखादी घटना किंवा व्यक्ती असली तरी ती व्यक्ती अथवा घटना प्रदेश-भूभाग, जात-वर्ण आणि वंशाच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त असायला हवी. त्या घटनेचा वा व्यक्तीचा स्वीकार करण्यासाठी कोणत्याही भूभागात कोणत्याही समूहाला कसल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये. जर अशी एखादी घटना किंवा व्यक्ती असेल तर तिच्याशी संबंधित सण-उत्सव सकल विश्वाचे सण-उत्सव बनू शकतात. ज्याच्या माध्यमातून जगभरातील लोकांना संघटीत केले जाऊ शकते, एकत्र केले जाऊ शकते आणि त्यांच्या मनावर काही उच्च जीवन उद्देश आणि भावना बिंबविल्या जाऊ शकतात.
वरील निकषांना ध्यानात ठेऊन जेव्हा आपण इस्लामी सणांकडे पाहतो, तेव्हा असे दिसते की, इस्लामने जगाला दिलेले सण याच प्रकारात मोडतात. ते अखिल मानवजातीचे वैश्विक सण सिद्ध होऊ शकतात. इस्लामी सणांमागे कोणतीही प्रादेशिक, प्रांतीय, जाती-वर्णीय किंवा वांशिक अस्मिता कार्यरत नसते. एक उदात्त विचारसरणी आणि उच्च हेतू कार्यरत असतो. म्हणून जगभरात जेथे जेथे इस्लामचे आगमन झाले, तेथील जनतेने इस्लामी सणांना सहजतेने स्वीकारले. त्यांचा प्रदेश, त्यांचा वर्ण आणि त्यांचा वंश इस्लामी सणांसाठी कधी अडथळा ठरला नाही. अरब असोत की युरोपीय, भारतीय असोत की मंगोल, तुर्क असोत की इजिप्ती, मलाई असोत की आफ्रिकी; या सणांनी सर्वांना एका धाग्याने बांधण्याचे काम केले, त्यांना संघटीत केले. त्या सर्वांना समान भावना आणि सामाईक उद्देश देण्याचे काम केले. इस्लामी सणांनी गटागटामध्ये विभागलेल्या मानवजातीला एकत्रित केले.
संदर्भ:
[1] https://timesofindia.indiatimes.com/city/bareilly/Centre-spent-Rs-Rs-320-cr-on-R-Day-celebrations-last-year-RTI/articleshowprint/46005505.cms
[2] देशातील कायदे, नागरिकांचे अधिकार आणि अल्पसंख्यांक समुदायाचे हक्क या गोष्टींवर राष्ट्रप्रेमाची जाणीव तयार होते, हा राज्यशास्त्राचा सिद्धांत येथे लागू होत नाही. कारण देशाची बहुसंख्य जनता या बाबींशी परिचित नसते. त्यांच्यासाठी काही ठराविक प्रतीके देशप्रेमाची भावना आणि जाणीव निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. राष्ट्रगीत, प्रार्थना, राष्ट्रीय सण किंवा राष्ट्रध्वज सारखी प्रतीके सामान्यांसाठी जास्त महत्वाची असतात. उदा. सेनेत भरती होणाऱ्यांचे म्हणणे असते की त्यांची बालपणापासूनच देशाची सेवा करण्याची इच्छा होती. अर्थातच ही बालपणातील इच्छा देशातील कायदे, नागरिकांचे अधिकार आणि अल्पसंख्यांक समुदायाचे हक्क यामुळे निर्माण होत नाही. तसेच देशाहितासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या अनेकांना प्रोत्साहित करणारी प्रेरक हीच प्रतीके असतात. म्हणून ही प्रतीकेच सामान्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करतात आणि त्यास बळकटीही देतात.
[3] https://www.indiatoday.in/india/story/politics-chhath-puja-mumbai-biharis-bjp-congress-349835-2016-11-02