रमजानचे दिवस आणि रात्र – भाग २ (Days and Nights of Ramadan)

संध्याकाळची नमाज अदा केल्यानंतर, लोक भूक भागवण्यासाठी व रात्रीचे जेवण करण्यासाठी त्यांच्या घरी परततात. तथापि, बहुतेक लोक जास्त न खाणे पसंत करतात, कारण ‘अति तिथे माती’च्या नियमानुसार जास्त खाल्ल्याने इमानधारकांना आनंद देणाऱ्या तरावीहच्या नमाजमध्ये अडथळा निर्माण होतो. ही नमाज रात्रीच्या ईशाच्या नमाजनंतर ताबडतोब अदा केली जाते. सोलापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबईसारख्या ठिकाणी अनेक मस्जिदमधून स्त्रियांना देखील तरावीहच्या नमाजमध्ये सामील होण्याची व्यवस्था केली जाते. भारतीय उपखंड वगळता जगभरातील साऱ्या मस्जिदीतून स्त्रियांच्या नमाजची व्यवस्था असते. देशात हा विचार आता वेगाने वाढत आहे. यासाठी अहले हदीस या मुस्लिम समाज सुधारणा चळवळीने मोठे योगदान दिले आहे. देशातील मोठ्या शहरातून तब्लीग जमातने देखील हा विचार मान्य केला आहे.

तरावीह [रमजानच्या रात्रीची विशेष नमाज]

तरावीह ही एक विशेष नमाज आहे, जी केवळ रमजानमध्येच अदा केली जाते. ही नमाज तुलनेने दीर्घ असते आणि सुमारे एक-दीड तास चालते. रमजानच्या प्रत्येक रात्री या नमाजचे आयोजन केले जाते. रमजानचा महिना २९ दिवसांचा असेल तर २९ तरावीह आणि ३० दिवसांचा असेल तर ३० तरावीह. तरावीहची नमाज लीड करणाऱ्या इमामला संपूर्ण कुरआनचे पठण करावे लागते. यासाठी कुरआन मुखोद्गत असलेल्या इमामला प्राधान्य दिले जाते. देशातील प्रत्येक मस्जिदीमध्ये तरावीहच्या नमाजचे आयोजन केले जाते. म्हणजे देशातील प्रत्येक मस्जिदमध्ये किमान एक इमाम असा आढळतो, ज्याला संपूर्ण कुरआन मुखोद्गत असते.

या नमाजमध्ये मुस्लिम त्यांच्या पालनकर्त्यासमोर उभे राहून, नतमस्तक होऊन नमाज अदा करतात आणि संपूर्ण कुरआनचे श्रवण करतात, त्यातील प्रत्येक आयत अत्यंत सुरेल अशा आवाजात ऐकतात, जणू ती तिथेच प्रकट होत आहे. अत्यंत कुशल पाठक [कारी] असलेल्या मस्जिद लवकर भरतात, अनेकांना नमाजला जागाच मिळत नाही. म्हणून लोक जागा आरक्षित करण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा लवकर पोहोचतात. काही मोठ्या मस्जिदीमध्ये हजाराहून जास्त भक्त संपूर्ण शहरातून हजेरी लावण्यासाठी येतात. हा एक असा अनुभव आहे, ज्याला अनुभवण्यासाठी लोक वर्षभर वाट पाहत असतात. रमजानमध्ये तरावीहची नमाज ही अल्लाहकडून क्षमाप्राप्तीचे साधन आहे. प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले होते,

“रमजानमध्ये अल्लाहवर इमान बाळगून त्याच्याकडून प्रतिफळाची अपेक्षा करून, जो कोणी रात्रीची नमाज अदा करतो, त्याच्या मागील सर्व पापांची क्षमा केली जाईल.”[1]

अल्लाहचे भक्त नमाजमध्ये कुरआनचे श्रवण करतात आणि नमाजनंतर त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी काही मस्जिदमध्ये होणाऱ्या अध्ययन वर्गात सामील होतात. महाराष्ट्रातील अनेक मस्जिदमधून तरावीहच्या नमाजनंतर त्या दिवशी पठन केलेल्या कुरआनचा संदेशाचा सार संक्षिप्तपणे किंवा सविस्तर सांगितला जातो. कुरआन पठन करणाऱ्या इमामच्या आवाजाचा लोकांवर होणाऱ्या परिणामाशी खूप जवळचा संबंध असतो. अनेक मस्जिदीमध्ये कुरआनच्या आयती, अल्लाहचे आशीर्वाद, त्याचे प्रेम, दया व कृपा, त्याने धैर्य-संयम बाळगणाऱ्यांसाठी राखून ठेवलेले त्याचे नंदनवन आणि पूर्वप्रेषितांचे बोधपर उपदेश अशा अनेक आयती ऐकताना लोक रडताना पाहणे दुर्मिळ नाही. कुरआन ईश्वरी ग्रंथ आहे, जो प्रत्येक व्यक्तीशी थेट बोलतो आणि अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की, जेव्हा तो कुरआन ऐकतो तेव्हा प्रत्यक्ष अल्लाहच थेट त्याच्याशी संभाषण करतो आहे. त्यामुळे कुरआनचे श्रवण करताना निर्माण होणाऱ्या भावना खरोखर अतुलनीय आणि अवर्णनीय असतात. अर्थातच यासाठी किमान थोडी फार अरबी येणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात अरबी शिकणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

तरावीहच्या नमाजच्या अंती इमाम आणि अल्लाहचे भक्त स्वतःसाठी आणि मुस्लिमांसाठी अल्लाहकडे याचना करण्यासाठी हात वर करतात. अल्लाहकडे त्यांच्या पापांची क्षमा मागतात, त्यांना त्यांच्या इमानवर आचरण करताना दृढ राहण्याची आणि शक्ती देण्याची, स्वर्गात प्रवेशाची, रोग्यांना बरे करणे, मृतकांना क्षमा करण्याची आणि या ऐहिक जगात व मरणोत्तर जीवनात चांगल्या प्रतिफळाची, न्यायाच्या दिवसाच्या शिक्षेपासून सुरक्षित राहण्याची, त्या दिवशी त्यांचे हिशोब सुलभ करण्याची आणि या जगातील सर्वांचे दुःख कमी करण्याची अल्लाहकडे याचना करतात. बहुसंख्य मंडळी आपल्या पालनकर्त्याकडे याचना करताना अश्रू ढाळत असल्याचे आढळणे, असामान्य बाब नाही. खरेच, तरावीहची नमाज रमजानच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक आहे आणि ती मुस्लिमांना प्रेरणा देण्यासाठी आणि सत्यता प्रदान करण्यात मोठी भूमिका बजावते. तरावीहनंतर, लोक त्यांच्या घरी परततात, रात्रीचे जेवण करतात आणि नंतर पहाटेच्या जेवणासाठी लवकर उठण्याच्या तयारीने झोपी जातात.

तुम्ही पाहू शकता की, रमजान हा एक असा महिना आहे, ज्यामध्ये अल्लाहची उपासना विविध प्रकारे केली जाते. रमजान एक प्रशिक्षण शिबीर आहे, ज्यामध्ये लोक त्यांची जीवनशैली बदलतात आणि अल्लाहच्या आज्ञांनुसार आचरण करतात. सकाळी उठल्यापासून, दिवसभर व रात्रीपर्यंत एक मुस्लिम व्यक्ती त्याच्या पालनकर्त्याला संतुष्ट करण्यासाठी काही अनिवार्य तर काही ऐच्छिक, अशा विविध उपासना करते. खरोखर हा महिना मुस्लिमांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये आस्तिक व्यक्ती त्याच्या आयुष्यातील अशा कृपेसाठी प्रेरित होते, जी अल्लाहच्या प्रसन्नतेने भरलेली असते.

शेवटच्या दहा रात्री

१ “अर्थातच आम्ही हे [कुरआन] गौरवाच्या रात्री अवतरीत केले आहे. २ आणि गौरवाची रात्र काय आहे तुम्हाला काय समजेल? ३. गौरवाची रात्र हजार महिन्यांपेक्षा उत्तम आहे. ४ रात्र ज्यात अल्लाहदूत आणि आत्मा [गॅब्रिएल] त्यांच्या प्रभुच्या परवानगीने सर्व आदेशांसह खाली उतरत असतात. ५ ‘शांती’ असते त्या रात्री पहाटेपर्यंत. [2]

रमजानच्या पवित्र महिन्यात मार्गदर्शन ग्रंथ कुरआनचे अवतरण सुरु करण्यात आले होते. विशेष म्हणजे या आशीर्वादित महिन्याच्या शेवटच्या दहा रात्रींपैकी ती एक रात्र होती, ज्यात अवतरण सुरु झाले होते. प्रेषित मुहम्मद [स.] या रात्रीबद्दल म्हणाले की, “शेवटच्या दहा रात्रींमध्ये त्या महान रात्रीचा शोध घ्या.” [3]

त्या महान रात्रीच्या उपासना आणि सत्कर्म हजार महिन्यांच्या उपासना आणि सत्कर्मांच्या तुलनेत श्रेष्ठ असतात, जसे उपरोक्त आयातीत नमूद करण्यात आले आहे. म्हणून प्रेषित मुहम्मद [स.] अंतिम दहा दिवसांत रात्रभर उपासनेसाठी जागे राहत. त्यांच्या नमाजची वेळमर्यादा वाढवीत असत. या संदर्भात प्रेषितांच्या कुटुंबियांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे की,

“जेव्हा रमजानच्या [शेवटच्या] दहा [रात्री] सुरुवात होई, तेव्हा प्रेषित मुहम्मद [स.] आपल्या बाह्या सरसावून रात्रभर उपासना करण्यासाठी तयार होत असत आणि आपल्या कुटुंबाला देखील त्यासाठी तयार करीत असत.” [4]

रमजानच्या शेवटच्या दहा रात्रींमध्ये लोक आवर्जून या महान रात्रीचा शोध घेत असतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या कर्मांचे मोबदले कित्येक पटीने वाढवून मिळावेत. अनेकजण संपूर्ण दहा रात्री जागून काढतात, ते रात्रभर अल्लाहची उपासना करतात. ते तरावीहच्या नमाजपासून ते कुरआन वाचण्यापर्यंत, अल्लाहकडे याचना करण्यापासून त्याचे नामस्मरण करण्यापर्यंत विविध प्रकारे अल्लाहची उपासना करीत असतात. या रात्री, काही मस्जिदीमध्ये अतिरिक्त सामूहिक नमाज अदा केली जाते, जी पहाटेच्या जेवणाच्या वेळेपर्यंत सुमारे दीड-दोन तास चालते. रात्री उपासनेसाठीच जागे असतात आणि या दहा रात्रीत लोक सर्वतोपरी प्रयत्नपूर्वक आपला जास्तीतजास्त वेळ उपासनेत व्यतीत करीत असतात, जेणेकरून त्यांना ती महान रात्र प्राप्त करण्याची संधी मिळावी. प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले,

“जो कोणी अल्लाहवर इमान बाळगून आणि त्याच्या प्रतिफळाच्या आशेने या महान रात्री नमाजसाठी उभा राहिला, त्याच्या मागील सर्व पापांची क्षमा केली जाईल.” [5]

रमजान हा माफीचा महिना आहे आणि लोकांना आशा असते की, ते नरकाच्या अग्नीपासून वाचवलेल्या लोकांमध्ये सामील होतील. या संदर्भात प्रेषित मुहम्मद म्हणाले की, “अल्लाह [रमजानमध्ये] कोणाची नरकाग्नीपासून सुटका केली जाईल, याबाबत निर्णय घेतो आणि हे प्रत्येक रात्री घडते.”[6] या कारणाने लोक रमजानमध्ये रोजांचे पालन करतात, नमाज कायम करतात आणि महान रात्रीचा शोध घेतात; जेणेकरुन त्यांना त्यांच्या चूक आणि उणिवांबद्दल क्षमा केली जाईल आणि मरणोत्तर जीवनात स्वर्गाच्या नंदनवनात प्रवेश दिला जाईल.

क्षमेचा महिना

प्रेषितांच्या अनेक हदीस आहेत, ज्यात त्यांनी रमजानच्या विविध उपासनांचा उल्लेख करून अल्लाहकडे क्षमेची याचना करण्याची शिकवण दिली आहे. रमजान हा क्षमेचा महिना आहे. म्हणून या महिन्यात रोजा, तरावीहची नमाज, कद्रची महान रात्र आणि त्या रात्री केली जाणारी याचना या सर्व उपासना अल्लाहकडे क्षमा मागण्याची साधने आहेत. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले, “जो कोणी निखालस इमान व अल्लाहकडून प्रतिफळ प्राप्त करण्यासाठी रमजानच्या रोजांचे पालन करतो, त्याचे पूर्वपाप माफ केले जातील.”[7] आणि “जो कोणी निखालस इमानसह व अल्लाहकडून प्रतिफळ प्राप्त करण्यासाठी रमजानच्या रोजांचे पालन करतो आणि रात्रींची उपासना करतो, त्याचे पूर्वपाप माफ केले जातील.”[8] आणि “अल्लाह [रमजानमध्ये] कोणाची नरकाग्नीपासून सुटका केली जाईल, याबाबत निर्णय घेतो आणि हे प्रत्येक रात्री घडते.” [9]

दानतीचा महिना

आधी सांगितल्याप्रमाणे, लोक इतरांना खाण्यासाठी पुरेसे अन्नधान्य उपलब्ध असावे आणि त्यांना देखील रमजानच्या महिन्याचा आनंद घेता यावा, याकरिता गरजू कुटुंबांना अन्नधान्य दान करतात. या व्यतिरिक्त, रमजानमध्ये लोक सर्वसाधारणपणे जास्त दानशूर बनतात, कारण दान ही अशी उपासना मानली जाते, ज्यासाठी अल्लाह त्यांना विशेष मोबदले देईल. प्रेषितांचे सोबती अब्दुल्लाह अब्बास म्हणाले, “अल्लाहचे प्रेषित लोकांच्या तुलनेत सर्वाधिक उदार होते आणि रमजानमध्ये ते आणखी जास्त उदार होत असत.”[10] आपल्या सत्कृत्यांमध्ये वाढ करण्यासाठी बहुसंख्य लोक या महिन्यात जकात  किंवा अनिवार्य वार्षिक दानधर्म करतात.

वैयक्तिक समर्पणाचा महिना

रमजानमध्ये एक विशेष प्रकारची उपासना असते, ज्यात एक व्यक्ती स्वत:ला निर्धारित कालावधीसाठी मस्जिदमध्ये समर्पित करतो. हा कालावधी कमीतकमी एका दिवसाचा तर जास्तीत जास्त ४० दिवसांचा असतो. या उपासनेला ऐतिकाफ म्हणतात. रमजानमध्ये १० दिवसांचा ऐतिकाफ प्रेषितांची सुन्नत आहे. ऐतिकाफमध्ये उपासक आपला वेळ कुरआनचे पठण करण्यात आणि अल्लाहचे नामस्मरण करण्यात व्यतीत करतो. मुस्लिमांना अल्लाहच्या उपासनेभोवती फिरणारे जीवन जगण्याची सवय व्हावी यासाठी ही उपासना. रोजच्या दैनंदिन जीवनापासून स्वतःला मर्यादित कालावधीसाठी वेगळे करून आणि अल्लाहच्या उपासनेत तल्लीन राहणे, मानवाला त्याचे जीवनध्येय समजून घेण्यास साहाय्य करते. ऐतिकाफच्या उपासनेमुळे मरणोत्तर जीवनाचे महत्व त्याला स्पष्ट होते. अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद [स.] रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांत ऐतिकाफ करायचे, एकांतात राहणे पसंत करायचे आणि विविध प्रकारच्या वैयक्तिक उपासनेत व्यस्त राहायचे. जगभरातून अनेक लोक त्यांच्या कामातून किंवा शाळेतून सुट्टी घेऊन ही उपासना करण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच ही संख्या कमी असली तरी समाधानकारक आहे. प्रत्येक मस्जिदमध्ये किमान एक व्यक्ती ऐतिकाफ करतेच. येणाऱ्या भविष्यात ही संख्या वाढेल अशी आपण अपेक्षा करू शकतो.

सारांश

रमजान जगभरातील मुस्लिमांसाठी सर्वार्थाने विशेष महत्वाचा महिना आहे. हा उपासनेचा महिना आहे, ज्यामध्ये लोक त्यांच्या हातून जाणते-अजाणतेपाणी घडलेल्या पापांचे प्रायश्चित करतात, अल्लाहच्या मार्गाकडे परत येतात आणि त्यांच्या ईमानला पुन्हा जिवंत करतात. हा एक प्रशिक्षण कालावधी आहे, ज्यामध्ये लोक अल्लाहच्या आज्ञांनुसार जीवन जगण्याचा आणि त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. हा असा काळ आहे, ज्यात एक व्यक्ती त्यांच्या निर्मात्याशी त्याचे नाते मजबूत करते. हा असा महिना आहे, ज्यात एक व्यक्ती अतिरिक्त उपासना करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करते. रमजानचा महिना असा आहे, ज्याच्या समान काहीच नाही आणि या महिन्यात मुस्लिमांचे हेतू अत्यंत स्पष्ट असतात. याच कारणास्तव, प्रेषितांचे सहकारी अल्लाहकडे रमजानच्या आगमनाच्या सहा महिने पूर्वीपासून त्यांना रमजानचा अनुभव घेण्याची संधी मिळावी, यासाठी याचना करीत असत आणि रमजाननंतर सहा महिन्यांपर्यंत, या महिन्यापासून लाभप्राप्ती करताना त्यांच्या हातून अनावधानाने घडलेल्या त्रुटींबद्दल अल्लाहकडे क्षमा मागत असत. आम्ही अल्लाहकडे या आशीर्वादित महिन्यात आमचे रोजे आणि नमाजचा स्वीकार करण्याची याचना करतो. आमीन.


संदर्भ:

[1] बुखारी, सहीह, किताब सलातुत तरावीह, १

[2] कुरआन, सुरह कद्र, सुरह ९७, आयात १ ते ५

[3] तिर्मीजी, जामेअ, किताबुस सौम, १११

[4] बुखारी, सहीह, किताबुल फज्ली लैलतुल कद्र, ११

[5] बुखारी, सहीह, किताबुस सालातुत तरावीह, १

[6] तिर्मिजी, जामेअ, किताबुस सौम, १

[7] बुखारी, सहीह, किताबुल इमान, ३१

[8] इब्ने माजाह, सुनन, किताबुल इकामतिस सलात व सुन्नाह फिहा, ५२४

[9] इब्ने माजाह, सुनन, किताबुस सियाम, ६

[10] बुखारी, सहीह, किताबुल मनाकिब, ६३

Leave a Comment