मागील काही वर्षांपासून मुहर्रम संदर्भात मुस्लिम आणि मुस्लिमेत्तर बांधवांमध्ये उत्सुकता वाढत आहे. सोशल मीडियावर, विशेषतः Twitter, Instagram आणि Facebook सारख्या माध्यमांवर #मुहर्रम ट्रेंड करताना दिसतो आहे. अनेकजण मुहर्रम म्हणजे काय, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि धार्मिक महत्त्व काय, याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी आपापल्या परीने माहिती संकलित करून ती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख अशा जिज्ञासूंना समर्पित आहे, ज्यामध्ये मुहर्रमच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आयामांचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. सबब वाचकांना इस्लामी परंपरांचे वैचित्र्य आणि एकता यांचा बोध होईल.
इस्लामचे मूलाधार
इस्लाम धर्म दोन प्राथमिक स्रोतांवर उभा आहे; कुरआन आणि हदीस. कुरआन अल्लाहतर्फे मानवजातीला अंतिम मार्गदर्शनासाठी अवतरित झालेला पवित्र ग्रंथ आहे, तर हदीस म्हणजे प्रेषित मुहम्मद [स.] यांचे कथन, कृती आणि मान्यता यांचा संग्रह. हदीस कुरआनच्या संदेशाचे स्पष्टीकरण, प्रेषितांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांच्या शिकवणींचे विश्लेषण प्रदान करते. इस्लामचा अभ्यास करताना या दोन्ही स्रोतांना एकत्रितपणे विचारात घ्यावे लागते. सुन्नी आणि शिया समुदाय कुरआनला समान महत्त्व देतात, परंतु हदीस संकलन आणि व्याख्येत त्यांचे काही मतभेद आहेत. सुन्नी सहीह बुखारी, सहीह मुस्लिम यांसारख्या हदीस संग्रहांना प्राधान्य देतात, तर शिया अल-काफी आणि इमामांच्या कथनांना महत्त्व देतात. इस्लामच्या कोणत्याही कृती किंवा विश्वासाला या स्रोतांमध्ये आधार असणे आवश्यक आहे; अन्यथा ती इस्लामशी सुसंगत मानली जाणार नाही.
इस्लामी कॅलेंडर
मानवजातीला दिनदर्शिका अथवा कॅलेंडर उपलब्ध करून देणे हा धर्माचा उद्देश नाही. मात्र ज्या संदर्भात धर्मादेश दिले जात आहेत, त्या काळात एखादा सामाजिक प्रश्न मानवी जीवनाला प्रभावित करीत असेल तर धर्म त्याबद्दल जरूर भाष्य करतो. अंतिम प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या काळी वर्षाचे निर्धारण टोळीप्रमुखांच्या सोयीनुसार केले जायचे. ते वर्षाला हवे तसे फिरवायचे; कमी जास्त करायचे. कधी १३ महिन्यांचा वर्ष करायचे तर कधी ११ महिन्यांचा. तेव्हा कुरआनने वर्षातील महिन्यांचे निर्धारण केले. या संदर्भात कुरआनमध्ये जो उल्लेख आला आहे तो असा आहे, “आकाश आणि पृथ्वीच्या निर्मितीपासून अल्लाहच्या लेखी महिन्यांची संख्या बारा आहे, त्यापैकी चार निषिद्ध आहेत.”[1] या आयतीनुसार, इस्लामी कॅलेंडरमध्ये बारा महिने निश्चित करण्यात आले. या संख्येत बदल केला जाऊ शकत नाही. यामुळे कॅलेंडरला स्थिरता प्राप्त होते आणि कालनिर्धारण सहज शक्य होते. आधुनिक काळातील इस्लामी कॅलेंडरमधील १२ महिने प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या जन्मापूर्वीपासून अरबांत प्रचलित प्राचीन महिने आहेत. या महिन्यांची कालगणना चंद्राधारित असल्याने यातील दिवसांची संख्या ३५४ किंवा ३५५ इतकी आहे. इतिहासकार अल बैरुनी आणि इब्ने मसुदी यांनी कॅलेंडरच्या प्राचीन उत्पत्तीवर सविस्तर भाष्य केले आहे.
निषिद्ध महिने
अरब जातीचे लढवय्ये, सतत लढायात मग्न राहणारे होते. या लढायांचा त्यांच्या समाजजीवनावर प्रभाव पडायचा. सततच्या लढायांमुळे त्यांच्या सामाजिक जीवनात स्थिरता नव्हती. मात्र अरबस्थानच्या केंद्रस्थानी असणाऱ्या प्राचीन उपासना गृहाच्या – काबागृहाच्या – यात्रेसाठी शांतता अनिवार्य होती. तेव्हा प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या जन्माच्या हजारो वर्षांपूर्वी हजयात्रेचे महिने निषिद्ध महिने म्हणून घोषित करण्यात आले. हे महिने आधुनिक इस्लामी कॅलेंडरचे ११ आणि १२ वे महिने जिलकदा आणि जिलहज्जा आहेत. हजयात्रेकरूंना प्रवासात लुटमार आणि टोळीयुद्धांचा त्रास होऊ नये म्हणून जिलहज्जानंतरचा एक महिना – मोहर्रम – असे एकूण तीन महिने निषिद्ध महिने म्हणून घोषित करण्यात आले.
या महिन्यांत युद्ध निषिद्ध केले गेले. जेणेकरून या महिन्यांत युद्धबंदी लागू व्हावी आणि लोकांना अल्लाहच्या प्राचीन गृहाच्या यात्रेसाठी सुरक्षितपणे प्रवास करता यावा. तसेच या महिन्यांत अरबी टोळ्यांना शांतीचे आणि आनंदाचे जीवन जगता यावे. या महिन्यांचे निर्धारण प्रेषित मुहम्मद [स.] यांनी नव्हे तर अल्लाहतर्फे करण्यात आले. ‘जिलकदा’ आणि ‘जिलहज्जा’ चे प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या काळात हजचे महिने म्हणून निर्धारण करण्यात आले. ‘मुहर्रम’ चा महिना प्रेषित मुसा [अलै.] यांच्या काळात निषिद्ध करण्यात आला. कालांतराने ‘रजब’ देखील निषिद्ध करण्यात आला.
अशाप्रकारे अरब समाजात वर्षाच्या १२ महिन्यांपैकी वरील ४ महिने निषिद्ध घोषित करण्यात आले. प्रेषित मुहम्मद [स.] यांचे परममित्र अबू बकर [रजि.] यांच्या कथनानुसार, “वर्षाच्या १२ पैकी ४ महिने निषिद्ध आहेत. तीन सलग येतात; जिलकदा, जिलहज्जा, मुहर्रम आणि शेवटचा आहे रजब.”[2] म्हणजेच या चार महिन्यांचे निर्धारण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पूर्वीच झाले होते. म्हणून या चार महिन्यांच्या निषिद्धतेचा अथवा पावित्रतेचा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी किंवा त्यांच्या काळातील तत्कालीन परिस्थितींशी काही संबंध नाही.
आशुराचे महत्व
मुहर्रम हा इस्लामी कॅलेंडरचा पहिला महिना आहे आणि त्यातील १० वी तारीख ‘आशुरा’ म्हणून ओळखली जाते. आशुराचे महत्त्व इस्लाम आणि त्याच्या ऐतिहासिक संदर्भात महत्त्वपूर्ण आहे. हदीसनुसार, प्रेषित मुहम्मद [स.] मक्केत असताना आशुराचा रोजा पाळत होते.[3] २ हिजरीमध्ये मदिनेत स्थलांतर केल्यानंतर त्यांनी ज्यूंना आशुराचा रोजा पाळताना पाहिले आणि त्याचे कारण विचारले. ज्यूंनी सांगितले की, हा दिवस प्रेषित मुसा [अलै.] यांना फिरऔनच्या अत्याचारातून मुक्ती मिळाल्याचा आहे, म्हणून ते कृतज्ञतेसाठी रोजा ठेवतात. प्रेषितांनी याची पुष्टता केली आणि सांगितले, “मुस्लिम प्रेषित मुसा [अलै.] यांच्याशी ज्यूंपेक्षा अधिक निकटचे आहेत.”[4] त्यांनी मुस्लिमांना आशुराचा रोजा पाळण्यास प्रोत्साहित केले आणि रमजानचे रोजे अनिवार्य झाल्यावर तो रमजाननंतर सर्वोत्तम रोजा आहे असे म्हटले.[5]
प्रेषितांनी ज्यूंप्रमाणे १० तारखेलाच रोजा ठेवण्याऐवजी ९ आणि १० किंवा १० आणि ११ तारखेला रोजा ठेवण्याची शिफारस केली, ज्यामुळे मुस्लिमांची स्वतःची विशिष्ट सांस्कृतिक ओळख निर्माण झाली. रमजानचा रोजा अनिवार्य झाल्यानंतर आशुराचा रोजा ऐच्छिक ठरला, परंतु त्याचे धार्मिकीय महत्त्व कायम राहिले. सोमवार आणि गुरुवारच्या प्रोत्साहित रोजांव्यतिरिक्त जिल्हज्जाचे ऐच्छिक रोजे प्रेषित मुहम्मद [स.] आणि त्यांचे सोबती नेहमी पालन करीत असत.[6] सुन्नी समुदायात आशुराचा रोजा प्रेषित मुसा [आलै.] यांच्या मुक्तीच्या स्मरणासाठी आणि अल्लाहप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो.
काय आहे मुसा [अलै.] यांची घटना?
कुरआन (सूरह बकरा, सूरह युनूस) आणि बायबल (एक्सोडस) यामध्ये प्रेषित मुसा [आलै.] यांच्या फिरऔनच्या अत्याचारातून मुक्तीच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रेषित इब्राहीम [अलै.] यांचे नातू याकूब [अलै.], ज्यांना इस्राईल असेही म्हणतात, त्यांचे वंशज (बनी इस्राईल) कनान प्रदेशात राहत. प्रेषित युसुफ [अलै.] यांच्या काळात (अंदाजे इस पूर्व १७००) दुष्काळामुळे ते इजिप्तकडे स्थलांतरित झाले. इसपूर्व १३५०च्या सुमारास इजिप्तच्या तत्कालीन शासकाने बनी इस्राईलींवर अविरत अत्याचार सुरू केले. अल्लाहने प्रेषित मुसा [अलै.] यांच्यामार्फत त्यांची सुटका केली. फिरऔनचा पाठलाग करणारा लष्कर समुद्रात बुडवला गेला. ही घटना आशुराच्या (१० मुहर्रम) रोजी घडली. याच्या स्मरणार्थ ज्यू आशुराचा रोजा पाळतात आणि प्रेषित मुहम्मद [स.] यांनी मुस्लिमांना यात सहभागी होण्यास प्रोत्साहित केले.
मुहर्रम आणि करबला
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे नातू हुसैन यांच्या हत्येची, करबला युद्धाची दु:खद आणि हृदयद्रावक घटना जरी मुहर्रम महिन्यात घडली असली तरी मुहर्रमच्या निषिद्ध असण्याचा करबलेच्या घटनेशी काही संबंध नाही. इस्लाममध्ये कोणत्याही व्यक्तीला इतके महत्व नाही की, त्याच्या कृत्यामुळे किंवा संबंधित घटनेमुळे एखाद्या दिवसाला त्याच्यासाठी खास करण्यात यावे. इस्लाम आपल्या अनुयायींची जी काही मानसिकता तयार करतो, त्यामध्ये व्यक्तीनिष्ठेला स्थान नाही. व्यक्ती कितीही मोठी, महान अथवा थोर असली तरी, ती मरताच मुस्लिम समाज त्याच्या थडग्यावर माती टाकतो. त्याला त्याच्या संपूर्ण अस्तित्वासह मातीत पुरून तो येणाऱ्या उद्यासाठी सज्ज होतो. इस्लाम व्यक्तीनिष्ठ नव्हे तत्वनिष्ठ धर्म आहे. जेथे व्यक्तींना नव्हे तर तत्वांना केंद्रीय स्थान प्राप्त आहे. म्हणूनच येथे ना कोण्या व्यक्तीची जन्मतिथी साजरी केली जाते, ना कोण्या व्यक्तीची पुण्यतिथी साजरी केली जाते. व्यक्तीच्या कर्तत्वाचा उल्लेख तर गेला जातो, त्याच्या कार्याचा गौरवही केला जातो; परंतु संबंधित व्यक्तीच्या अंधानुकरणाला किंवा व्यक्तिपूजेला येथे कसलाच वाव नाही.
१० मुहर्रम आणि मुस्लिम समाजातील कुप्रथा
मुहर्रम हा मातमचा नव्हे, कृतज्ञतेचा महिना आहे. हा दुःखाचा नव्हे, क्षमेच्या याचनेचा महिना आहे. १० मुहर्रम अर्थात आशुराच्या दिवशी रोजाचे पालन करणे अभिप्रेत आहे. प्रेषित मुहम्मद [स.] यांनी तशी सूचनाही केली. १० मुहर्रम अल्लाहप्रती कृतज्ञतेसाठी निर्धारित करण्यात आलेला दिवस! मात्र यादिवशी भारतीय मुस्लिमांचे आचरण अगदी विपरीत आहे. अल्लाहप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दिवशी ‘मातम’ करणे, प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या शिकवणींशी विसंगत आहे.
एखाद्याच्या मृत्यूचे दुःख असणे स्वाभाविक आहे. परंतु या दुःखाचा कालावधी किती असू शकतो? काही निर्धारित कालावधी. यापलीकडे तुम्ही आणखी किती दिवस दुखवटा पाळणार? दुःखाचे जाहीर प्रकटन करताना अनेक कुरापती जन्माला येतात. इस्लामने अशा कुरापतींना आळा घालण्याचे सारे प्रबंध करून ठेवले. रडताना मोठ्याने आरडाओरडा करू नये, आपल्या गालावर मारून घेऊ नये, डोक्यावरची केसं ओढू नये आणि कपडे फाडू नयेत असे उपदेश प्रेषितांनी केले. प्रेषित मुहम्मद [स.] यांच्यापेक्षा जास्त प्रिय मुस्लिमांना आणखी कोण असू शकतो? परंतु प्रेषितांच्या मृत्युसमयी काय अवस्था होती मुस्लिमांची? मदिनात भयाण स्मशान शांतता पसरली होती. या भयाण शांततेत साऱ्यांचेच अश्रू विरत चालले होते. दुसरे खलिफा उमर [रजि.] यांना देखील शहीद करण्यात आले होते. तिसरे खलिफा उस्मान [रजि.] यांची देखील निर्मम हत्या करण्यात आली. बंडखोरांकडून चौथे खलिफा आणि प्रेषितांचे जावई अली [रजि.] यांची देखील हत्या करण्यात आली. मात्र यांच्यापैकी एकाच्याही मृत्यूचा दुखवटा आज पाळला जात नाही.
कुरआनचे थोर भाष्यकार इमाम इब्न कसीर, हुसैन यांच्या मृत्यूचा शोकवटा पाळणाऱ्याबद्दल भाष्य करताना म्हणतात, “हुसैन [रजि.] यांचे वडील त्यांच्यापेक्षा थोर होते आणि त्यांना देखील ठार मारण्यात आले. परंतु मातम करणारे त्यांच्या मृत्यूचा शोक पाळीत नाहीत. रमजान महिन्याच्या १७ व्या दिवशी शुक्रवारी फजरच्या नमाज नंतर मस्जिदीतून बाहेर पडत असताना त्यांची हत्या झाली. तिसरे खलिफा उस्मान अलीपेक्षा थोर होते आणि त्यांच्या घराचा घेराव करून त्यांचा गळा चिरण्यात आला. परंतु मातम करणारे त्यांच्या मृत्यूचा शोक पाळीत नाहीत. दुसरे खलिफा उमर इब्न खत्ताब अली आणि उस्मानपेक्षा थोर होते आणि त्यांची मिहराबमध्ये उभे राहून फजरची नमाज अदा करीत असताना, कुरआनचे पठन करत असताना भोकसून हत्या करण्यात आली. परंतु मातम करणारे त्यांच्याही मृत्यूचा शोक पाळीत नाहीत. पहिले खलिफा अबू बकर यांच्याहून थोर होते. परंतु मातम करणारे त्यांच्याही मृत्यूचा शोक पाळीत नाहीत. शेवटी अल्लाहचे प्रेषित या साऱ्यांहूनही श्रेष्ठ आणि थोर होते. परंतु मातम करणारे त्यांच्याही मृत्यूचा शोक पाळीत नाहीत.”[7]
या विपरीत मुस्लिमांचे कृत्य कसे आहे? एकीकडे मुस्लिम समाजातील एक गट ‘मातम’ करतो आहे. पुरुष, महिला, मुलं, मुली काय तर माता आपली नवजात बालकं घेऊन मातममध्ये सामील होत आहेत. मोठ्याने रडत आहेत. अंगाखांद्यावर धातूंच्या हत्यारांचे वार झेलत आहेत. रक्त सांडत आहेत. तर दुसरीकडे मुस्लिम समाजातील दुसरा गट सरबतचे सबील जागोजागी लावतो आहे. येणा-जाणाऱ्यांना सरबत पाजतो आहे. ढोल ताशे वाजवून सवाऱ्याची मिरवणूक काढतो आहे. मनसोक्त नाचतो आहे. या दोन्ही गटांचे म्हणणे एकच! प्रेषितांचे नातू हुसैन [रजि.] यांची अमानवीय कत्तल करण्यात आली, म्हणून एक गट अतिरेकी मातम करतोय तर दुसरा गट हुसैन [रजि.] यांच्या नवजात मुलांना प्यापला पाणी मिळाले नव्हते म्हणून सर्वांना सरबत पाजतोय. यांच्यापैकीच एक गट सवारी बसवून मनसोक्त नाचतोय. इस्लामी शिकवणीची किती ही घोर विटंबना?
संदर्भ:
[1] पवित्र कुरआन, सुराह ०९, तौबा, आयत ३६
[2] बुखारी, सहीह, हदीस क्र. २९५८
[3] बुखारी, सहीह , हदीस क्र. २००४; मुस्लिम, सहीह, हदीस क्र. ११३०
[4] बुखारी, सहीह, हदीस १८६५, ३२१६
[5] मुस्लिम, सहीह, हदीस ११६३
[6] मुस्लिम, सहीह, हदीस १९८२
[7] अल बिदाया वन निहाया, खंड ८, पृ. २२१